वाकडमध्ये सराईत गुंडाने माजवली दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकडमध्ये सराईत गुंडाने माजवली दहशत
वाकडमध्ये सराईत गुंडाने माजवली दहशत

वाकडमध्ये सराईत गुंडाने माजवली दहशत

sakal_logo
By

सराईत गुंडाने माजवली
वाकडमध्ये दहशत

पिंपरी, ता. २५ : ‘मी या एरियाचा भाई आहे, अख्खं पिंपरी-चिंचवड मला घाबरतय,’ अशी धमकी देत कोयता मिरवीत सराईत गुंडाने दहशत माजवली. या गुंडासह त्याच्या साथीदारांनी सतरा वर्षीय मुलाला हॉटेलच्या बाहेर ओढत बेदम मारहाण केली. त्याच्याकडील ऐवज लुटला. याप्रकरणी पाच जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल आला आहे. हा प्रकार वाकडमधील काळाखडक झोपडपट्टी येथे घडला.
सराईत गुंड शाहरुख खान (वय २५) व बाळा लोखंडे (वय २५, दोघेही रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) यांना पोलिसांनी अटक केली असून आनंद वाल्मीकी (वय २७), जुबेर खान (वय २०) व विष्णू कांबळे (वय २१, सर्व रा.काळाखडक झोपडपट्टी, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सागर अरुण कदम (वय १७, रा. जगतापनगर, थेरगाव) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्याचे मित्र हे काळखडक येथील एका हॉटेलात जेवण करीत होते. त्यावेळी आरोपी बाळा फिर्यादीजवळ येऊन ‘आमचे भाईला बघायची लायकी आहे का, तू आमचे भाईकडे का बघितले’ असे म्हणाला. त्यावर फिर्यादी याने त्यास बघितले नाही असे सांगितले असतानाही बाळा व शाहरुख यांनी फिर्यादीला हॉटेलच्या बाहेर ओढत नेले. शाहरुखने ''मी कोण आहे तुला माहीत आहे का'' असे म्हणत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी फिर्यादीने आरडाओरडा केला असता दहशतीने परिसरातील लोक व फिर्यादीचे मित्र तेथून सैरावैरा पळून गेले. त्यावेळी इतर आरोपींनीही फिर्यादीला मारायला सुरुवात केली. शाहरुखने फिर्यादीच्या तोंडावर मारून त्याच्या खिशातील तीन हजारांची रोकड काढून घेतली. ''मी या एरियाचा भाई आहे, शाहरुख भाई आहे, अख्खं पिंपरी-चिंचवड मला घाबरतय, आणि तू मला नडतो काय, तुला आता सोडत नाही'' अशी शाहरुखने धमकी दिली. त्यानंतर कोयता हातात घेऊन ''थांब आता तुला सोडत नाही, तुला खल्लासच करतो'' अशी धमकी दिली. हे पाहून परिसरातील दुकानदारांनी दहशतीने दुकाने बंद केली. शाहरुख खान हा रेकॉर्डवरील गुंड असून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत.