
गुन्हे वृत्त
केसमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग
पिंपरी, ता. २६ : केसमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग करून धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश दशरथ वाघदरे (वय ४२, रा. पडाळवाडी , ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी याने फिर्यादीवर दाखल असलेल्या केसमध्ये मदत करतो, असे म्हणत सुरुवातीला गुड मॉर्निंग, गुड नाईट असे मेसेज केले. त्यानंतर व्हॅट्सऍपवरून अश्लील मेसेज करून शरीर सुखाची मागणी केली. ''माझी पोलिस ठाण्यात ओळख आहे, तुझ्यावर केस करतो, तुझे स्टेट्स ठेवतो'' असे म्हणत फिर्यादीला वारंवार धमकी दिली. शिवीगाळ केली.
वडील, भावाकडून मुलीला मारहाण
प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी वडील व भावाने मुलीला मारहाण करीत धमकी दिली. हा प्रकार निघोजे येथे घडला. अशोक संतोष सोनवणे (वय ७०), गुणवंत अशोक सोनवणे (वय ३७, दोघेही रा. सुभाषवाडी, निघोजे, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या बापलेकाची नावे आहेत. मुलीने म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या आईने स्वत: खरेदी केलेली प्रॉपर्टी बक्षीस पत्राने फिर्यादी मुलीला दिली. तसेच एलआयसी पॉलिसीसाठी वारसदार म्हणून मुलीचे नाव लावले आहे. दरम्यान, १६ नोव्हेंबर २०२२ ला फिर्यादी मुलीच्या आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूनंतर वडील अशोक व भाऊ गुणवंत हे मुलीच्या घरासमोर आले. एलआयसीच्या कागदपत्रांवर तसेच प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सह्या कधी करणार, अशी विचारणा करीत मुलीला शिवीगाळ केली. घरात शिरत मुलीला धक्काबुक्की करून तिच्या घरातील साहित्य फेकून दिले. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सह्या न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
अल्पवयीन मुलीचा पाठलागप्रकरणी एकावर गुन्हा
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत त्रास दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे घडला. रोहन सगर असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या सोळा वर्षीय मुलीला आरोपी मैत्री कर असे म्हणाला. त्यास मुलीने नकार दिल्याने आरोपी मुलीचा वारंवार पाठलाग करीत आहे.
अपहारप्रकरणी एकावर गुन्हा
भाडेतत्वावर नेलेली मोटार परत न देता अपहार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे घडला. समीर निवृत्ती मरे (रा. स्पिरिया सोसायटी, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भूषण रजिकांत निकम (रा. काकासाहेब म्हस्के कॉलेज रोड, अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी याने फिर्यादीकडून भाडेतत्वावर मोटार घेतली. मात्र, नंतर ती मोटार परत न देता या मोटारीचा अपहार केला.
दुकानातून मोबाईल चोरीला
इलेक्ट्रिक दुकानात खरेदीसाठी गेलेल्या महिलेचा चाळीस हजारांचा मोबाईल चोरीला गेला. हा प्रकार पिंपरीतील शगुन चौकात घडली. महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.