
भरधाव रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव रिक्षाने धडक दिल्याने पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना रावेत येथे घडली. दामोदर तुकाराम कोंडे (वय ७६, रा. पंचवटी हाउसिंग सोसायटी, म्हस्के वस्ती, रावेत) असे या अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. शैला महेश कोंडे (रा. पंचवटी हाउसिंग सोसायटी, म्हस्के वस्ती, रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. कोंडे हे म्हस्के वस्ती येथील हिल किस्ट फेज दोन या सोसायटीच्या समोरील रस्त्याने पायी जात असताना भरधाव रिक्षाने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर रिक्षाचालक पसार झाला.
किवळेत जमिनीच्या वादातून मारहाण
जमिनीच्या वादातून दोघांना मारहाण झाल्याची घटना किवळे येथे घडली. हनुमंत पांडुरंग दांगट (रा. किवळे गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नंदकुमार पांडुरंग दांगट (वय ६३) व शिवाजी नंदकुमार दांगट (वय २७, दोघेही रा. किवळे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीच्या वादाच्या कारणावरून फिर्यादीला हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. तसेच एकाला दांडक्याने डोक्यात व हातावर मारहाण केली.
महिलेवर अत्याचार; एकावर गुन्हा
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ त्रिपाठी (वय ३८, रा. मध्यप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. जीविताची धमकी देत ‘मी तुझ्याशी विवाह करतो, मी जबरदस्ती केली हे कोणाला सांगू नको’ असे सांगून वारंवार शारीरिक संबंध केले. त्यातून फिर्यादी गर्भवती राहिल्या असता गर्भपातासाठी गोळ्या आणून दिल्या. त्यामुळे त्यांचा गर्भपात झाला. फिर्यादीकडून वेळोवेळी सहा लाख रुपये घेतले. मात्र, ते त्यांना परत दिले नाहीत.
हिंजवडीत मोबाईल, दुचाकी घेऊन चोरटे पसार
दुचाकीला दगड मारून खाली पाडून मोबाईल व दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले. हा प्रकार हिंजवडी येथे घडला. वैभव वाघजी बेले (रा. भोईरवाडी, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाचा केक घेण्यासाठी फेज तीन येथे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी यु ५७ या सोसायटीसमोरील रस्त्यावर आरोपींनी फिर्यादी यांच्या दुचाकीला दगड मारून त्यांना खाली पाडले. त्यांच्याकडील मोबाईल व दुचाकी घेऊन पसार झाले.
मारहाण प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
भांडणात एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार इंदोरीजवळील माळवाडी येथे घडला. सोमनाथ आनंदा शिंदे (वय ५१, रा. अंबिका पार्क, तळेगाव दाभाडे), विशाल बाळू पारधे (वय २२), नितीन पांडुरंग धोतरे (३९, दोघेही , रा. सिद्धार्थनगर, तळेगाव दाभाडे), विकास जिजाबा येवले (वय ३१), सागर तानाजी दिवसे (वय ३२, दोघेही रा. कान्हेवाडी, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला. एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. भांडणात आरडाओरडा करून सावर्जनिक शांततेचा भंग केला.