मतमोजणीच्या असणार ३७ फेऱ्या

मतमोजणीच्या असणार ३७ फेऱ्या

पिंपरी, ता. २८ ः चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता. २६) मतदान झाले. सर्व ५१० केंद्रांवरील मतदान यंत्रे थेरगाव येथील शंकरराव गावडे कामगार भवनात ठेवली आहेत. त्याभोवती कडेकोट बंदोबस्त आहे. याच ठिकाणी गुरुवारी (ता. २) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण ३७ फेऱ्या होणार असून निवडणूक विभागाची तयारी झाली आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार होते. पण, त्यातही महायुतीतील भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विठ्ठल ऊर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत झाली. मात्र, मतदान अवघे ५०.४७ टक्के झाले आहे. त्यामुळे कोण विजयी होणार याकडे लक्ष लागले आहे.

कर्मचाऱ्यांची सरमिसळ
मतमोजणीसाठी निवडणूक विभागाकडे उपलब्ध मनुष्यबळाची संगणकीय माध्यमातून द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली. त्या वेळी निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, एस. सत्यनारायण आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते. मतमोजणीसाठी १४ आणि टपाली मतपत्रिकांसाठी एक असे १५ टेबल असतील. प्रत्येक मतदारसंघासाठी १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक केली आहे.

असे मतमोजणीचे नियोजन
प्रारंभी टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात होईल. यानंतर १४ टेबलवर पहिली फेरी सुरू होईल. टप्प्याटप्प्याने ३७ फेऱ्या होतील. शेवटच्या फेरीनंतर यादृच्छिक (रँडमली) पद्धतीने व्हीव्हीपॅट काढून पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाईल.

असा कळेल निकाल
प्रत्येक फेरीनंतर झालेल्या मतमोजणीच्या आकडेवारीची उद्घोषणा ध्वनीक्षेपकाद्वारे केली जाईल. शिवाय निवडणूक आयोगाच्या https://results.eci.gov.in या लिंकद्वारे उमेदवारांना फेरीनिहाय पडलेल्या मतांची आकडेवारी पाहता येईल.

चौदा तास लागतील
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे मतदान केंद्र ५१० व उमेदवार २८ आहेत. शिवाय दोन लाख ८७ हजार ४७९ मतदान झाले आहे. या व्यतिरिक्त टपाली मतदानाचाही समावेश असेल. अंतिम निकाल जाहीर करण्यासाठी सर्व प्रक्रिया विचारात घेता किमान १४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

जमावबंदी
मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी, गावडे कामगार भवन परिसरात जमावबंदी आदेश लागू आहे. पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. निवडणूक आयोगाने ओळखपत्र दिलेल्या व्यक्तींखेरीज इतरांना भवनाच्या १०० मीटर परिसरात प्रवेश नसेल.

रस्ता बंद
निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत तापकीर चौक ते थेरगाव रुग्णालयाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज मंगळवारी मतमोजणी केंद्राची पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या इटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम फॉर सर्व्हीस वोटर) प्रणालीच्या प्रात्यक्षिकासह कामकाजाची माहिती घेतली.

पोटनिवडणूक निकाल कधी?
वार ः गुरुवार
तारीख ः २ मार्च २०२३
फेऱ्या ः ३७
टेबल ः १४+१=१५

असे आहेत मतदार
पुरुष ः ३,०२,२४६
महिला ः २,६५,९७४
तृतीयपंथी ः ३४
एकूण ः ५,६८,९५४

असे झाले मतदान
पुरुष ः १,५७,८२०
महिला ः १,२९,३२१
तृतीयपंथी ः ४
एकूण ः २,८७,१४५

मतमोजणी मनुष्यबळ
आवश्यक मनुष्यबळ ः २०४०
उपलब्ध मनुष्यबळ ः २०४०
राखीव कर्मचारी ः ५१०
मतमोजणी अधिकारी ः ५४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com