प्रदर्शन अन् मेळाव्यातून मुलांच्या कलागुणांना वाव

प्रदर्शन अन् मेळाव्यातून मुलांच्या कलागुणांना वाव

पिंपरी ः शहरातील विविध शाळांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन, मराठी भाषा गौरव दिन तसेच निरनिराळे मेळावे आणि स्नेहसंमेलनाचे सोहळे रंगले. त्यामुळे तेथील वातावरण उत्साही झाले होते. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला, तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून मुले व्यक्त झाली.

भोईरनगर, चिंचवड येथील जयवंत माध्यमिक विद्यालयात विज्ञान दिन साजरा केला. मुख्याध्यापक अजय रावत यांच्या हस्ते डॉ.सी.व्ही.रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक हेमचंद्र भोळे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. आठवीतील सुजल सोनवणे, अमर भोसले, सजाद खान, अल्तमस शेख-पाणी शुद्धीकरण, दिव्या शेट्टी, साक्षी मोरे, दीक्षा जाधव, अंजली गायकवाड, डिंपल कुमारी चौव्हाण, अपेक्षा टिळक, समृद्धी जाधव नववीतील मेघा म्हस्के, स्वरांजली मिसालोलू, मंगेश टेंगळे, सुजल आडागळे, शेखर जमादार, गणेश दोडमणी, सुमीत कांबळे, अनुष्का वाघमारे, गौरी शिंदे. या विद्यार्थ्यांनी विविध विषयावर विज्ञान प्रदर्शनात प्रयोग सादर केले. सूत्रसंचालन धनराज गुटाळ यांनी केले.

सरस्वती माध्यमिक विद्यालय
निगडी सिंधुनगर येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात येथे स्काऊट गाइड विभागाचा मेळावा झाला. मेळाव्यात पाचवी ते नववीचे स्काऊट/गाईडचे १४० विद्यार्थी सहभागी झाले होते. ध्वजवंदन स्काऊट मास्टर रमेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. दोरींच्या गाठीचे प्रात्यक्षिक रेश्मा बनसोडे व रवींद्र कुवर यांनी घेतले. बंधनाचे प्रात्यक्षिक सुनीता चौधरी, जयश्री घावटे यांनी घेतले. तंबू उभारणी प्रात्यक्षिक कैलास कोशिरे, स्वाती देवरे, मनीषा जाधव यांनी घेतले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रा. गोविंदराव दाभाडे होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापक साधना दातीर, उपमुख्याध्यापक विजय बच्चे, पर्यवेक्षक प्रदीप काळोखे, पर्यवेक्षिका कोकिळा आहेर हे उपस्थित होते.

संचेती प्राथमिक विद्यालय
थेरगावातील संचेती प्राथमिक विद्यालय ज्ञान मंदिरात विज्ञान दिन जल्लोषात साजरा केला. बालशिशुवर्ग ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता विज्ञान प्रकल्प स्पर्धा व पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा घेतल्या. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रकल्प तयार केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले वैज्ञानिक प्रकल्प व रांगोळी पाहण्यासाठी संस्थेच्या सचिव वर्षा टाटिया उपस्थित होत्या. उद्धव वाघमारे, इंग्रजी माध्यम विभाग प्रमुख राय, मुख्याध्यापक लक्ष्मण मोरे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सातपुते, इंग्रजी माध्यम विभाग प्रमुख अरविंद उपस्थितीत विज्ञान प्रदर्शन सोहळा उत्साहात पार पडला. बाल वैज्ञानिकांनी लक्षवेधक प्रकल्प सादर करून प्रेक्षकांना आकर्षित केले. प्रकल्प परीक्षण विज्ञान शिक्षिका माधुरी कलघटगी व शिक्षिका विशाखा जगदाळे संयोजनात केले. सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी केले.


एच.ए.स्कूल प्राथमिक विभाग
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळेच्या प्राथमिक विभागात कब बुलबुल शिबिर घेतले. या शिबिरात मागच्या खुणा शोधणे, साहसी खेळ, किम गेम, प्रथमोपचाराची माहिती, स्वच्छतेच्या गाण्यावर नृत्य नाटिका घेतली. कॅम्प फायरच्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे केले. केंद्र समन्वयक नीता खाडे, शाळेच्या माजी शिक्षिका सविता पॉल उपस्थित होत्या. त्यानंतर पाहुण्यांना बडी सलामी, कब ग्रीटिंग, बुलबुल रिंग गीत यांनी मानवंदना देण्यात आली. यानंतर कलर पार्टी द्वारे ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी प्रास्ताविक केले. सुरेखा भामरे यांनी चिंतन दिनाची माहिती सांगितली. शहनाझ हेब्बाळकर यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती निवंगुणे व समीक्षा इसवे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. अनिता येनगुल, समीक्षा इसवे, अनघा कडू यांनी गाणी गायली. अर्चना गोरे यांनी आभार मानले. नियोजन कब बुलबुल विभाग प्रमुख रफेल जॉन स्वामी तसेच सर्व कब मास्टर व फलॉक लीडर यांनी मिळून केले.

गेंदीबाई हायस्कूल
श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये
कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्राचार्य विक्रम काळे यांनी महाराष्ट्रातील विविध बोलीभाषा, वाचन संस्कृती वाढविणे, तसेच मराठी भाषेचे वैभव वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. विद्यार्थिनींनी वेशभूषेसह विविध नृत्य प्रकारातून मराठी साहित्यातील भारुड, बालगीत व आपल्या मातृभाषेला अभिवादन गौरव गीतातून केले. यानिमित्ताने बालगीत-चिऊ चिऊ चिमणी, भक्तिगीत- ये ग ये ग रखुमाई, भारुड- मला दादला नको गं बाई, मराठी भाषा गौरव गीत- बीज जसे अंकुरते भारुड- मला दादला नको गं बाई, तसेच विद्यार्थिनी पेटारे, भूमिका केले, सुशील तोडे यांनी भाषणे केली. प्रास्ताविक पर्यवेक्षक शशिकांत हुले यांनी केले. संयोजन विषय प्रमुख रामनाथ खेडकर, प्रीती गिल, अलका बारगजे, पल्लवी दुसाने, पूनम वचकाल व संध्या पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रामनाथ खेडकर यांनी केले.

श्री फत्तेचंद जैन विद्यालय
श्री फत्तेचंद जैन विद्यालयात कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्र व मराठी भाषा गौरव गीताने झाली. आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान सांगणारी नाटके सादर केली. काही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कवी संमेलनातून अहिराणी, कोकणी मालवणी, माणदेशी, खान्देशी अशा मराठी भाषेची विविध रूपे काव्यातून सादर केली. प्राचार्या सुनीता नवले यांनी काव्यातून स्पष्ट केले. प्रशालेचे विभाग उमाकांत काळे व शिक्षक प्रतिनिधी पूजा तानवडे उपस्थित होते. मनीषा कलशेट्टी यांनी कवितेचे वाचन केले. सचिन नाडे यांनी मराठी राजभाषा दिन साजराकरण्याचे महत्त्व सांगितले. श्रीधर आव्हाड यांनी मराठी गौरव कवितेचे वाचन केले. वंदना वाट यांनी वि. वा. शिरवाडकर यांचे वेडात मराठे वीर दौडले सात या समूहगीताचे विद्यार्थ्यासमवेत सादरीकरण केले. प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका मनीषा महावीर जैन यांनी केले. सूत्रसंचालन निर्मला चव्हाण यांनी केले. आभार माधुरी नलवडे यांनी मानले.

मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निगडी येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा केला. मुख्याध्यापक प्रकाश पाबळे, पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे, संस्था सदस्य राजीव कुटे यांनी प्रतिमेचे पूजन केले. सूत्रसंचालन अमृता गायकवाड यांनी केले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मराठी भाषेचा इतिहास वर्णन केला. पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे यांनी कुसुमाग्रज यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. नाईकरे यांनी मराठी भाषेची महती वर्णन केली. विद्यार्थ्यांनी कविता, चारोळ्या, कथा, कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे सामुहिक गायन केले. सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. प्रशालेच्या प्रमुख्याध्यापिका मृगजा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन लाभले. मीना अधिकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. अमृता गायकवाड यांनी आभार मानले.

कस्पटे वस्ती शाळा
कस्पटे वस्ती शाळेमध्ये कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. हा कार्यक्रम ‘मराठी दिन२०२३’ मुलांच्या साखळीने तयार केला. तसेच मुलांची बालसभा घेतली. त्यात मालपाणी सोसायटीचे सिद्धार्थ इनाणी व गोविंद इनाणी उपस्थित होते. मुलांनी भाषणे केली. त्यात कुसुमाग्रजांची माहिती कविता वाचून दाखवल्या. बाळ सराफ यांनी मुलांना कुसुमाग्रजांची माहिती सांगितली. एका कार्डशीटवर सर्व मुले मुली व शिक्षकांनी मराठीत सह्या केल्या. या सर्व कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापिका ढमाले व सर्व शिक्षक प्रतिभा बनकर, संगीता पाटील, शिवाजी फिस्के, सविता माने, शशिकला बाळसराफ, सुप्रिया थोरवे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

ज्ञानदेव बालक मंदिर
ज्ञानदेव बालक मंदिर व प्राथमिक शाळा आदर्श बालक मंदिर शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव दिलीप चव्हाण, संस्थेचे खजिनदार धनराज गुटाळ यांनी माजी राष्ट्रपती वैज्ञानिक ए. पी. जे. अब्दुल कलाम व सी व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा व महत्त्व सांगून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले व भाषणे केली. विद्यार्थ्यांनी प्रयोगाविषयी अतिशय सुंदर माहिती सांगितली. पालकही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रयोग व शैक्षणिक साधने पाहण्यासाठी उपस्थित होते. समारोप शाळेचे मुख्याध्यापक विनोद मुळके यांनी केला.

मिल्किवे प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल
मिल्किवे प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल, जगताप डेअरी-चिंचवड येथील छोट्या मुलांनी विज्ञान दिन साजरा केला. रोजच्या जीवनामधील छोट्या-छोट्या गोष्टीत विज्ञान कसे वापरले गेले आहे, याचा प्रात्यक्षिकातून मुलांनी अनुभव घेतला. हवेच्या दाबावर चालणारे टॉयलेटमधील फ्लश टॅंक, चुम्बकाच्या मदतीने धान्यातील लोखंडी कण वेगळे करणे, वाफेवर पाण्यात चालणारी बोट, बहिर्गोल भिंगाच्या साह्याने वस्तू कशी मोठी दिसते, घर्षणजन्य विजेचा अनुभव, होकायंत्राचा वापर करून दिशा ठरविणे, ड्राय बॅटरीवर चालणारा पंखा, विद्युत बेल, ज्वलनास प्राणवायूची गरज, ज्वालामुखीचा उद्रेक होऊन लाव्हा रस कसा पसरतो, दृष्टी सातत्याचा तत्त्वाने पडद्यावर चित्रांची होणारी हालचाल असे विविध प्रयोग मुलांनी स्वतः अनुभवले. विज्ञान दिन यशस्वी करण्यासाठी सई संकपाळ, उज्वला लोखंडे, मनीषा पाटील, जयश्री हंबीर, रूपाली अभ्यंकर, रुपाली वाडकर, तेजस्विनी जाधव या शिक्षिकेनी विशेष परिश्रम घेतले. छोट्यांच्या पालकांनीही विविध प्रयोगाचा आंनद लुटला.

नृसिंह हायस्कूल
सांगवी येथील नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राज्यगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. याप्रसंगी अकरावीच्या मुलांनी कविता वाचन केले. काही विद्यार्थांनी मराठी भाषा संवर्धन,भाषा विकास व वाढ याविषयी वकृत्व केले. मराठी स्वाक्षरी मोहिमेत सर्व उपस्थितांनी स्वाक्षरी मराठीतून करून मराठी अस्मिता जोपासली. विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध कविवर्य अनिल दीक्षित होते. त्यांच्या हस्ते सरस्वती पूजन केले. विविध विषयांवर दिलखुलास कविता सादर केल्या. विशेषतः त्याच्या झिंगाट कवितेवर विद्यार्थांनी ठेका धरला. या प्रसंगी प्राचार्य अशोक संकपाळ, ज्येष्ठ शिक्षक कनिस्ठ महाविद्यालय आणि संस्था प्रमुख क्षितीज कदम, गजानन वाव्हळ उपस्थित होते. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख ॲड. नितीन कदम (गडकोटप्रेमी) यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजश्री ढोरे यांनी केले. आभार प्रा. किर्दक यांनी मानले.

एम एम विद्या मंदिर (प्राथमिक)
एम. एम. विद्यामंदिर थेरगाव येथे विज्ञान दिन साजरा केला. यावेळी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. मुलांनी उत्साहाने यात सहभाग घेतला. प्रयोगातील वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेऊन प्रयोग सादर केले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्‍घाटन प्रशालेच्या मुख्याध्यापिकेने केले. प्रशालेतील विद्यार्थी तसेच शिक्षकांनी विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला. विज्ञान गीताचे गायन झाले. विज्ञान प्रदर्शनातील प्रयोग सादर करण्यासाठी विज्ञान विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ज्ञानराज माध्यमिक विद्यालयात
ज्ञानराज माध्यमिक विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ साजरा. बालवाडीपासून तर काही विद्यार्थी पाचवीपासून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. राजेंद्र पठारे यांची ‘मी उद्योजक कसा’ झाल्याचा प्रवास मांडला. मुलाखत तक्षशिला खंडारे या विद्यार्थिनीने घेतली. ज्ञानराज विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष संजय शेंडगे व सचिव दीपक थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महापालिकेच्या माजी नगरसेविका आशा शेंडगे यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला मुख्याध्यापिका ऊर्मिला थोरात यांनी विद्यार्थ्यांना उंच भरारी घेण्याचे आश्वासन दिले. आभार सहशिक्षिका अस्मिता कडलग यांनी मानले. त्यानंतर वर्गशिक्षक संजय आजबे यांनी परीक्षा प्रवेश पत्राचे वाटप केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com