विमा काढून देण्याच्या बहाण्याने
चिखलीत महिलेची फसवणूक

विमा काढून देण्याच्या बहाण्याने चिखलीत महिलेची फसवणूक

Published on

पिंपरी, ता. ५ : इन्शुरन्स करून देण्याच्या बहाण्याने महिलेची चार लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चिखलीत घडला. महिलेच्या फिर्यादीनुसार, त्यांच्याशी संपर्क साधणारा मोबाइल क्रमांकधारक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बरोदा व फिनकेअर बँकेचा खाते क्रमांकधारक व आयआरडीएचे प्रमाणपत्र देणारे राजीव रंजन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून इन्शुरन्स करून देण्याचे बहाण्याने चार लाख ८३ हजार ३३८ रुपये वेळोवेळी घेतले. मात्र, नंतर इन्शुरन्स न देता व पैसेही परत न करता फिर्यादीची फसवणूक केली.


देहूरोडला महिलेशी गैरवर्तन
महिलेशी गैरवर्तन केल्याचा जाब विचारणाऱ्या पतीला दगडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार देहूरोडमध्ये घडला. महिलेच्या फिर्यादीनुसार, अविनाश मगन गायकवाड (वय २१, रा. विकासनगर, देहूरोड), साहिल मनोज तरस (वय २०, रा. उत्तमनगर, देहूरोड), आशुतोष फकिरा धुगौव (वय २१, रा. विकासनगर, देहूरोड) यांना अटक केली आहे. त्यांच्यासह चौघांवर दुचाकीवरून हॉर्न वाजवत महिलेचा पाठलाग करत गैरवर्तन केले. याबाबत त्यांच्या पतीने विचारल्याने त्यांच्या डोक्यात दगड मारून व मारहाण केली. शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत दुचाकीचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

तळवडेत आर्थिक फसवणूक
फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार तळवडेत घडला. शरण बसप्पा सिद्धप्पा कुंभार (रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. बंदेनवाज गुरुबाद्शहा मलगान व बाशीद सय्यद (दोघे रा. कासारवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मलगानने फिर्यादीकडून कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावाने स्वामी समर्थ एन्टरप्रायजेसचा जीएसटी तयार केला. तो वापरून अरिहंत स्टील मुंबई यांच्याकडून ६७ लाख ७९ हजार रुपयांचा माल खरेदी केला. त्या पर्चेस ऑर्डरवर सय्यदने सही करून बनावट चेक दिला. मात्र, खरेदी केलेल्या स्टीलचे ३२ लाख ६० हजार रुपये न देता फसवणूक केली.

घरावर कोयते, दगड मारून दहशत
पिंपरीतील घरावर कोयते व दगड मारून दहशत माजवल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. विशाल लक्ष्मण बनसोडे (रा. बौध्दनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. अमन शेख, करण टाक, आशिष पाल, सागर धावारे, अभिजित गायकवाड, सागर उर्फ एसटी (सर्व रा. बौद्धनगर व पत्राशेड) व त्यांच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. कोयते भिरकावून दहशत निर्माण केल्याचा व घर, दरवाजाचे व खिडकीचे नुकसान केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

तरुणाला दगडाने मारहाण
तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी ओंकार संजय तेलंगी (वय २२, रा. नंदनवन हौसिंग सोसायटी, वाल्हेकरवाडी ) याच्यावर गुन्हा दाखल आहे. निगडी बीआरटी रोड येथे हा प्रकार घडला. स्वराज कृष्णा लिमगिरे (रा. कवडेचाळ, वाल्हेकरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्याच्यासह मैत्रिणीला शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप तेलंगीवर आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी विकी वामन सोनटक्के (वय ३०, रा. मार्डी, ता. तिवसा, जि. अमरावती) याच्यावर गुन्हा दाखल आहे. लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले आणि ‘कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

महिलेला अश्लील मेसेज व धमकी
महिलेला व्हॉट्सद्वारे अश्लील मेसेज करीत धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी अश्लील मेसेज करून फिर्यादीशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘तुझा निर्णय तू दोन दिवसात सांग, नाहीतर मी दोन दिवसात काय करतो ते बघ’ अशी धमकीही त्याने दिली आहे.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com