देहूनगरीत आज तुकाराम बीजेचा सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूनगरीत आज तुकाराम बीजेचा सोहळा
देहूनगरीत आज तुकाराम बीजेचा सोहळा

देहूनगरीत आज तुकाराम बीजेचा सोहळा

sakal_logo
By

देहू, ता. ८ ः जगदगुरू संत श्री तुकाराम महाराज बीज वारीनिमित्त गुरुवारी होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविक देहूत दाखल झालेले आहेत. या भाविकांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. संत तुकाराम महाराज संस्थान आणि नगर पंचायत प्रशासनाची भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी तयारी झाली आहे.
देहूत विविध भागातून दिंड्या दाखल झालेल्या आहेत. इंद्रायणीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजता वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात बीज सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रम होणार आहे. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी सांगितले की, ‘संस्थानने मुख्य देऊळवाडा, वैकुंठगमनस्थान येथील मंदिराची विद्युत रोषणाई, रंगरंगोटी केली आहे. मंदिरालगतच्या परिसराची जादा कर्मचारी नेमून स्वच्छता करण्यात आली आहे. मुख्य देऊळवाड्यात ३२ कॅमेरे बसविण्यात आले असून, वैकुंठगमन स्थान मंदिर परिसरात कॅमेरे बसविले आहे. गुरुवारी पहाटे देऊळवाड्यात परंपरेनुसार बीज सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे.
देहू नगर पंचायतीच्या वतीने गाव, नदीचा घाट परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. माळवाडी, देहू, विठ्ठलवाडी, गाथा मंदिर परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे. भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २४ तास पाणी व्यवस्था आणि टॅंकर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. देऊळवाडा आणि वैकुंठगमन स्थान मंदिर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पीएमपीएलच्या बसेससाठी गावाबाहेरच वाहनतळ करण्यात आलेला आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने २४ तास विद्युत पुरवठा करण्यात आलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने पाच ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहेत.
पोलिसांच्या वतीने यात्रा काळात सुरक्षेसाठी खास पथके तयार करण्यात आलेली आहेत. या सोहळ्यासाठी एक अप्पर पोलिस आयुक्त, एक पोलिस उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्त, १९ पोलिस निरीक्षक, २५ सहायक पोलिस निरीक्षक, १३० पोलिस कर्मचारी, दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दोन शीघ्र कृतिदल असा पोलिस बंदोबस्त असणार आहे. बॉम्बशोधक पथक, श्वान पथक आणि साध्या वेशात ५० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यंदा देऊळवाड्यातून पालखी वैकुंठगमनस्थान मंदिराकडे मार्गस्थ झाल्यावर चोख पोलिस बंदोबस्त असणार आहे. मुख्य कमान ते शिवाजी चौक मार्ग, इनामदारवाडा ते दर्शनबारी मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

बीज सोहळा कार्यक्रम
- पहाटे ३ वाजता ः मुख्य देऊळवाड्यात काकडआरती.
- पहाटे ४ वाजता ः श्री पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा संस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष मंडळ, वंशज, वारकरी यांच्या हस्ते.
- पहाटे ४.३० वाजता ः विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
- पहाटे ६ वाजता ः वैकुंठगमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा
- सकाळी १०.३० ः पालखी प्रस्थान वैकुंठस्थान मंदिराकडे
- सकाळी १० ते १२ ः वैकुंठगमन सोहळ्यात देहूकर महाराजांचे कीर्तन
- दुपारी १२.३० वाजता ः वैकुंठस्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यातील मंदिराकडे आगमन, त्यानंतर रात्री पारंपरिक फड आणि दिंड्या यांचे कीर्तनाचे कार्यक्रम