कोकणे चौक ः नवीन डीपीआर करताना अवैध रेखांकन रद्द करण्याचे साकडे रस्ता ३५ मीटर बाजूला सरकवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणे चौक ः नवीन डीपीआर करताना अवैध रेखांकन रद्द करण्याचे साकडे
रस्ता ३५ मीटर बाजूला सरकवला
कोकणे चौक ः नवीन डीपीआर करताना अवैध रेखांकन रद्द करण्याचे साकडे रस्ता ३५ मीटर बाजूला सरकवला

कोकणे चौक ः नवीन डीपीआर करताना अवैध रेखांकन रद्द करण्याचे साकडे रस्ता ३५ मीटर बाजूला सरकवला

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ : रहाटणी येथील कोकणे चौकात पूर्वेकडून येणारा ‘एचसीएमटीआर’ रस्ता कोकणे चौकातून पश्‍चिमेकडे जाताना ३० ते ३५ मीटर बाजूला सरकवून पुढे नेल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आपला नवीन डीपीआर रेखांकित व प्रस्तावित करताना पूर्वीचे अवैध रेखांकन रद्द करून, हा रस्ता पश्‍चिमेकडे जाताना शास्त्रशुद्ध चौक या व्याख्येत बसवावा. तसेच; तात्विक, सैद्धांतिक व लोकाभिमुख तत्वावर रेखांकीत करून प्रस्तावित करावा, असे साकडे रहाटणी रहिवासी कल्याणकारी संस्थेच्या नागरिकांनी उपसंचालक तथा नगररचना अधिकारी विजय शेंडे यांना घातले आहे.
नागरी हक्क सुरक्षा समिती व रहाटणी रहिवासी कल्याणकारी संस्था यांच्यावतीने अनुक्रमे १२ व २३ जानेवारी २०२३ रोजी शेंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. रहाटणी-कोकणे चौक परिसरातील सुमारे ११० रहिवाशांच्या घरांवर या चुकीच्या रेखांकनामुळे नाहक कारवाईची टांगती तलवार आली आहे. त्यामुळे या नागरिकांच्यावतीने नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी शेंडे यांना निवेदन दिले आहे.
नवीन डीपीआरचे अंतिम रेखांकन करताना व तो प्रस्तावित करताना त्यामध्ये कोकणे चौकातून पश्‍चिमेकडे जाणारा एचसीएमटीआर रस्ता सर्वे क्रमांक ६, ९ ते १६ व पुढे २६ ते २८ या सर्वेमधून नेवून काळेवाडी फाटा ते जगताप डेअरी या मुख्य रस्त्याला नेऊन जोडावा, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.

हा चुकीचा अट्टाहास कोणासाठी...
महापालिकेतील व प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचारी या भागातील काही बांधकाम व्यावसायिक, श्रीमंत व्यक्ती, नेतेमंडळी व मोठ मोठ्या इमारती वाचविण्यासाठी तसेच; बांधकाम व्यावसायिकांना विकण्यासाठी हा रस्ता नियमाने रेखांकीत न करता, अवैध पद्धतीने ३० ते ३५ मीटर बाजूला सरकवून पुढे नेल्याचे दिसून येत असल्याचे नागरी हक्क सुरक्षा समिती व रहाटणी रहिवासी कल्याणकारी संस्था यांच्यावतीने नगररचना अधिकारी, जिल्हाधिकारी व पुणे विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

समानतेच्या तत्त्वाचे पालन करावे
कोकणे चौकाच्या उत्तर क्षेत्रातील राजकारणी, बिल्डर्स, श्रीमंत व प्रभावी लोकांच्या बाधित होणाऱ्या मालमत्ता वाचविण्यासाठी जगताप डेअरीकडून येणारा १०० फुटी रस्ता कोकणे चौकातून पुढे उत्तरेकडे रहाटणी गावाकडे जाताना अचानक व धक्कादायक पद्धतीने तसेच; अतांत्रिक, अवैध पद्धतीने ४० ते ५० फूट केल्याचे निदर्शनास येते. नगररचना अधिकारी विजय शेंडे यांनी स्वत: व त्यांच्या कार्यालयाने घटनेच्या समानतेच्या तत्त्वाचे (कलम १४) पालन करावे व कोकणे चौकात पूर्वेकडून येणारा एचसीएमटीआर रस्ता पुढे पश्‍चिमेकडे नेताना १०० फुटी न ठेवता तो दक्षिण-उत्तर रस्त्याप्रमाणे ४० ते ५० फुटी करून पुढे औंध - रावेत मुख्य रस्त्याला जोडावा, अशी मागणी रहाटणी रहिवासी कल्याणकारी संस्थेच्या श्यामला गायकवाड यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांबरोबर आमच्या विभागाची १६ व २७ फेब्रुवारीला बैठक झाली. राज्य सरकारने जो डीपीआर
मंजूर केला, तोच डीपीआर आमच्याकडे आहे. महापालिकेला त्यात
बदल करण्याचा अधिकार आहे. पण; त्यात महापालिकेने काही बदल केलेला नाही व तसा अहवाल आमच्याकडे आलेला नाही. एचसीएमटीआर रस्त्याची अंमलबजावणी महापालिकाच करणार आहे. त्याचा विकास आराखडा करण्याचे काम महापालिकेने अहमदाबादच्या ‘एचसीपी’ कंपनीला दिले आहे. गुगल इमेजद्वारे व सर्व अभ्यास करून, ही कंपनी विकास आराखडा तयार करून मग आमच्याकडे येणार आहे. अद्याप आलेला नाही.
- विजय शेंडे, उपसंचालक तथा नगर रचना अधिकारी.