रक्ताची नाती बेतताहेत जिवावर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्ताची नाती बेतताहेत जिवावर!
रक्ताची नाती बेतताहेत जिवावर!

रक्ताची नाती बेतताहेत जिवावर!

sakal_logo
By

मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १४ : घरगुती किरकोळ वाद असो अथवा मनाविरुद्ध एखादी घटना घडल्यास येणाऱ्या रागात रक्तातील नातीच जिवावर उठत आहे. प्राणघातक हल्ल्यासह जीव घेण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. मागील काही दिवसात शहरात घडत असलेल्या घटनांवरून रागाच्या भरात रक्ताच्या नात्याचाही विसर पडत असल्याचे अधोरेखित होत आहे. अशा घटनांमध्ये तरुण व प्रौगंडावस्थेतील मुलांचे प्रमाण अधिक आहे.

अशी आहेत कारणे
- हिंसाचाराचे प्रदर्शन
टीव्ही, सोशल मीडिया अशा विविध माध्यमांतून तरुण पिढीवर हिंसेचा, हिंसाचाराचा ठसा उमटतो आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम बघितल्यानंतर त्यांची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. तेच तेच ऐकून, पाहून, ही सर्व प्रकरणे फार सामान्य व सोपी आहेत, असा गैरसमज होतोय. आपण जे बघतो, ऐकतो त्याचा परिणाम आपल्या मनावर व मेंदूवर होतो.

- व्यसन
अनेकदा अशा घटना अमली पदार्थांच्या नशेत घडल्याचे समोर आले आहे. व्यसनी पदार्थांचा आपल्या मेंदूवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत संताप वाढतो, निर्णयक्षमतेवर परिणाम होतो. यातून इतरांवर किंवा स्वतःवर हल्ला होण्याची शक्यता वाढते.
- झटपट समाधान
झटपट सगळ्या गोष्टी, वस्तू, उत्तरे मिळाल्यामुळे, तरुणांमधील संयम लोप पावत आहे. अशा वेळी एखाद्या गोष्टीचे समाधान लवकर न झाल्यास अथवा मनाप्रमाणे न झाल्यास राग लवकर येतो व त्या रागात अशा घटना घडताहेत.

- बालपणातील आघात
बालपणात ज्या व्यक्तींवर मानसिक किंवा शारीरिक आघात झाले आहेत, त्यांच्यामध्ये रागाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.

या गोष्टी आत्मसात करा
- रागावर नियंत्रण ठेवायला शिका. त्यामागील कारणे ओळखून त्यावर पर्यायी उपाय शोधण्याचा प्रयत्न करा.
- ज्यावेळी राग येत असेल किंवा एखाद्या ठिकाणी वादावादी घडत असेल तर तिथून बाहेर पडा व त्या विषयावर नंतर शांततापूर्ण मार्गाने चर्चा करा.
- अंमली पदार्थांचे सेवन टाळा
- मुलांना राग नियंत्रणाचे धडे द्या व स्वतः सुद्धा त्यांची अंमलबजावणी करा
- तीव्र राग येऊन स्वतःला, इतरांना, मालमत्तेचा हानी करण्याचा प्रकार घडत असल्यास, मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.

- महिनाभरातील काही महत्त्वाच्या घटना
- मुलाला गावी घेऊन जाण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याची घटना हिंजवडी येथे घडली
- दिघी येथे प्रेयसीबद्दल अपशब्द उच्चारल्याने मुलाने वडिलांचा दोरीने गळा आवळून खून केला
- चिंचवड येथे मुलाने वडिलांवर प्राणघातक हल्ला केला

‘‘राग अथवा क्रोध ही एक सर्वसामान्य मानसिक भावना आहे. पण त्या रागात वाहून न जाता, त्यावर नियंत्रण ठेवून स्वतःला शांत करणे, ही क्षमता जीवनात शिकणे फार आवश्यक आहे.’’
- डॉ. मधुर राठी, मानसोपचारतज्ज्ञ