
कॅन्सर जनजागृतीसाठी तळेगावात रविवारी पिंकेथॉन रॅली
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १५ ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कॅन्सर विरुद्ध लढा व प्रतिबंध जनजागृती करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि टीजीएच ओंको लाइफ कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.१९) पिंकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी चित्रपट अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन होणार असल्याचे सेंटरचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, प्रकल्प प्रमुख डॉ. धनश्री काळे (पोतदार), डॉ. मनोज तेजानी, क्लब अध्यक्ष दीपक फल्ले, डॉ. विद्या पोतले आदी उपस्थित होते. जास्तीत जास्त महिलांनी या जनजागृती रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी सरनाईक यांनी केले. प्रास्ताविक दीपक फल्ले यांनी केले. मारुती मंदिर चौक ते कॅन्सर सेंटर अशा तीन किलोमीटरच्या या उपक्रमात सुमारे ८१४ महिलांची नोंदणी केली असल्याचे सुनंदा वाघमारे यांनी सांगितले. विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.