
‘महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे अनावरण करा’
पिंपरी, ता. १७ ः महात्मा बसवेश्वर पुतळा समिती आणि महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानाजवळील मोकळ्या जागेत उभारलेल्या महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करावे, अशी मागणी पुतळा समितीने महापालिका प्रशासनाकडे केली. याबाबत प्रशासक शेखर सिंह यांना लेखी पत्र दिले आहे. निगडीत झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे, कार्याध्यक्ष शिवाजी साखरे, अण्णाराय बिरादार, गुरुराज चरंतीमठ आदी उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना अध्यक्ष बहिरवाडे म्हणाले, ‘‘वीरशैव लिंगायत समाजातील सर्व घटकांकडून लोकवर्गणीतून महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बनवून घेतला. त्यांचे समाजसुधाकारकांचे रूप समाजासमोर यावे यासाठी हा पुतळा बसविला आहे. शिल्पकार पंकज तांबे यांनी साडेचार वर्षात ब्रॉंझच्या धातूचा महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बनविला आहे. हा पुतळा इष्टलिंग धारक आहे. यासाठी २७ लाख रुपये खर्च आला. पुतळ्यास शासनाच्या कला संचालनालयाची परवानगी देखील मिळालेली आहे. पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग, महावितरण, तत्कालीन प्राधिकरण यांच्या सर्व मान्यता आणि ना-हरकत प्रमाणपत्र देखील घेतले आहे. त्यानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा बसविण्यास मान्यता दिली. या पुतळ्याचे लवकरात लवकर अनावरण करावे, अशी मागणी समितीने महापालिकेकडे केली.
31173
31174
31175