
चिंचवड रेल्वे स्थानकात थांब्याची मागणी
पिंपरी, ता. १८ : येत्या काही दिवसांत पुणे यार्डचे रिमोल्डींगचे काम चालू होणार आहे. काम पूर्ण होण्याकरिता सुमारे एक वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. या दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांच्या वतीने डी.आर.यू.सी.सी. सदस्य बशीर सुतार यांनी रेल्वे प्रशासन व पुणे मंडल रेल प्रबंधककडे पत्रव्यवहार केला आहे.
एप्रिल महिन्यापासून सुट्टीचा कालावधी सुरू होत असून तो जुलै महिन्यापर्यंत असतो. या कालावधीत नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. याचा भार पुणे स्टेशनवर पडत असून हा भार कमी करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुणे-लोणावळा दरम्यान चिंचवड या मध्यवर्ती स्थानकात थांब्याची गरज आहे. यामुळे, महापालिका हद्दीतील आणि देहूरोड, तळेगाव येथील सुमारे ४० लाख प्रवाशांच्या वेळेची व आर्थिक बचत होत प्रवास सुखकर होईल. यासाठी रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवडच्या वतीने पुणे विभाग, मध्य रेल्वे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.