
तिकीट तपासनीसाकडून चार हजाराच्या दंडाची मागणी पीएमपीएलमधील प्रवासाचा विद्यार्थ्याला अनुभव
पिंपरी, ता. १८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते थेरगाव, काळेवाडी फाटा असा नियमित प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून पीएमपीच्या तिकीट तपासनीसाकडून चार हजार रुपये इतक्या अवास्तव दंडाच्या रकमेची मागणी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
याबाबत अथर्व जाधव म्हणाला, ‘‘शिक्षणासाठी मी दररोज प्रवास करत असतो. गेल्या आठ दिवसांपासून माझी तब्येत बरी नसल्याने सुटीवर होतो. आठ दिवसानंतर १४ मार्च रोजी सकाळी पावणेअकराच्या दरम्यान पिंपळे निलखमधील रक्षक चौक येथे तिकीट तपासणीस बसमध्ये आले. तपासणी करत असताना माझा पास संपल्याची तारीख उलटून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. नियमानुसार मी ५०० रुपये दंड भरला. परंतु, त्यांनी चार हजार रुपयांची मागणी केली. मी त्यांना विनवणी करुणसुद्धा त्यांनी काही ऐकून घेतले नाही. मला दमदाटी करून, त्यांनी माझ्याकडून एक हजार रुपये बेकायदेशीररीत्या वसूल केले.’’
जाधव यांचे वडील शिक्षक असून, या प्रकाराबद्दल त्यांनी पीएमपीएल प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप त्यांना कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. तिकिटाचा गैरवापर केला म्हणून दंड आकारणे तसेच, विनातिकीट प्रवास केला म्हणून ५०० रुपये असा मिळून १ हजार रुपये दंड त्याच्याकडून घेण्यात आला आहे. परंतु, ज्येष्ठ नागरिक, कामगार व महाविद्यालयीन मुलांच्या बाबत असे प्रकार वारंवार घडत असल्याने याबाबतची नियमावली पीएमपीएल प्रशासनाकडे नाही. विनातिकीट दंड आकारणे हे योग्य आहे. परंतु, पासचा गैरवापर करून दैनंदिन विनातिकीट प्रवास केल्याचा ठपका ठेवत रोजचे ५०० रुपये याप्रमाणे दंड वसूल करणे हे चुकीचे असून याविषयी कोणतीही नियमावली नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.
--
असा प्रकार घडला असेल तर पाहतो. तक्रार आली असेल तर, ती देखील पाहतो. असे प्रकार वारंवार घडत नाहीत. नियमाप्रमाणे दंड आकारण्याचे अधिकार तपासणीसांना आहेत.
- सतीश गव्हाणे, पीएमपीएल व्यवस्थापक, पीएमपीएल
--