
वल्लभनगर आगारात महिलांची गर्दी देवदर्शनाला प्राधान्य ः एसटी तिकिटात पन्नास टक्के सवलतीचा लाभ
पिंपरी, ता. १९ : एसटी बसच्या तिकिटात पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे महिला प्रवाशांची चांगलीच गर्दी वल्लभनगर आगारात वाढली आहे. शनिवारी (ता. १८) एका दिवसांत सुमारे १४५५ महिलांनी एसटी बसने प्रवास केला आहे. त्यातही रविवारची सुटी आल्याने एसटी बसमध्ये तिकिटाची सवलत मिळाल्यामुळे देवदर्शनासाठी पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर या मार्गावरही महिलांनी प्रवासाचा आनंद लुटला आहे.
एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात १७ मार्च २०२३ पासून महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्याची योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे. याचा पुरेपूर लाभ महिला घेत आहेत. घरातील इतर पुरुष मंडळींना प्रवास परवडणार नसला तरीही, महिलांना सवलत जाहीर झाल्यामुळे या योजनेला अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
महिलांना ही सुविधा दिल्याने नोकरदार प्रवासी महिलांना तसेच, गावी नियमित जाणाऱ्यांना या योजनेचा फायदा होत आहे. काही महिला कामानिमित्त रोज प्रवास करतात. त्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे. खासगी वाहनाने प्रवास करून जास्त पैसे खर्च करण्याऐवजी या महिला आता अर्ध्या तिकिटात एसटी बसने प्रवास करण्यास पसंती देत आहेत. साध्या, निमआराम तसेच शिवशाही एसी व इतर बसलादेखील तितक्याच प्रमाणात सवलत असल्याने एसी बसगाड्यांनादेखील मागणी वाढली आहे.
--
योजनेचे स्वागत
------------------
सध्या आगारातून दैनंदिन ३६ गाड्या विविध मार्गावर धावत आहेत. त्यात कोकण, सोलापूर, मुरूम, हैदराबाद, विजापूर, पंढरपूर, पणजी, देऊळगाव कोळ, गाणगापूर या मार्गावरही दोन दिवसांत महिला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. तसेच, ५० टक्के सवलतीमुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात या योजनेचे स्वागत केल्याचे दिसून येत आहे.
---
तीन महिन्यांचा पास देखील मी आता बंद करणार आहे. तो परवडत नाही. या सवलतीमधून अधिक पैशांची बचत होत आहे. दैनंदिन कार्यालयीन कामकाजासाठी मी ये-जा करत असते.
- तृप्ती देखले, पिंपरी
--
घरातील पुरुष मंडळींना पूर्ण तिकीट द्यावे लागणार आहे. गावाकडे काही कामानिमित्त चालले आहे. मला तिकिटात सवलत आहे. त्यामुळे, त्यांना घरी ठेवून मी प्रवास करीत आहे. सोलापूरला जाऊन पुन्हा येण्यासाठी पदरमोड खर्च मोठा होता. आता अर्धे तिकीट परवडत आहे.
- मंदाकिनी चव्हाण, चिंचवड
--
महिलांचा या योजनेला अधिक प्रतिसाद मिळाला आहे. नवीन योजना जाहीर झाल्याने महिला वर्गाचा उत्साह देखील मोठा आहे. या योजनेमुळे महिलांना चांगलेच पाठबळ मिळाले आहे. बुकींगला देखील गर्दी वाढली आहे.
पल्लवी पाटील, स्थानक प्रमुख, वल्लभनगर आगार
--