
अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली
पिंपरी, ता. १९ : लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत फळभाज्यांची आवक ३६४ क्विंटल व पालेभाजीची आवक २३ क्विंटल इतकी झाली. एकूण ३८७ क्विंटल भाजी मंडईत दाखल झाली. पालेभाज्यांची आवक उन्हाळ्यामुळे तसेच अवकाळी पावसामुळे सरासरीप्रमाणे घटलेली दिसून आली. तर, फळभाज्यांची आवक सर्वाधिक झाल्याचे पहावयास मिळाले.
कांद्याची आवक सर्वाधिक ३१४ क्विंटल झाली असून भेंडी, दोडका व मिरची सर्वाधिक महागली आहे. टोमॅटोची १७ क्विंटल आवक झाली होती. इतर फळभाज्यांची आवक त्या तुलनेत कमी आहे. किरकोळ विक्रेत्यांकडे कैरी देखील विक्रीस आली आहे. ५० रुपये किलोप्रमाणे कैरीचा भाव सध्या सुरू आहे. भाजीपाला देखील अद्याप सध्या स्वस्त असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
फळभाज्यांचा भाव किलोप्रमाणे (रुपयांमध्ये) ः कांदा : ७ ते ८ , भेंडी : ४० , टोमॅटो ८ ते १०, घेवडा : ५०, दोडका : ४०, मिरची : ६०, दुधी भोपळा : २५, काकडी : १८, फ्लॉवर : १० ते १५, कोबी : ५ ते ६, वांगी : १० ते १५, बीट : १५, घोसाळी : ४५.
भाजीपाला गड्डी (रुपयांमध्ये) ः कोथिंबीर : ५ ते ६, मेथी : ६ ते ८, शेपू : ६ ते ७, पालक : ५ ते ७, मुळा : ६ ते ८, चवळी : ५ ते ६, पुदीना : ३ रुपये.