
घुंगरांचा छनछनाट अन् मनमोहक अदा चिंचवडमध्ये राज्यस्तरीय लावणी महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, ता.२५ ः घुंगरांचा छनछनाट, ढोलकीचा ताल आणि लावण्यवतींच्या मनमोहक अदा यांना शहरातील महिला प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली. टाळ्यांच्या कडकडाटाने चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह दिवसभर दणाणून गेले. शिट्या, टाळ्या आणि फेटे उडवत मिळणाऱ्या प्रतिसादाने ''राज्यस्तरीय महालावणी’ स्पर्धेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला.
पारंपारिक लावणी जपण्यासाठी आमदार उमा खापरे आणि महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांच्यावतीने दोन दिवसीय ही स्पर्धा शनिवारपासून सुरू झाली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांच्या हस्ते नटराजाचे पूजन झाले. यावेळी लावणी सम्राज्ञी आणि परीक्षक सुरेखा पुणेकर, अभिनेत्री मेघा घाडगे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, मनिषा पवार, शैला मोळक उपस्थित होत्या. पारंपरिक पद्धतीने गणगौळण आणि मुजऱ्याने या कार्यक्रमाची सुरवात झाली.
‘मी राजसा तुम्हासाठी’ या संघाने पहिले सादरीकरण केले. नखशिखांत सजलेल्या नृत्यागनांनी लावण्या सादर केल्या. रजनी पाटील पुणेकर, सोनाली जळगावकर यांनी ‘राजसा जरा जवळी बसा, जीव हा पिसा’, ‘खेळताना रंग बाई होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा’, दीप्ती आहेर यांनी ‘इचार काय हाय तुमचा, पाहुणं विचार काय हाय तुमचा’ ही लावणी सादर केली. त्याला ‘वन्समोअर’ मिळाला. हा प्रतिसाद पाहून आहेर यांनी मंचावरुन खाली उतरत महिलांमध्ये येऊन नृत्य सादर केले. परीक्षक सुरेखा पुणेकर यांनीही नृत्य केले. श्रुती मुंबईकर यांनी ‘आशिक माशुक’, ऊर्मिला मुंबईकर यांनी ‘कारभारी जरा दमानं’ ही लावणी सादर करत दिलखेचक अदाकारींसह नृत्य सादर केले. जय मल्हार कला नाट्य मंडळाच्या संघानेही एकापेक्षा एक सरस लावण्यांनी रसिकांना चिंब केले.
महिलांनी लुटला मनमुराद आनंद
महोत्सवात पारंपारिक पद्धतीने लावण्यांचे सादरीकरण झाले. महिलांनी जागेवर उभे राहून नृत्य करत टाळ्या, शिट्या वाजवत मनमुराद आनंद लुटला. नऊवारी साडी, फेटे परिधान करून अनेक महिला आल्या होत्या. कलाकारांबरोबर सेल्फी घेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. प्रेक्षागृह खचाखच भरले होते.
--
आज बक्षीस वितरण
रविवारी (ता. २६) सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहीर यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
--
लावणी जपणे महत्त्वाचे ः कपोते
‘‘पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच राज्यस्तरीय लावणी महोत्सव आयोजित केल्याचा आनंद आहे. आजच्या काळात पारंपारिक लावणी जपणे खूप महत्त्वाचे आहे. लावणीची महाराष्ट्र नव्हे तर देशभरात सर्वांना भुरळ आहे, असे डॉ. कपोते म्हणाले. तर, महिलांना काही तरी वेगळे द्यावे, यासाठी पारंपारिक लावणी जतन करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला, असे आमदार उमा खापरे यांनी सांगितले
फोटो ः 32768, 32767