चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याला संत तुकारामनगरमध्ये मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याला
संत तुकारामनगरमध्ये मारहाण
चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याला संत तुकारामनगरमध्ये मारहाण

चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्याला संत तुकारामनगरमध्ये मारहाण

sakal_logo
By

पिंपरी ः कोयत्याने वार करत चायनीज हातगाडी चालकाला लूटमार करून भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना वायसीएम हॉस्पिटलसमोर घडली. राजू चंद्रकांत थापा (वय ३४, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. रिंक्या ऊर्फ अमरकवलसिंग चौहान (वय ३३, रा. विठ्ठलनगर, पिंपरी), साहिल सुधीर धनवे (वय २२, रा. महेशनगर, पिंपरी), सोन्या रणदिवे, अक्षय रणदिवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. ‘तुझा मोठा भाऊ कुठे आहे. त्याची विकेट टाकायची आहे’ अशी धमकी देत राजू यांच्या खिशातून जबरदस्तीने साडेतीन हजार रुपये काढून घेतले व हातावर कोयत्याने वार व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप चौघांवर आहे.

वाकडमध्ये सुरक्षारक्षकास मारहाण
पिंपरी ः सोसायटीसमोर भांडण करणाऱ्या हटकल्याने दोघांनी सुरक्षारक्षकाला मारहाण केली. त्यांच्या केबिनवर दगडफेक करून नुकसान केले. ही घटना शनिवारी रात्री तीनच्या सुमारास वाकड येथील द आईसलँड सोसायटीसमोर घडली. धनराज जयराम यादव (वय २३, रा. वाकड. मूळ रा. उत्तरप्रदेश) असे सुरक्षारक्षकाचे नाव आहे. निखिल भाऊसाहेब भोंडवे (वय १९, रा. अण्णाभाऊ साठेनगर, वाकड) आणि एका अल्पवयीन मुलाविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

बांधकाम साइटवरून पडून प्लंबरचा मृत्यू
पिंपरी ः सुरक्षा विषयक उपाययोजना नसलेल्या बांधकाम साइटवरून पडलेल्या प्लंबरचा मृत्यू झाला. ही घटना बावधन खुर्द येथे घडली. सूर्यकांत साठे (वय ५१, रा. भूगाव, ता. मुळशी) असे प्लंबरचे नाव आहे. याप्रकरणी विकास सूर्यकांत साठे (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाजीराव भीमराव बंडगर (वय ३०, रा. कोथरूड) याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

‘गुगल पे’ मेसेजद्वारे महिलेचा विनयभंग
पिंपरी ः व्यक्तीची वर्तणूक सुरक्षित न वाटल्याने त्याचा नंबर महिलेने ब्लॉक केला. त्यामुळे व्यक्तीने महिलेला गुगल पेवर मेसेज केले. तिथेही ब्लॉक केल्यानंतर त्याने फोन पेवर मेसेज केले. महिलेने संबंधित व्यक्तीला फोन पेवर देखील ब्लॉक करून थेट पोलिसात धाव घेतली. राकेश कुमार यदुवंशी (पूर्ण पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्याने महिलेचे व्हिजिटिंग कार्ड घेऊन त्यावरील मोबाईल नंबरवर संपर्क साधला. त्याची वर्तणूक सुरक्षित न वाटल्याने महिलेने नंबर ब्लॉक केला. त्यानंतर गुगल पेवर अश्लील मेसेज केला. तोही ब्लॉक केले. त्यानंतर फोन पेवर अश्लील मेसेज करून विनयभंग केला. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

पेट्रोलपंपावर मोटारचालकाला मारहाण
पिंपरी ः मोटारीत डिझेल भरताना ‘झिरो’ ऐवजी ७५ रुपयांपासून मीटर रीडिंग सुरू झाले. त्याबाबत मोटारचालक संदीप कृष्णा खिलारे (रा. हडपसर) यांनी कर्मचाऱ्याला हटकले. त्यावरून त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. कात्रज-बंगळुरू महामार्गावरील वाकड येथील बालवडकर पेट्रोल पंपावर ही घटना घडली. खिलारे (रा. हडपसर) यांच्या फिर्यादीनुसार योगेश बळी शिंदे, तुकाराम संजय सोमवंशी व त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

मोटारीच्या काचा फोडून ऐवज पळवला
पिंपरी ः अवघ्या पाऊण तासात एका चोरट्याने कारच्या काचा फोडून लॅपटॉप, मोबाईल, रोख रक्कम, चांदीची मूर्ती असा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी ताथवडेत घडली. राजू प्रधान राठोड (वय ४४, रा. डुडुळगाव, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची मोटार ताथवडे येथील एक्सेल शोरूमसमोर उभी होती. तिच्या काचा फोडून लॅपटॉप, मोबाईल व रोख रक्कम आणि चांदीची मूर्ती असा ५८ हजारांचा ऐवज चोरून नेला.

‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यास मारहाण
पिंपरी ः डायरेक्ट केलेले वीज कनेक्शन रीतसर करून घ्या, असे म्हटल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यास दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी संजय महादू सावंत (रा. पाईट, ता. खेड) याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. प्रशांत सुरेश वाव्हळे (वय ३२, रा. पाईट, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
पिंपरी ः वाहनाची धडक बसून दुचाकीस्वार महिला कल्पना भूपाल गडेकर (वय ३४, रा. खराबवाडी, ता. खेड) यांचा मृत्यू झाला. विष्णू बळीराम लोखंडे (वय ३६, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल आहे. निघोजेतील डोंगरवस्ती येथे अपघात झाला. त्यानंतर वाहनचालक पळून गेला.

भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू
पिंपरी ः बांधकाम साइटवरील खड्ड्यात काम करताना बाजूची भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. चऱ्होलीतील दाभाडे सरकार चौकाजवळ ही घटना घडली. श्यामसुंदर धर्मदेव शेख्वानिया (वय ४८, रा. उत्तरप्रदेश), सुरेंद्रकुमार रॉय (वय ३९, रा. झारखंड) अशी कामगारांची नावे आहेत. विकसक व सुपरवायझर विरोधात गुन्हा दाखल आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पिंपरी ः सोसायटीतील सुरक्षारक्षकाने अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना सुसगावमध्ये घडली. सुरक्षारक्षक राजकरण सुजा श्रीवास (४६, रा. सुसगाव) याला अटक केली आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रार मागे घेण्यासाठी पट्ट्याने मारहाण
दिघी ः मंत्रालयात व महावितरणकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना पट्ट्याने मारहाण केल्याचा प्रकार दिघीत घडला. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. कुणाल सोपान गायकवाड (रा. हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक
पिंपरी ः घराचा पत्रा उचकटून मोबाईल चोरणाऱ्या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ मोबाईल जप्त केले आहेत. प्रज्ज्वल मोढवे, महेश मंगळवेढेकर व गौरव सुरजभान गौतम यांना अटक केली आहे. नवलाख उंब्रे येथून चोरी झाली होती. सीसीटीव्ही कॅमेरा व तांत्रिक विश्‍लेषणानुसार तिघांकडून एक लाखांचे मोबाईल जप्त केले.