गप्पांचा फड, यशाचा सोहळा अन् कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गप्पांचा फड, यशाचा सोहळा अन् कौतुक
गप्पांचा फड, यशाचा सोहळा अन् कौतुक

गप्पांचा फड, यशाचा सोहळा अन् कौतुक

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ ः एकमेकांना पेढे भरवत... सेल्फी विथ गुणपत्रिका... असा विद्यार्थ्यांचा जल्लोष विविध महाविद्यालयात पाहायला मिळाला. एकमेकांची गुणपत्रिका दाखवत शुभेच्छा देत यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले यश मित्र-मैत्रिणींबरोबर साजरे केले. भविष्याची स्वप्ने रंगविणाऱ्या अन् करियरच्या वाटेला शोधणाऱ्या तरुणाईच्या यशाचा सोहळा महाविद्यालयाच्या कट्ट्यावर रंगला होता. गप्पांचा फड, यशाची सेल्फी आणि शिक्षकांनी केलेले कौतुक असे आनंदी वातावरण महाविद्यालयात दिसून आले.
कोणी पेढे वाटून, तर कोणी एकमेकांना पुष्पगुच्छ देत बारावीच्या यशाच्या शुभेच्छा दिल्या. जल्लोषाने महाविद्यालयाचे परिसर फुलून गेला होता. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पेढा भरवून कौतुक केले. महाविद्यालयात सायंकाळी सहापर्यंत जल्लोषमय वातावरण पाहायला मिळाले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल २५ मे रोजी ऑनलाइन जाहीर केला. शहरात बारावीचा निकाल ९४.४४ टक्के लागला आहे. १६ हजार ९७६ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, काही वर्षांपर्यंत ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आठ दिवसांत गुणपत्रिकांचे वितरण केले होते. दोन वर्षांपासून मंडळाचे वेळापत्रक कोलमडले आहे. निकालासोबतच गुणपत्रिका कधी मिळतील याचे वेळापत्रक देणाऱ्या मंडळाकडून आता त्याचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाते. त्याची तारीखही निश्चित नसते. यंदा निकाल जाहीर होऊन दहा दिवसांचा कालावधी होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका केव्हा मिळणार याबाबत स्पष्टता नसते.

बारा दिवसांनी मिळाली गुणपत्रिका
ऑनलाइन निकालाची पद्धत आली, त्याचवेळी आठ दिवसांत गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती दिल्या जातील, असे आश्वासन मंडळाने दिले होते. ते आश्वासन हवेत विरले आहे. बारावीचा निकाल लागून १२ दिवस झाले आहेत. मूळ गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाची प्रक्रिया करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. बारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मूळ गुणपत्रिका आज प्राप्त झाल्या. विद्यालयांनी गुणपत्रिकेचे गठ्ठे केंद्रातून ताब्यात घेतल्यानंतर गुणपत्रिकांचे वाटप केले. या वेळी पालक व विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका घेण्यासाठी गर्दी केली होती.