गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त
--------
पुर्ववैमनस्यातून कोयता व सिमेंटच्या गट्टूने मारहाण
पिंपरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोघांना लाथाबुक्क्या, सिमेंटच्या गट्टूने आणि कोयत्याने मारहाण केली. हा प्रकार वाकड येथील दत्तमंदिर रोड येथे शुक्रवारी (ता. २) रात्री घडला.
महेश गंगाधरसाळवे (वय २४, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी ओमकार विलास डोलारे (वय २२, रा.वाकड) याला अटक केली आहे. त्याच्यासह आप्पा पवार (वय २५),पिराजी खणकारे (वय २३), अजिंक्य उर्फ भाव्या सपकाळ (वय २१) व सागर घडसिंग (वय २५, सर्व रा. वाकड) व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र युवराज मल्हारी साळवे हे रोडवरून पायी जात होते. दरम्यान, आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून युवराजकडे बोट दाखवत इशारा केला. त्यावेळी आरोपींनी युवराजला लाथाबुक्यांनी मारहाण करण्य़ास सुरुवात केली. फिर्यादींनी मध्यस्थी केली असता आरोपींनी दोघानांही सिमेंटच्या गट्टूने व कोयत्याने डोक्यात मारत गंभीर जखमी केले. आप्पा पवार याने हातातील कोयता हवेत फिरवत आम्ही या भागातले डॉन आहोत अशी धमकी दिली. त्यामुळे नागरिक तेथून पळून गेले, तर दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील एक हजार ८०० रुपये काढून घेतले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

गॅरेजमधून टेम्पो चोरीला
पिंपरी : गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी दिलेले टेम्पो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सहा मार्च २०२३ रोजी हवालदारवस्ती, मोशी येथे उघडकीस आली.
योगेश नारायण गीत (वय ३२, रा. डुडुळगाव) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा तीन लाख रुपये किंमतीचा टेम्पो हवालदारवस्ती, मोशी येथील गुरुदत्त सर्विस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिला होता. दरम्यान, गॅरेज मालकाने टेम्पो गॅरेज समोर लॉक करून पार्क केला असता अज्ञात चोरट्याने टेम्पो पळवून नेला, असे फिर्यादीत नमूद आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत

पार्क केलेल्या ट्रकमधून साहित्य चोरीला
पिंपरी : कंपनीसमोर पार्क केलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाखांचे साहित्य चोरून नेले. ही घटना २ जून रोजी सकाळी सातच्या सुमारास शंकरनगर, चिंचवड येथे उघडकीस आली.
सुनील अशोक थोरात (वय २३, रा. परभणी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ट्रक ड्रायव्हर आहेत. दरम्यान, त्यांनी एक्साईड बॅटरी कंपनी समोर ट्रक पार्क केला. त्यानंतर रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ट्रक मधील ९८ हजार ६०० रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
पिंपरी : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला लग्नाची मागणी घातली. हा प्रकार २ ते ४ जून या कालावधीत देहुगाव येथे घडला.
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोहम संजय कोल्हे (रा. वाशिम) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीची इच्छा नसताना तिला ''लग्न कर'' असे, म्हणून तिचा पाठलाग केला. फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन मुलीला घराबाहेर येण्यासाठी आरोपीने खुणावल्याचे फिर्यादीत नमूद आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
पिंपरी : अवैध पिस्तुल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (ता. ५) सायंकाळी साडेचारच्या सुमारास नाणेकरवाडी येथे करण्यात आली.
गणेश रामचंद्र नाणेकर (वय २७, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेकरवाडी येथील विठ्ठल मंदिराजवळ एकजण शस्त्र घेऊन आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी विठ्ठल मंदिर परिसरात सापळा रचून आरोपी गणेश नाणेकर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजार रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल मिळून आले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

ट्रकचालकाने दोन लाखांचे मटेरियल केले लंंपास
पिंपरी : ट्रक मधील दोन लाख १० हजार रुपये किंमतीचे लोखंडी मटेरियल काढून त्याचा अपहार केला. हा प्रकार एक ते पाच जून या कालावधीत घडला.
वसीम रशीद शेख (वय २८, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रक चालक अंकित माताप्रसाद पटेल (वय २३, रा. बिरदवडी, ता. खेड. मूळ रा. उत्तरप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्टील मटेरियलचे सप्लायर्स आहेत. दरम्यान, त्यांनी जालना येथून लोखंडी मटेरियल मागवले. त्यानुसार, आरोपीच्या ट्रकमध्ये जालना येथून सात टन ९६० किलो वजनाचे लोखंडी बार लोड करण्यात आले. रस्त्यामध्ये आरोपीने तीन टन ४०० किलो वजनाचे दोन लाख १० हजार ०reg; रुपये किंमतीचे लोखंडी बार काढून त्याचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण
पिंपरी : किरकोळ वादातून महिलेला शिवीगाळ करत चौघांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार खेड येथील पाईट गावात रविवारी (ता.४) रात्री घडला.
याप्रकरणी महिलेने म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन महिला आरोपी व अनिकेत काळुराम आहेरकर, काळुराम आहेरकर(सर्व रा. पाईट, खेड) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भांडी घासत असताना आरोपीने फिर्यादीच्या मोरीमध्ये काही तरी घातले. याबाबत विचारणा केली असता आरोपींनी शिवीगाळ करत महिलेला बांबू व लोखंडी सळईने मारहाण केली. यावेळी फिर्यादीचे वडील भांडण सोडवत असताना आरोपीने त्यांनाही कोयत्याने मनगटावर मारत जखमी केले. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

हातभट्टी बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा
- पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : हातभट्टी दारू सोबत बाळगल्या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने तिघांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये पाच लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी (ता. ५) सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास थरमॅक्स कंपनीजवळ एमआयडीसी चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली.
बाळू पवार (रा. आनंदनगर, चिंचवड) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मितेश यादव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील एका बोलेरो पिकपमध्ये ७० हजारांची ७०० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू आणि ५५० रुपये किंमतीचे इतर साहित्य बाळगले. याबाबत माहिती मिळाली असता, अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून बोलेरो पिकप, तयार दारू आणि इतर साहित्य असा एकूण पाच लाख ७० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com