शरीर सुदृढ असणं म्हणजेच वेलनेस!

शरीर सुदृढ असणं म्हणजेच वेलनेस!

सुदृढ शरीर हाच ‘वेलनेस’!

वेलनेस म्हणजे सुदृढ शरीर. फक्त शारीरिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही शरीर सुदृढ असणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्यास तुमचं शरीर कधीच सुदृढ राहू शकत नाही. त्यामुळं वेलनेसकडं तुम्ही जाऊच शकत नाही. त्यामुळं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तुमचं शरीर सुदृढ असणं म्हणजे वेलनेस होय. मी आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमित एक तास व्यायाम करतो व मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी नियमित मंदिरांमध्ये जातो. त्याचबरोबर मी मद्यपान, तंबाखू या गोष्टींपासून स्वतःला खूप दूर ठेवलं आहे. शरीराला उत्तम खुराक देणंही महत्त्वाचं आहे.
- देवदत्त नागे, अभिनेता
---
माझा आहार अतिशय सामान्य पद्धतीचा असतो. मला घरगुती जेवण प्रचंड आवडतं; कारण ते रोजच्या रोज ताजं बनवलेलं असतं. ते प्रक्रिया केलेलं नसतं. मी स्वतःही जेवण बनवतो. मला पूर्ण स्वयंपाक येतो. माझ्या मुलालाही जेवण बनवता येतं. त्यामुळं मी, माझी पत्नी किंवा मुलगा कोणीही जेवण बनवतो. घरगुती जेवणामुळं पौष्टिकता मिळण्यास मदत होते आणि ते जेवण बनवताना प्रोटिन्सचा स्रोत जास्तीत जास्त कसा मिळेल, याचा आम्ही विचार करतो. मला व माझ्या मुलाला व्यायाम करणं आवडतं. त्यामुळं आम्ही प्रोटिन्स जास्त प्रमाणात कसे मिळतील, याचा विचार करत असतो. तसेच, बऱ्याचदा शूटिंग किंवा इव्हेंट्समुळं जेवणाच्या वेळा चुकतात. त्यावेळी देखील आम्ही फळ किंवा प्रोटिन शेक्स ट्राय करतो. त्यामुळं स्नायूंना ताकद मिळते. आरोग्य सुदृढ राहण्यामध्ये आहाराची मोठी भूमिका आहे. त्यामध्ये प्रोटिन्स व कार्बोहायड्रेट्स समप्रमाणात असणं गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असावेत आणि तेलकट-तुपकट पदार्थही नेहमी टाळावेत. साखरेचा आपल्याला त्रास देऊ शकतो. त्यामुळं कमी साखर खाणं चांगलं आणि तुमच्या खाण्यात साखरेचं प्रमाण अधिक असल्यास तुम्ही तेवढा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे.

तणावमुक्तीसाठी व्यायाम
मानसिक शांततेसाठी मला सगळ्यात जास्त जे काही आवडत असेल ते म्हणजे माझ्या बाईक्स. त्यांच्याकडं पाहिलं तरी खूप मस्त वाटतं. मी कधी-कधी तणावाखाली असतो, त्यावेळी माझी कोणतीही एक बाईक काढतो आणि मस्त फेरफटका मारून येतो. प्रत्येक शनिवार-रविवारी कोणत्याही एका किल्ल्यावर गेलो, की आठवडाभर छान वाटतं. तुम्हाला फिरण्याची आवड असल्यास ती नक्कीच जोपासा, म्हणजे तुमचं मन खंबीर राहण्यासाठी मदत होईल. मी व्यायामाला सुरुवात केली, तेव्हा ‘ही-मॅन ः द मास्टर्स ऑफ द युनिव्हर्स’ ही सिरिज पाहायचो. ही-मॅन मला खूप आवडतो, ती मला प्रचंड आवडणारी एक कार्टून सिरीज होती.  मी मारुतीरायाच्या मंदिरात लहानपणापासून जातो. त्याच्याकडे बघून मला नेहमीच वाटायचे की, आपणही त्याच्यासारखं बलवान व्हावं किंवा सुपरमॅन, बॅटमॅन यांच्यासारखे हिरो व्हावं. यासर्वांना पिळदार शरीर लाभलं आहे. त्यामुळं मलाही वाटायचं, की आपणही त्यांच्यासारखं व्हावं. आरोग्याबाबत माझा खूप चांगला मित्र संग्राम चौगुले हा मला नेहमीच बऱ्याच गोष्टी सांगत असतो. आमची नेहमीच चर्चा होत असते. माझ्या शरीराकडं बघून लोक मला विचारत असतात, की तू स्टेरॉईड्स घेतो का किंवा प्रोटीन घेतो? पण मला सांगायचं आहे, की मी खूप आधीपासून व्यायाम करत असल्यामुळं माझं शरीर नैसर्गिकरित्या सुदृढ बनलं आहे. नैसर्गिक आहार आणि साधारण व्यायाम मी करत असतो. मशिनचा वापर करण्यापेक्षा साधा व्यायाम करा. जी मुलं जिममध्ये येतात आणि कमी वेळात, कमी कष्टांमध्ये त्यांना बॉडी हवी असते; पण ती दीर्घकाळ टिकत नाही. मी व्यायामासाठी ठराविक वेळ ठरवलेली नाही. मी कधी दुपारी, कधी रात्री तर कधी सकाळी व्यायाम करतो. कारण शरीराला ती सवय लावून ठेवलेली आहे. व्यायाम करताना आपल्याला बॉडी बिल्डिंगसाठी स्नायूंना ताण देण्याची गरज असते. त्यामुळं मी भर दुपारी देखील व्यायाम करतो. यासोबतच प्रोटिनयुक्त आहार घेतो.

परिपूर्ण व्यायाम गरजेचा
तुमची आवड कशात आहे, तुमचं मन कशानं प्रफुल्लित होतं, ते करा. जेणेकरून मनाला शांतता मिळेल आणि आपण आनंदी राहू. अगदी बागेत झाडांना पाणी घालताना किंवा झाडाला एखादे नवीन फूल आले, तरी मला खूप आनंद होतो. किंवा शांतपणे संगीत ऐकताना किंवा गिटार हातात घेतले तरी मला खूप छान व रिलॅक्स
वाटतं. ऋतुमानानुसार पिकणारी फळे नेहमीच आहारात घेतली पाहिजे. मी लहान मुलांना नेहमी सांगत असतो, की दोन गोष्टी तुमच्या आहारात नेहमी पाहिजेत, एक म्हणजे दूध आणि दुसरं फळं. त्यामुळं तुमच्या शरीराला व्हिटॅमिन्स मिळत असतात. त्यामुळे मी दिवसातून रोज एक प्रकारचे फळ तरी खातो. प्राणायाम आणि योगासने हा शारिरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी अविभाज्य घटक आहे. माझ्या व्यायामाची सुरुवात स्ट्रेचिंगनं करत असतो. काही योगासनं करतो, त्यामुळं मला मसल्स स्ट्रेच छान मिळतो. माझ्या व्यायामामध्ये मसल क्रॅम्स् येत नाहीत. तुम्ही दररोज वर्कआउट करत असताना प्राणायाम होतच असतो. ज्यांना जिममध्ये जाऊन हेवी वर्कआउट करता येत नसेल, त्यांनी घरी तरी थोडा वेळ का होईना प्राणायाम व योगासने करावीत. त्यामुळं तुमचं शरीर आतून आणि बाहेरून सुदृढ राहू शकतं. मी खूप कमी आणि सिलेक्टेड प्रोजेक्ट करत असल्यामुळं कुठल्या चित्रपटासाठी मला वजन कमी किंवा वाढवायची गरज पडली नाही. मी जे काही प्रोजेक्ट केले आहेत, त्यामध्ये मला डोळ्यासमोर ठेवूनच निवड करण्यात आली आहे. तुमची शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्त्व हेच तुमचं भांडवल असतं, हे मला वेळोवेळी जाणवलं आहे.
कुटुंबव्यवस्था आणि मित्र-मैत्रिणी यांच्या समवेत राहूनही आरोग्यावर बराच परिणाम होत असतो. तुम्ही आनंदी असल्यास तुम्हाला सभोवतालही आनंदी करता येतो. तुमच्यामुळं तुमचं कुटुंबही आनंदी असते. मी वर्कआउट करतो, त्यामुळं माझा मुलगाही वर्कआउट करत आहे. तो फिटनेसचा विद्यार्थी असून, अनेक गोष्टी मला सांगत असतो.

माझे आदर्श
फिटनेस आणि वेलनेसच्या बाबतीत मी दोन वास्तूंना माझा आदर्श मानतो. पेण येथील हनुमान व्यायामशाळा आणि अलिबाग येथील सार्वजनिक व्यायामशाळा. या दोन वास्तूंमुळे मी घडलो. या दोन वास्तूंमुळंच मी आजपर्यंत वर्कआउट करू शकलो आणि त्यांनीच मला पूर्णतः घडवलेलं आहे. या दोन वास्तूंना मी गुरू मानतो आणि त्यांना मंदिरच मानतो. अर्नोल्ड श्र्वार्झनेगर यांना पाहून मला प्रचंड आनंद होतो. त्यांची शरीरयष्टी पाहून मलाही त्यांच्यासारखी बॉडी बनवावी, असं वाटायचं. मी त्यांनाही आदर्श मानतो. बॉलिवूडमध्ये विद्युत जामवाल, जॉन अब्राहम, सलमान खान आणि शाहरूख खान यांनाही मी आदर्श मानतो. चांगला वर्कआउट करणारा प्रत्येक जण माझा आदर्श आहे.
------------------------
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com