

आयटीनगरी माण;
विकासाचे मॉडेल
जिल्हा, राज्य व केंद्र स्तरावरील एक ना अनेक पुरस्कार मिळविलेल्या किंबहुना आयटी व्हिलेज म्हणून नावारूपाला आलेल्या मुळशी तालुक्यातील माणगावच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवणाऱ्या उच्चशिक्षित, अष्टपैलू तसेच कार्यक्षम सरपंच म्हणून अर्चना सचिन आढाव यांनी गावात विकासकामांचा डोलारा उभा करून अल्पावधीतच जिल्ह्यात नव्हे तर राज्यसरकारने दखल घ्यावी, अशी आपल्या कार्याची झलक दाखवून दिली आहे. त्यामुळे विकासाचे मॉडेल म्हणून नावारूपाला आलेल्या आयटी व्हिलेज माण ग्रामपंचायतच्या कार्याचा डंका केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातही गाजत आहे. पर्यायाने या गावात झालेली नियोजित विकासकामे पाहण्यासाठी ‘यशदा’च्या माध्यमातून राज्याच्या अनेक जिल्ह्यातील ग्रामपथके शासकीय कमिट्या माणच्या अभ्यास दौऱ्यावर येऊन माणच्या विकास मॉडेलचे कौतुक करत आहेत.
- अर्चना सचिन आढाव, सरपंच, माण
गा वाच्या प्रत्येक वाडीवस्तीला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून एमआयडीसीकडे पाठपुरावा करून दहा लक्ष लिटर पाण्याची व्यवस्था केली. यामध्ये प्रामुख्याने भोईरवाडी व बोडकेवाडीसाठी एमआयडीसीचे पाणी देण्याचे नियोजन तसेच गावात काही ठिकाणी आरो प्लांट बसवून तसेच पूर्वीच्या सरपंचांनी उभारलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून गावकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येत असून, १५ टक्के मागासवर्गीय निधीतून लाभार्थींना सोलर पॅनल बसवून दिले आहेत. आदर्श गाव विकासाचे मॉडेल या संकल्पनेत माण गावच्या विकासात सर्व महिला पुरुष सदस्य गावातील जुनी जाणती मंडळी व मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन अर्चना आढाव यांनी गावच्या विकासाचा रथ मोठ्या हिरिरीने पुढे नेते आहेत. गावच्या रूढी, परंपरा व नव्या-जुन्या पिढीची सांगड घालत त्यांचे आदर्शवत कार्य समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणादायी ठरणारे आहे.
अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम
गावाला सुशिक्षित महिला सरपंच भेटल्याने गावात पहिल्यांदा सभांना महिलांची मोठी गर्दी जमू लागली. त्यातच महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अनेक शिबिरे, प्रशिक्षण व खेळ पैठणीचा असे उपक्रम जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन करण्यात आले. तर महिलांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी स्वतंत्र महिला जिम उभी करण्यात आली असून, त्यामध्ये योगा, प्राणायामचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. अनेक थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त गावात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन म्हणून सत्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. तसेच गावात शालेय मुलामुलींना स्वतंत्र वाचनालयाची व्यवस्था केली आहे. गावातल्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असून, त्यांचे विजेचे प्रश्न, पाणंद रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. या सर्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये गावातील सर्व लोकप्रतिनिधी आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य, महिला सदस्यांच्या सहकार्याने गावचा कारभार त्या यशस्वीपणे पुढे नेत आहेत.
राजकीय प्रवास
स्मितभाषी व पदवीधर असलेल्या अर्चना या गृहिणी म्हणून काम करत होत्या. त्यांचे पती सचिन आढाव यांना समाजसेवेची आवड होती. ते कुटुंबासह माण गावात व्यवसाय सांभाळत समाजकार्यात सक्रिय होते. सामाजिक कार्य करण्यासाठी एखादे पद हवे म्हणून ग्रामपंचायतीत प्रतिनिधित्व करण्याची त्यांची अनेक वर्षे इच्छा होती. कुटुंबात दिवंगत सासरे महिंद्र आढाव हे ग्रामपंचायत सदस्य तर कुटुंबातील चुलत सासू सिंधूबाई आढाव यांनीही गावचे सरपंचपद तसेच चुलत सासरे कांताराम आढाव यांनीही ग्रामपंचायत सदस्य म्हणून पद भूषविले होते. या सर्वांचा राजकीय वसा, वारसा पुढे नेण्यासाठी सचिन आढाव यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केले. परंतु थोड्या फार मतांनी अपयश आले तरीही ते खचून न जाता त्यांनी व्यवसाय व सामाजिक बांधिलकीने जोडलेल्या लोकांच्या पाठिंब्यावर बाजी मारली. जानेवारी २०२१ वॉर्ड क्रमांक सहामध्ये महिला आरक्षित जागा झाल्याने अर्चना या पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीला सामोऱ्या गेल्या. कुटुंबाचे
लोकांशी असलेले संबंध कामाला आले आणि पॅनेलमध्ये त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यातच सरपंचपदाची खुर्ची महिलेसाठी राखीव असल्याने सुसंस्कृत व सुशिक्षित उमेदवार मिळाल्याने पॅनेलप्रमुख मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर यांनी पॅनेलमधील सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या बहुमताने अर्चना यांना सरपंचपदाच्या खुर्चीवर बसविले. सभापतींनी संधी दिली आणि गावकऱ्यांची सेवा, विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली.
खुर्चीवर बसताच कामाला सुरुवात
सरपंचपदाचा कार्यभार हाती घेताच गावातील कचरा व्यवस्थापनासाठी अवघ्या सहा महिन्यांत गावातील वाड्या-वस्त्यांवरील कचरा संकलनासाठी सहा घंटा गाड्या खरेदी करून त्यांचे लोकार्पण केले. प्रत्येक वॉर्डात घरोघरी जाऊन ‘स्वच्छ भारत मिशन’चा नारा देत कचरा उचलला जातो. दोन कोटींच्या ग्रामनिधीतून अकरा हजार स्क्वेअर फुटाचे श्री कानिफनाथ मंदिर बहुउद्देशीय सभागृह बांधले. त्याचे लोकार्पण करून हा मल्टिपर्पज हॉल गावातील गोरगरीब नागरिकांना लग्नसमारंभ, साखरपुडा, बारसे, महिलांचे ओटीभरण, लहान मुलांचे नामकरण वाढदिवस अशा कार्यासाठी अत्यल्प दरात देण्यात येत आहे. ग्रामसभा व सांस्कृतिक कार्यक्रम देखील या हॉलमध्ये होतात.
गावातील ठळक कामे
माणमध्ये सर्व वाड्यावस्त्या तसेच गावठाणांतर्गत रस्ते सिमेंट कॉक्रिट व साइडला पेव्हिंग ब्लॉग बसवून फुटपाथ तयार करण्यात आले आहेत. बाजूला स्ट्रेट लाईटची व्यवस्था, रस्त्यांचे कामापूर्वी भूमिगत गटार कामे. पूर्वीची ओढ्या-नाल्यात उघडी सोडलेली सांडपाणी व्यवस्था बदलून गावामध्ये ९० टक्के भूमिगत बंदिस्त गटार लाइन टाकून सांडपाणी व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील मैलामिश्रित पाणी हे ग्रामपंचायतीने बांधलेल्या मैला शुद्धीकरण प्रकल्पात नेऊन त्यावर प्रक्रिया करून दररोज १५ लक्ष लिटर मैला शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करणारी माण ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असावी. २०१७/१८ मध्ये अंदाजे सात कोटी रुपयांच्या या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतीने उभारलेले असे प्रकल्प व भरीव व तंत्रशुद्ध काम पाहून खासदार ही आश्चर्य चकित झाल्या.
कोरोना काळात खबरदारी
संपूर्ण जगभरात कोविड १९ या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले होते. सर्व जगच जणू थांबले होते. मात्र, या महामारीच्या संकटकाळात रात्रंदिवस नियोजन करून गाव तसेच सोसायट्यांमधील कोरोना थोपविण्यात आढाव यांनी मोलाची भूमिका बजावली. त्याची दखल राज्यसरकारने घेतली आहे. गावात कोरोना रुग्ण व कोरोना संसर्ग पसरू नये, यासाठी निर्जंतुकीकरण, अन्नछत्रालयामार्फत भोजन व्यवस्था, प्राथमिक उपचार, प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून संकटकाळी मदतकार्य या गोष्टींवर भर देत सर्वांच्या सहकार्याने गावाला या संकटकाळात दिलासा दिला. एवढेच नव्हे तर गावात कोविड टेस्ट सेंटर उभारले. आयटी पार्कमुळे बाहेरून कामासाठी आलेल्या मजूर किंवा लेबर किंवा भाडेकरूंची संख्या जास्त असल्याने स्थानिक गावकऱ्यांसह त्यांनाही आरोग्यचे कीट वाटप केले, गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप केले. सॅनिटायझर, मास्क, ग्लब्ज, डेटॉल साबण, हॅन्डवॉश असे किट घरोघरी वाटप केले. गावात संसर्ग पसरू नये, यासाठी सुरक्षित झोन तयार करून नागरिकांना घरात सुरक्षित ठेवले. संपूर्ण गावात दैनंदिन हायपोक्लोराईडची निर्जंतुकीकरण फवारणी सुरू ठेवली होती. गावातील वयोवृद्ध नागरिकांना आर्सेनिक, झिंग व कॅल्शिअम गोळ्यांचे वाटप चालू होते. प्रत्येक घरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत होती. यासाठी पथके तयार करून गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केला. ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने गावात लसीकरण मोहीम सुरू करून ती प्रत्येक वाडीवस्तीवर लस पोचविली व गाव कोरोना मुक्त करून राज्यात कोविड मुक्त गाव हा राज्य सरकारचा पुरस्कार पटकाविला.
पुरस्काराने कार्याची दखल
समाजाभिमुख कार्याची दखल घेत राज्याचे महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा आर. आर. पाटील ‘सुंदर गाव’ हा दहा लाखांचा पुरस्कार त्यांच्या माध्यमातून गावाला मिळाला. कोरोनामुक्त स्पर्धेत जिल्ह्यात माणगाव अव्वलस्थानी ठरल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोरोनामुक्त गाव पुरस्कार पटकाविला. यंदा स्वच्छ भारत मिशन स्पर्धेत माण ग्रामपंचायतीची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा, आदर्श कृषिग्राम, यशवंत पंचायतराज, केंद्र स्तरावरील पंचायत सशक्तीकरण, ग्रामस्वच्छता अभियानमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्व. आबासाहेब खेडेकर कुटुंब कल्याण असे जिल्हास्तरावर राज्य व विभागीय स्तरावरील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले असल्याने हे सर्व पुरस्कार माणच्या वैभवशाली परंपरेत व शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार
महिलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या न्याय हक्काबाबत जागृती, महिला सबलीकरण धोरणांतर्गत महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना हॅन्ड एम्ब्रॉयडरी, कापडी पिशव्या, शिवणकला, कार ड्रायव्हिंग प्रशिक्षण, मोफत वाहन परवाना, महिलांच्या सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी योगा प्रशिक्षण, मुलींसाठी कराटे क्लासेस व शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासिका वर्ग सुरू केले आहे.
शैक्षणिक सुविधा
सीएसआर निधीतून भोईरवाडी शाळा इमारतीचे बांधकाम करण्यात आले. तसेच वाढती विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन ग्रामनिधीतून जिल्हा परिषद शाळेसाठी माणमध्ये नविन प्रशस्त इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. सर्व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश, टाय, बेल्ट, शूज, खेळाचे साहित्य, शिष्यवृत्ती पुस्तके, इत्यादी दरवर्षी शालेय विषयी साहित्य पुरवठा करण्यात येतो.
दुर्बल घटकांचा विकास
गावातील १३० दिव्यांगांना दरवर्षी शेती किंवा उद्योग व व्यवसायासाठी किंवा औषधोपचारासाठी किंवा विविध व्यवसाय साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी दोन लाख याप्रमाणे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. १० टक्के महिला व बालकल्याण निधीतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा निराधार किंवा विधवा किंवा परितक्त्या महिलांना व्यवसायासाठी प्रत्येकी एक लाख अनुदान तसेच ५५ वर्षांवरील निराधार महिलांना औषधोपचारासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे अनुदान, गावातील मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मुलीचा जन्म झाल्यावर कन्यारत्न योजनेतून प्रत्येक मुलीचे स्त्री जन्माचे स्वागत म्हणून १५ हजार रुपये अनुदान योजना घरोघरी पोचविल्या. गरीब कुटुंबांतील मुलींच्या लग्नात झालेल्या खरेदीसाठी योजनेतील लाभार्थी मुलीला ७० हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येत आहे.
राज्य पातळीवर दखल
माण ग्रामपंचायतीने केलेल्या वैशिष्टपूर्ण विकास कामांची पाहणी करण्यासाठी वेळोवेळी राज्याच्या, वेगवेगळ्या भागांतून शासकीय प्रशिक्षण घेणारे अधिकारी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, कार्यकारिणी कमिटी स्वेच्छेने सरकारच्या यशदा संस्थेतर्फे माण ग्रामपंचायतीस भेट देतात. या अभ्यास दौऱ्यावर आल्यावर येथे केलेल्या नियोजनबद्ध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कौतुक करतात व हे मॉडेल आपल्या जिल्ह्यात कसे राबविता येईल याचा अभ्यास करतात.
पतीची मोलाची साथ
पती सचिन आढाव यांनी गरिबीचे चटके सहन केले, मोठ्या हाल अपेष्टेतून प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करत त्यांनी व्यवसायात उत्तम जम बसवला. व्यवसाय सांभाळत समाजाशी नाळ जोडली. घरच्या प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सावरत स्वतःसोबत इतरांच्या अडीअडचणी सोडवत समाजाशी नाळ जोडली. पतीच्या समाजसेवेचा वसा पत्नीने मोठ्या जबाबदारीने कायम जपला आहे. समाजाभिमुख काम करत समाजाच्या सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी झोकून देत काम करत आहेत. सर्व समाजाला सोबत घेऊन अर्चना आढाव यांनी आयटीनगरीतील आयटी व्हिलेज माणगावच्या सरपंच म्हणून चोख कामगिरी बजावत आहेत. या सर्व कामात त्यांना पती सचिन आढाव हे देखील भक्कमपणे साथ देत आहेत. त्यामुळे विकासकामांच्या नियोजनात पतीची देखील मोलाची साथ मिळत आहे.
गावच्या सौंदर्यात भर
ग्रामपंचायत हद्दीतील वाड्यावस्त्यांतर्गत विविध ठिकाणी अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण स्मशानभूमीची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच लांब राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामनिधीतून वैकुंठरथ खरेदी करून तो गावातील वाडी-वस्त्यावरील नागरिकांना उपलब्ध करून दिला. स्मशानभूमीत बैठक व्यवस्था, मुबलक पाणी व दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातून वाहणाऱ्या नाल्याचे सुशोभीकरण करून माणच्या सौंदर्यात भर टाकली आहे. ओढ्याच्या कडेने रिटेनिंगवॉल बांधण्यात आली आहे. त्यामुळे ओढ्याचे पाणी घरांमध्ये शिरणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. गावात महत्त्वाच्या ठिकाणी, शाळा, अंगणवाडी, मुख्य चौक इत्यादी ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.