
पुलाचे काम करण्याची चांदखेड ग्रामस्थांची मागणी
सोमाटणे, ता. १ ः चांदखेड पुलाचे काम रखडल्याने अपघाताचा धोका कायम असून, पुलाचे काम त्वरित करण्याची मागणी चांदखेड ग्रामस्थांनी केली.
चांदखेड हे गाव पवनमावळ पूर्व विभागातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असून, कासारसाईमार्गे ते हिंजवडी आयटी पार्कला जोडलेले महत्त्वाचे गाव असल्याने गेल्या दशकापासून येथे मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. त्यामुळे पूर्वीचा लहान रस्ता वाहतुकीस कमी पडल्याने वाढलेल्या रहदारीचा विचार करून
शासनाच्यावतीने गेल्या तीन वर्षापूर्वी सोमाटणे, चांदखेड, कासारसाई या मार्गाच्या रस्त्याच्या दुपदरी रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले होते. सध्या या रस्त्याचे काम अंतिम टप्यात आले असूनही चांदखेड पुलाचे काम सुरु न केल्याने अपघाताचे सत्र कायम सुरुच आहे. पुलावरचा रस्ता अत्यंत अरुंद असून, पुलास कठडे नसल्याने उतारावरून पुला़च्या दिशेने आलेल्या वाहनचालकाला अरुंद पुलाचा अंदाज न आल्याने नेहमी येथे अपघात घडतात. यापूर्वी या पुलावरील अपघातात तिघांना जीव गमवावा लागला. हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक असल्याने त्याचे काम तातडीने सुरु करावे, अशी मागणी चांदखेड ग्रामस्थांनी केली आहे.
फोटो ः १५३८६
-------------------------------------------------------------------------------------