शहरात विविध उपक्रमांनी बालिका दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात विविध उपक्रमांनी बालिका दिन साजरा
शहरात विविध उपक्रमांनी बालिका दिन साजरा

शहरात विविध उपक्रमांनी बालिका दिन साजरा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ ः शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी घेतलेला बालिका आनंद मेळावा. भेळ, इडली, पाणीपुरी, मसाला दूध, पोहे. खाऊची दुकाने सजविले होते. सावित्रीबाईंच्या वेशभूषेमध्ये त्यांच्या प्रसंगांचे नाट्यीकरण... प्रत्यक्ष जात्यावर दळण दळून त्यांच्या ओव्या गाण्यात आल्या. ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय...’ यातून सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडण्यात आला. निमित्त होते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे. यावेळी विविध उपक्रमांनी बालिका दिन साजरा करण्यात आला.

यशस्वीमध्ये आनंद मेळावा
यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालिका दिन आनंदी व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनबरोबरच पालकांनीही आनंद मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थिती दर्शवली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील गौरी तुपारे, अंकिता तेलंगे, गायत्री हरणे, गायत्री जाधव या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची माहिती आपल्या मनोगतमध्ये सांगितली. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.

एच. ए. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात भरली सावित्रीबाईंची शाळा
हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या प्राथमिक शाळेत आगळ्या वेगळ्या स्वरूपात बालिका दिन साजरा केला. बालिका दिनानिमित्त शाळेतील बऱ्याच विद्यार्थिनी सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेमध्ये होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्या चव्हाण यांनी मुलांना सावित्रीबाई फुले यांची माहिती सांगितली. यावेळी सावित्रीबाई बनवून आलेल्या मुलींनी सावित्रीबाईंच्या जीवनातील प्रसंगांचे नाट्यीकरण सादर केले. याप्रसंगी सावित्रीबाईंच्या जीवन चरित्रावर गाणी गाऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

गीता मंदिरात प्रत्यक्ष जात्यावर दळण
चिंचवड येथील गीता मंदिर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक महेंद्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषा केल्या होत्या. माहिती, भाषण गाणी, चारोळ्या यातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. प्रत्यक्ष जात्यावर दळण दळून फुले यांच्या ओव्या गाण्यात आल्या. ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ यातून त्यांचा जीवनपट उलगडण्यात आला. संयोजन ज्योत्स्ना वाव्हळ यांनी केले. सूत्रसंचालन अभिलाषा घाडगे या विद्यार्थिनीने केले. संगीता शहासने, चंदा नामदे, मंदा कोकरे, राजश्री गायकवाड, सुनीता धोंडगे सर्व शिक्षक कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.