ध्येयवादी व जनसामान्यांचा लोकनेता हरपला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ध्येयवादी व जनसामान्यांचा लोकनेता हरपला
ध्येयवादी व जनसामान्यांचा लोकनेता हरपला

ध्येयवादी व जनसामान्यांचा लोकनेता हरपला

sakal_logo
By

पिंपरी ः ‘ध्येयवादी व जनसामान्यांचा लोकनेता हरपला,’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांसह खासदार, आमदार, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका आदींचा समावेश आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता महापालिकेचे कामकाज आज बंद ठेवण्यात आले.

- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ ः अतिशय कमी वयात लक्ष्मण जगताप नगरसेवक झाले. नगरसेवक ते आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. विधानपरिषद आणि विधानसभेचेही ते सदस्य झाले. ते महापौर असताना मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो. काही काळापुरते राजकीय मतभेद असतील. परंतु, शहराच्या जडणघडणीत, विकासात त्यांचे मोठे योगदान होते. सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचे कार्य, त्यांचा सहवास सदैव लक्षात राहील. त्यांच्या जाण्याने शहराची मोठी हानी झाली आहे. कर्ततृत्वान नेता काळाच्या आड गेला आहे..
- महेश लांडगे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार, भोसरी ः भारतीय जनता पक्षाचे नेते, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘बाहुबली’ आमदार आणि माझे मार्गदर्शक लक्ष्मण जगताप यांनी तब्बल ३५ वर्षे शहराच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. शहराच्या यशस्वी वाटचालीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा झुंजार लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. एका ध्येयवादी, दूरदृष्टीच्या नेत्याला आपण मुकले आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.
- अण्णा बनसोडे, आमदार, पिंपरी ः आमदार लक्ष्मण भाऊंच्या जाण्याने शहराचे मोठे नुकसान झाले आहे. ही पोकळी कधीही भरून न येणारी आहे. एक दृष्टा नेता हरपल्याची खंत जनसामान्यांमध्ये आहे. भाऊ दूरदृष्टी असलेले लोकनेते होते. ते नेहमीच शहराच्या विकासासाठी काय करता येईल यासाठी नवनवीन योजना व कल्पना आखत.
- सुनील शेळके, आमदार मावळ ः विधिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी लक्ष्मण जगताप यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. आदरणीय शरद पवार व अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये लक्ष्मणभाऊंनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत मोलाचे योगदान दिले. आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.
- बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री ः आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने कुटुंबीय आणि भारतीय जनता पक्षाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या ज्येष्ठ बंधुला आम्ही गमावले आहे.
- गौतम चाबुकस्वार, माजी आमदार, पिंपरी ः गेल्या ४२ वर्षांपासून भाऊंचा व माझा संबंध आहे. शहराच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. चांगला नेता व मित्र आम्ही गमावला आहे. स्थायी समिती सभापती व महापौर असताना शहराच्या विकासाचे चांगले निर्णय भाऊंनी घेतले आहेत.
- उषा ढोरे, माजी महापौर ः भारतीय जनता पक्षाचा सक्षम विकास पुरुष हरपला आहे. लक्ष्मण भाऊंनी कायम शहर विकासाचे स्वप्न पाहिले. बोलण्यापेक्षा कृतीला अधिक महत्त्व त्यांनी दिले. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम प्रयत्न करत राहिले. आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना त्यांचा खूप मोठा आधार होता.
- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस ः शहराच्या विकासासाठी गेली ३५ वर्षे सातत्यपूर्ण प्रयत्न करणारे आणि समाजनिष्ठ, ध्येयवादी जनसामान्यांचे लोकनेते असा भाऊंचा परिचय होता. त्यांनी शहराच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत मोलाचे योगदान दिले. जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारा ध्येयवादी लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे.
- अमित गोरखे, प्रदेश सचिव, भाजप ः उमदा नेता, धाडसी नेतृत्व, कधीच युद्धात माघार नाही अशी साहसी वृत्ती असलेला नेता, अभ्यासू आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणारा कर्तव्य दक्ष नेता हरपला आहे. ही पोकळी पिंपरी-चिंचवडमध्ये भरून न येणारी आहे.
- चेतन बेंद्रे, कार्यकारी शहराध्यक्ष, आम आदमी पक्ष ः जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारा नेता, अतिशय लढाऊ व ध्येयवादी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार जगताप सर्वांच्या स्मरणात
राहतील. कार्यक्षम आणि कर्तृत्ववान नेता हरपल्याने शहराचे मोठे नुकसान झाले आहे.
--
महापालिकेचे कामकाज बंद
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे कामकाज मंगळवारी बंद ठेवण्यात आले. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली आहे. जगताप हे १९९२ पासून शहराच्या राजकारणात सक्रिय आहेत. तीन वेळा नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर अशी पदे त्यांनी भूषविली आहेत. एक वेळ विधान परिषद सदस्य, तीन वेळा विधानसभा सदस्य अशी त्यांची कारकीर्द आहे. तसेच, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेने पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारकात विचार प्रबोधन पर्व आयोजित केले होते. त्यातील सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले.
----

.....