मिळकत कर विभागातील तक्रारींची दखल ‘सकाळ’मधील वृत्तमालिकेचा परिणाम ः विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पालिका आयुक्तांना कार्यवाहीचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिळकत कर विभागातील तक्रारींची दखल
‘सकाळ’मधील वृत्तमालिकेचा परिणाम ः विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पालिका आयुक्तांना कार्यवाहीचे आदेश
मिळकत कर विभागातील तक्रारींची दखल ‘सकाळ’मधील वृत्तमालिकेचा परिणाम ः विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पालिका आयुक्तांना कार्यवाहीचे आदेश

मिळकत कर विभागातील तक्रारींची दखल ‘सकाळ’मधील वृत्तमालिकेचा परिणाम ः विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पालिका आयुक्तांना कार्यवाहीचे आदेश

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकत कर विभागातील मूळ अभिलेख गायब करणे, चुकीची आकारणी आदी गैरकारभाराच्या तक्रारींची व ‘सकाळ’ ने दिलेल्या वृत्त मालिकेची दखल विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतली आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना देण्यात आले आहेत.
मिळकत कर विभागातील गैरकारभारांची चार भागांची वृत्त मालिका ‘सकाळ’ ने १८ ते २१ डिसेंबर २०२२ दरम्यान प्रसिद्ध केली होती. तसेच; डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपसह २२ नागरिक, संस्था व संघटनांच्या लेखी व मेलवरील तक्रारींचीही विभागीय आयुक्त कार्यालयाने दखल घेतली.
डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपने २९ नोव्हेंबर २०२२ रोजी लेखी पत्र दिले होते. त्यानंतर ‘सकाळ’ मधील वृत्तमालिकांमधील बातम्या
२८ डिसेंबर २०२२ रोजी ई-मेलद्वारेही त्यांनी पाठविल्या होत्या. याबाबत डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना भेटून चौकशी व कारवाईची मागणी केली.
महापालिका मिळकत कर विभाग एकीकडे कर न भरल्यास नागरिकांच्या टी. व्ही., फ्रिज आदी वस्तू जप्त करण्याचे इशारे देत आहे तर; दुसरीकडे याच विभागात भ्रष्टाचार व गैरकारभार होत आहे. परंतु; त्यांच्यावर काही कारवाई होत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.
दरम्यान, एका लिपिकाची बदली करून, पुन्हा त्याची बदली करू नका, असा अहवाल दिल्याप्रकरणी महापालिका आयुक्त सिंह यांनी मिळकत कर विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांना नोटीस दिली आहे.वरिष्ठांकडून बघ्याची भूमिका?
महापालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अनेक नियमबाह्य व बेकायदेशीर कामकाज समोर येवू लागले आहे. करसंकलन विभागाकडून सर्वसामान्य नागरिकांवर एक लाख रुपये वसुलीसाठी घरांच्या जप्तीची कारवाई करत आहेत. मात्र, चिखलीतील एका बड्या उद्योजकांच्या मिळकतीचा सुमारे दीड कोटी रुपये कर माफ केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या मिळकतीच्या मूळ नस्ती, प्रस्ताव अधिकाऱ्यांनी गायब केला आहे. त्यामुळे करसंकलनाचे अनेक अधिकारी अर्थपूर्ण वाटाघाटीने पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारत आहेत. त्यातून स्वत:चे खिसे भरू लागल्याचे दिसत आहे. याकडे आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील हे कारवाई न करता बघ्याची भूमिका घेवू लागले आहेत, असेही कदम यांनी राव यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

नियमबाह्य कामकाज

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाकडून शहरातील मिळकतीचे करयोग्यमूल्य निश्चित केले जाते. त्यानुसार निवासी आणि बिगरनिवासी अशी वर्गवारी करून, प्रति चौरस फुटावर करआकारणी करत तो वसूल केला जातो. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात १७ विभागीय कार्यालयाद्वारे कामकाज केले जाते. त्या विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने नियमबाह्य कामकाज करू लागले आहेत, असेही तक्रारीत नमूद केले आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी कर संकलन विभागातील गैरव्यवहारांची चौकशी करून, दोषींवर कारवाई करणार असल्याचे व दोषी असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिल्याचे माध्यमांना सांगितले होते. याबाबत सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांना विचारले असता, याबाबत आपणाला काही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडे नागरिकांच्या तक्रारी गेल्यानंतर प्रशासकीय कार्यवाहीनुसार महापालिकेकडे त्या वर्ग केल्या जातात. त्यानुसार हे पत्र आले आहे. मिळकत कर विभागाचे सहायक
आयुक्त नीलेश देशमुख यांना मी वेगळ्या प्रकरणात कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.

फोटोः 16315