
मोशीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन
पिंपरी, ता. ५ : पुणे कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १५ जानेवारी २०२३ या दरम्यान Constro २०२३ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १२ तारखेला दुपारी तीन वाजता होणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी (ता. ५) देण्यात आली.
हे प्रदर्शन मोशी येथील अद्ययावत पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲंड कन्वेशन सेंटर येथे आयोजित केले आहे. त्याबाबतची माहिती आकुर्डीमधील पीएमआरडीए कार्यालयात देण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेला आयुक्त राहुल महिवाल, पीसीईआरएफचे अध्यक्ष विश्वास लोहकरे, उपाध्यक्ष जयंत इनामदार, जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप उपस्थित होते. प्रदर्शनात निर्माण क्षेत्रातील अत्याधुनिक वस्तू, उपकरणे, प्रणाली व तंत्रज्ञान यांची माहिती मिळेल. हे प्रदर्शन निर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी मोठी पर्वणी आहे. प्रदर्शनास राज्यातील निर्माण क्षेत्रात कार्यरत असणारे व्यावसायिक तसेच, वास्तू रचना व स्थापत्य शास्त्रचे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात भेट देणार आहेत. स्टॅच्यु ऑफ युनिटी आणि काही उड्डाणपुलाचे व्हिडिओ दाखविले जाणार आहेत.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने निर्माण क्षेत्राशी निगडित विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित केले आहे. ज्यामध्ये विविध विषयांतील तज्ज्ञ मंडळी त्यांचे विचार मांडतील. प्रदर्शनात तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक देण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. तिथे सुरक्षेविषयी प्रात्यक्षिकही केले जाईल. याप्रसंगी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष निमेश पटेल व पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांची उपस्थिती असणार आहे. प्रदर्शनावेळी Virtual Constro Exhibitionचे ही उद्घाटन होईल. सर्वाधिक भर पेपरलेस प्रदर्शनावर असणार आहे. आत्मनिर्भर भारत हे प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे.