शहरात दीड लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात दीड लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक
शहरात दीड लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक

शहरात दीड लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक

sakal_logo
By

पिंपरी : बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. पिंपरीतील वल्लभनगर येथे केलेल्या या कारवाईत दीड लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी लखन ऊर्फ गोविंद तात्या काळे (वय २८, रा. मु. पो. मुरुड, जि, लातूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर सुनील बाबू काळे (रा. मौजे कळम, ता. कळम, जि. उस्मानाबाद) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी लखन याच्याकडे गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून लखन याला वल्लभनगर बसथांबा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक लाख ५६ हजार २५० रुपये किमतीचा सहा किलो २५ ग्राम गांजा सापडला. विक्री करण्यासाठी त्याने गांजा जवळ बाळगला. हा गांजा सुनील यांच्याकडून आणला असल्याचे लखन याने सांगितले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

महिलेशी गैरवर्तनप्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा
महिलेशी गैरवर्तन करीत त्यांच्या अंगावर धावून गेल्याने एका रिक्षा चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडला. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या त्यांची बहीण व बहिणीची मुलगी अशा तिघी पिंपरी रेल्वे स्थानक येथे आल्या. त्या पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा स्टॅन्डजवळ आल्या असता एका रिक्षाची फिर्यादी यांच्या बॅगला धक्का लागला. त्यावर फिर्यादी या रिक्षाचालकास ‘रिक्षा नीट चालवता येत नाही का’ असे म्हणाल्या. तो काहीही न बोलता निघून गेला. परंतु त्याठिकाणी उभा असलेला रिक्षाचालक फिर्यादीकडे पाहून हसला. तसेच जा, जा तुझी काय औकात आहे, असे म्हणत फिर्यादीच्या अंगावर धावून गेला. लोकांसमोर फिर्यादीचा हात पकडून विनयभंग केला. दरम्यान, फिर्यादीने त्यास ढकलून दिले असता त्याचा राग मनात धरून आरोपी दगड घेऊन मारण्यासाठी फिर्यादी यांच्यावर धावून आला. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

फसवणूकप्रकरणी दोघांवर गुन्हा
विकसन करारनामा केल्याप्रमाणे जागेवर बांधकाम पूर्ण करून न देता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार निगडीतील दत्तनगर येथे घडला. याप्रकरणी अभिमन्यू एकनाथ काळोखे (रा. दत्तनगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार सत्यविजय हेडा (वय ४२, रा. सुखवानी रेसिडेन्सी, दापोडी) व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कस्तुरी डेव्हलपर्स तर्फे तुषार हेडा याने फिर्यादी यांच्यासोबत विकसन करारनामा केला. त्यानंतर करारनामामधील अटी शर्तीचा भंग करून फिर्यादीच्या जागेवर बांधकाम पूर्ण करून न देता फिर्यादीची फसवणूक केली. त्यांचे आर्थिक नुकसान केले. याबाबत त्यास विचारणा केली असता तुम्ही या जागेवर कसे बांधकाम करता, असे धमकावीत आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

देहूत दुकान फोडून एक लाख ९१ हजारांचा माल चोरीला
पत्रा उचकटून दुकानात शिरलेल्या चोरट्याने एक लाख ९१ हजार रुपये किमतीचा माल चोरला. हा प्रकार देहूगाव येथे घडला. याप्रकरणी अशोक मधुकर हाटवटे (रा. परंडवाल चौक, देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे देहूगाव येथील नवीन बायपास रोडला हार्डवेअरचे दुकान आहे. हे दुकान बंद असताना मागील बाजूचा पत्रा उचकटून चोरटा दुकानात शिरला. लाकडी रॅकमध्ये ठेवलेला एक लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचा माल चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा
घरात शिरून महिलेशी गैरवर्तन करीत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीष बोराडे (रा. काटेपुरम चौक, सांगवी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फिर्यादी या घरी एकट्या झोपलेल्या असताना आरोपी घरी आला. त्यांच्याशी गैरवर्तन केले. दरम्यान, फिर्यादीने त्याला ढकलून दिले असता त्याने पुन्हा
त्यांच्याशी गैरवर्तन केले. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.