गुन्ह्यांची ‘हजारी’

गुन्ह्यांची ‘हजारी’

Published on

पाच पोलिस ठाण्यांतील स्थिती; दरदिवशी सरासरी तीन गुन्हे
गुन्ह्यांची ‘हजारी’

पिंपरी, ता. ६ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण, पिंपरी, भोसरी, हिंजवडी व वाकड या ठाण्याच्या हद्दीत गतवर्षी गुन्ह्यांनी हजारी पार केली. या ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक हजार पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असून लूटमार, फसवणूक, वाहन चोरी, कौटुंबिक हिंसाचार या प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. दरदिवशी सरासरी तीन गुन्हे दाखल झाले असून ही बाब चिंताजनक आहे. पोलिसांनी गुन्हे रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या ठाण्यांच्या हद्दीत मिश्र लोकवस्ती, औद्योगिक भाग, झोपडपट्टी असल्याने नागरिकांची संख्याही अधिक आहे. यामुळे वेगवेगळ्या कारणांवरून गुन्हे घडत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. मात्र, इतर ठाण्यांच्या तुलनेत या पाच ठाण्यामध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण दीडपट, दुप्पट इतके आहे.

या भागात कंपन्या असून येथे मोठ्या प्रमाणात कामगार आहेत. हे कामगार कामावरून रात्रीच्या वेळी घरी परतताना लुटमारीच्या घटना घडतात. यासह कंपन्यांतील माल चोरीला जाण्याचेही अनेक प्रकार घडतात. पगाराच्या कालावधीत चोरीचे प्रमाण अधिक घडते.

भोसरी
विविध कंपन्यांसह मोठ्या सोसायटी, दहा झोपडपट्ट्याही आहेत. दाखल गुन्ह्यांमध्ये चोऱ्या, ऑनलाइन फसवणूक, कौटुंबिक हिंसाचार यासारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात. सुमारे साडे पाच लाख लोकसंख्या या ठाण्याच्या हद्दीत असून तीन चौक्या आहेत.

हिंजवडी
या हद्दीत बारा मोठी गावे असून आयटी पार्कसह औद्योगिक परिसरही असल्याने मजुरांची संख्या अधिक आहे. तसेच एक महामार्गही आहे. ऑनलाइन फसवणूक, अपघात, वाहन चोरीचे सर्वाधिक गुन्हे घडले आहेत. सुमारे नऊ लाख लोकसंख्या या हद्दीत असून तीन पोलिस चौकी आहेत.

वाकड
मोठमोठ्या सोसायट्या उभ्या राहत असून नागरीकरण वाढतेय. चार झोपडपट्टी आहेत. मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, वाहन चोरी, फसवणूक यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. सुमारे आठ लाख लोकसंख्या असून चार पोलिस चौकी आहेत.

चाकण
भौगोलिक हद्द खूप मोठी आहे. औद्योगिक परिसर असल्याने कंपन्यांची संख्याही अधिक आहे. परराज्यातील लोक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून कामगारांची संख्याही जास्त आहे. या ठाण्याच्या हद्दीत लूटमार, किरकोळ कारणांसह जमिनीच्या वादातून भांडण असे प्रकार वारंवार घडत असतात.

पिंपरी
हद्दीत मिश्र लोकवस्ती असून झोपडपट्टीची संख्याही अधिक आहे. गुन्हेगारी घटनांसह अपापसातील भांडणातून गुन्हे दाखल होत असतात. टोळक्याकडून तोडफोडीच्या घटनाही घडल्या आहेत. आंदोलनेही होत असतात.

गस्त वाढविण्याची गरज
वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवण्यासह गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
----------
पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करून घेत असल्याने दाखल गुन्ह्यांची संख्या अधिक दिसते. यासह लोकसंख्या वाढल्याने काही प्रमाणात गुन्हेही वाढत असून यामध्येही ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे.
- पद्माकर घनवट, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.
---------------------------

२०२२ मध्ये दाखल झालेले गुन्हे
पोलिस ठाणे-दाखल गुन्हे
पिंपरी - ११३९
हिंजवडी -१२६५
वाकड - ११०२
चाकण -१९८६
भोसरी - १०६१
देहूरोड -७७३
निगडी -८७६
चिखली - ७०६
एमआयडीसी भोसरी - ७४५
सांगवी - ५९१
आळंदी - ३९३
तळेगाव दाभाडे - ५४५
चिंचवड - ५८०
शिरगाव -१२१
दिघी - ५६८
रावेत - १५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com