फौजी असल्याची बतावणी करून एकाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फौजी असल्याची बतावणी करून एकाची फसवणूक
फौजी असल्याची बतावणी करून एकाची फसवणूक

फौजी असल्याची बतावणी करून एकाची फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी : फौजी असल्याची बतावणी करून एकाची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार आळंदी येथे घडला. याप्रकरणी अजय मगर, विलास सोडक या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर विलास धोंडू चव्हाण (रा. काटे कॉलनी, संस्कार रेसिडेन्सी, चोविसावाडी, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे घरी असताना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला. मात्र, त्यांनी उचलला नाही. नंतर त्यांनी त्या नंबरवर फोन केला असता आरोपीने ‘मी एक फौजी असून सध्या देवळाली कॅम्प, नाशिक येथे ड्यूटीवर आहे. पोस्टिंग झाल्याने माझी दुचाकी विकायची असून माझे नाव शिपाई अजय मगर असल्याचे सांगितले. त्यानंतर गाडीचे फोटो, फौजी असल्याचे फोटो, कॅन्टीन ओळखपत्र व आधारकार्ड पाठवत फौजी असल्याची बतावणी केली. तसेच त्याचा एजंट विलास सोडक याने गाडी आर्मी पोस्टाने येणार असून अजय याची गाडी देतो, असे सांगत फसवणूक केली. त्यासाठी फिर्यादीला अजय याच्या फोन पे वर पैसे पाठवण्यास सांगितले असता त्यांनी ४२ हजार ५५० रुपये पाठवले. मात्र, तरीदेखील गाडी पाठवली नाही. आरोपींनी त्यांची ओळख लपवून फिर्यादीची ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. उपेंद्र इंद्रजित यादव (वय २६, रा. हिंजवडी, मूळ - गोरखपूर, उत्तरप्रदेश) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मोठे भाऊ विमलेश यादव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्राच्या दुचाकीवरून साताराकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. दरम्यान, मुळा नदीच्या पुलावर आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पैसे तिप्पट होण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक
गुंतवणूक केल्यास एका महिन्यात तिप्पट पैसे होण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केली. हा प्रकार माणगाव येथे घडला. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील संजय ब्रह्मे (रा. उमरेर रोड, दिघोरी, नागपूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने त्याच्याकडे एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असल्याचे फिर्यादीला सांगितले. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास एका महिन्यात गुंतवणुकीतील पैसे तिप्पट होणार असल्याचे आमिष फिर्यादीला दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांनी आठ लाख रुपये गुंतवणुकीसाठी पाठवले. मात्र, अद्यापपर्यंत फिर्यादी यांना कोणताही प्रॉफिट अथवा पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार माणगावातील भोईरवाडी येथील रामा मिलान्ज रेसेडेन्सेस येथे घडला. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरी येथे घडला. याप्रकरणी पंधरा वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोळा वर्षीय मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यास फिर्यादीने नकार दिल्यानंतरही आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यामध्ये फिर्यादी गर्भवती राहिली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

वर्क व्हिसा काढून देण्याच्या नावाखाली दाम्पत्याची फसवणूक
कॅनडा येथील वर्क व्हिसा काढून देण्याच्या नावाखाली पैसे घेतले. मात्र, नंतर व्हिसा काढून न देता दाम्पत्याची सात लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार कात्रज येथे घडला. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार वनराज ऊर्फ पुष्कराज यश भाटे (रा. गणेश अपार्टमेंट, संतोषनगर, कात्रज) व एक महिला यांनी फिर्याद दिली आहे. महिला आरोपी व तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या भाटे यांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या पतीला कॅनडा येथील वर्क व्हिसा काढून देण्याचे सांगितले. त्यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी सात लाख ५८ हजार रुपये घेतले. मात्र, नंतर
कोणत्याही प्रकारचा वर्क व्हिसा काढून न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ते अद्यापपर्यंत घडला. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली
रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. ही घटना आळंदी येथे घडली. याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांची मैत्रीण रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून एका दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यापैकी मागे बसलेल्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली. त्यानंतर दोघेही आरोपी पसार झाले. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.