
महापालिका जनसंवाद सभेत ८२ नागरिकांचा सहभाग
पिंपरी, ता. ९ ः नागरिक व प्रशासनात सुसंवाद राखणे, तक्रारींचे निवारण जलदगतीने करणे, यासाठी महापालिकेतर्फे सोमवारी (ता. ९) झालेल्या जनसंवाद सभेत ८२ नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमधील अनुक्रमे २०, ७, २, ६, १०, ११, ११ आणि १५ नागरिकांचा समावेश आहे. त्यांनी पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, पथारीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, खराब ड्रेनेज लाईन दुरुस्त कराव्यात, रस्त्यांवरील बेवारस व अनेक दिवसांपासून रस्त्यांवर उभी असलेली वाहने जप्त करावीत, वेळोवेळी किटकनाशक फवारणी करावी, अनधिकृत बांधकामांवर प्रतिबंध व निष्कासनाची कारवाई करावी अशा सूचना व तक्रारी मांडल्या. सभांच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, मनोज सेठिया, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, अजय चारठाणकर आदी होते.