सिंग्नलला थोडे जास्त वेळ थांबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंग्नलला थोडे जास्त वेळ थांबा
सिंग्नलला थोडे जास्त वेळ थांबा

सिंग्नलला थोडे जास्त वेळ थांबा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० : शहराच्या काही चौकातील ट्रॅफिक सिग्नलचा कालावधी (सायकल टाइम) वाढवला आहे. यामध्ये लाल सिग्नलचीही वेळ वाढल्याने काही ठिकाणी वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागत आहेत. दोन टप्पे होऊनही चौकातून पुढे जाणे शक्य होत नसल्याने चालक नाराजी व्यक्त करतात. काही ठिकाणी तर लाल सिग्नल संपण्याची वाट न पाहताच चालक सुसाट निघतात. दरम्यान, वाहनांची वाढती संख्या, रस्त्याची कामे या बाबींचा विचार करून सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने हा कालावधी वाढविल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

सद्यःस्थिती
- सुरक्षित व नियोजनबद्ध वाहतुकीसाठी ठिकठिकाणी ट्रॅफिक बसवले जातात सिग्नल
- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतही महत्त्वाचे चौक व मुख्य रस्त्यावर सुमारे १२५ सिग्नल
- वाहनांची संख्या लक्षात घेता सिग्नलचा एकूण कालावधी (सायकल टाइम) वाढविण्याचा निर्णय
- जास्त वाहतूक असलेल्या मार्गाला हिरव्या सिग्नलसाठी अधिक तर लाल सिग्नलसाठी कमी कालावधी दिला जातो
- काही मार्ग वगळल्यास इतर मार्गावर सायकल टाइम वाढल्यानंतर जसा लाल सिग्नलचा कालावधी वाढतो, तसा हिरव्या सिग्नलचाही वाढत असल्याने वाहतूक सुरळीत राहण्यास होते मदत

चालकांना मनस्ताप
काही ठिकाणचे सिग्नल अगोदरच दीड ते दोन मिनिटांचे होते. दोन टप्प्यानंतरही कोंडीतून सुटका होत नव्हती. अशी परिस्थती असताना आता आणखी कालावधी वाढल्याने चालकांना मनस्ताप होत आहे.

सिग्नलची माहिती
लाल सिग्नल : लाल सिग्नलचा दिवा दिसल्यास वाहन थांबवावे
पिवळा सिग्नल : पुढे जाण्यासाठी तयार राहायचे. मात्र, पुढे जायचे नाही.
हिरवा सिग्नल: पिवळ्या दिव्या नंतर हिरवा दिवा लागतो, त्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता.

सर्व अभ्यास करून नियोजन केले जाते. संबंधित मार्गावरील वाहनांची संख्या लक्षात घेऊन सिग्नलमध्ये बदल केले जातात. हे बदल सुरक्षित वाहतुकीसाठीच आहेत. त्यामुळे काही ठिकाणच्या सिग्नलचा कालावधी वाढवला आहे.
- दीपक साळुंखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नियोजन विभाग, वाहतूक शाखा.

सिग्नलचा एकूण सायकल टाइम वाढविल्याने लाल सिग्नलचाही कालावधी वाढला आहे. काही ठिकाणी तर अडीच ते तीन मिनिटांचा लाल सिग्नल आहे. यामुळे आणखीच वाहतूक कोंडी होते. पांजरपोळ चौकात वाहनांच्या रांगा असतात. त्यामुळे लाल सिग्नलचा कालावधी कमी असावा.
- महादेव नलवडे, वाहन चालक, भोसरी

सिग्नल सायकल टाइम वाढविलेले काही चौक
(वेळ सेकंदात)
ठिकाण पूर्वी आता
काळेवाडी फाटा १३० १४५
नाशिक फाटा ९० १२०
पांजरपोळ १४० १५५
भारतमाता चौक, मोशी १३० १५०
टिळक चौक, निगडी ९० १२०
लक्ष्मी चौक, वाकड १३० १५५
वाकडगाव चौक १३० १४५
मोरवाडी चौक ९० १२०