
मोशीमध्ये ता. १३ पासून विज्ञान उत्सव एकूण ३०७ शाळा सहभागी ः वक्तृत्व, निबंध व प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन
पिंपरी, ता.११ ः विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी, दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाच्या विज्ञान प्रदर्शन तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर भरविण्यात येत आहे. यावर्षी शहरात सिटी प्राइड स्कूल चिखली- मोशी येथे १३ ते १४ जानेवारी दरम्यान, विज्ञान उत्सव रंगणार आहे. या प्रदर्शनासाठी ३०७ शाळांनी नोंदणी केली आहे.
पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग पिंपरी, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ, पिंपरी चिंचवड विज्ञान अध्यापक संघ तसेच सिटी प्राइड स्कूल मोशी यांच्यावतीने सिटी प्राइड स्कूल चिखली-मोशी येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पन्नासावे मनपास्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे.
विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या उपक्रमाचे सादरीकरण करण्याची संधी प्राप्त होणार आहे. या प्रदर्शनात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांचा, खासगी शाळांचा तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांचाही सहभाग असणार आहे. यामध्ये ३०७ प्रकल्प सादरीकरण होणार आहेत. त्याचबरोबर विज्ञान विषयाच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा, विज्ञान रांगोळी व आदर्श पाठ या स्पर्धाही आयोजित केलेल्या आहेत. आजपर्यंत वक्तृत्व स्पर्धा- १६१, निबंध -१८२, प्रश्नमंजूषा- ११९, रांगोळी - ९८ विद्यार्थ्यांनी व तंत्रस्नेही आदर्श पाठ यामध्ये २२ शिक्षकांनी नोंदणी केली आहे.
गेली दोन वर्ष कोरोना कालावधीत विज्ञान प्रदर्शन ऑनलाइन घेण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी ऑफलाइन प्रदर्शनासाठी शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. या प्रदर्शनासाठी जोरदार तयारी केलेली आहे. या ५० व्या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन अतिरिक्त आयुक्त-एक प्रदिप जांभळे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. शोभा खंदारे, शिक्षण उपायुक्त संदीप खोत, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान प्रदर्शन भरणार आहे.
-------------------------