
दादा रुपमय चटर्जी यांना अभिवादन
पिंपरी, ता. १२ : दिवंगत कामगार नेते दादा रूपमय चटर्जी यांच्या ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त टीयूसीसी संलग्न सर्व संघटनांच्या वतीने भोसरीतील शहीद दादा रूपमय चटर्जी चौकात अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी टीयूसीसी केंद्रीय समितीचे अध्यक्ष इंदुप्रकाश मेनन होते.
माजी महापौर संजोग वाघेरे, कामगार नेते अरुण बोऱ्हाडे, संभाजी शिंदे, अजय गडकरी व अमोल साळवी, प्रमोद घुले, माणिक सस्ते, नागुलपेल्ली कृष्णार्जुन, अरुण गराडे आदींनी मनोगत व्यक्त केले. इंदुप्रकाश मेनन म्हणाले, ‘‘कामगारावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, सरकारी उद्योगांचे खासगीकरण करणे, कत्रांटी पद्धत, वायआयटी कामगार, पेन्शन योजना बंद करणे, कामगार व संघटनांचे हक्क या बाबतच्या सरकारच्या धोरणे चुकीची आहेत. सर्व कामगारांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे. तसेच, ३० जानेवारी रोजी नवी दिल्लीत सेंट्रल ट्रेड युनियनच्या वतीने सभा घेण्यात येणार आहे. प्रमोद मोरे यांनी प्रास्ताविक केले. अशोक तांबे यांनी आभार मानले.