
अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल
पिंपरी, ता. ११ : महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजात केवळ तीन महिन्यात बदल केला. अतिरिक्त आयुक्त (एक) प्रदीप जांभळे यांच्याकडे सर्वाधिक १६ विभागांची जबाबदारी सोपविली आहे. जितेंद्र वाघ (दोन) यांच्याकडे १४ व उल्हास जगताप (ता. तीन) यांच्याकडे १२ विभाग दिले आहेत.
महापालिकेचा ''ब'' वर्गात समावेश झाल्यामुळे तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे आहेत. शासकीय सेवेतील दोन आणि स्थानिक एक अशी विभागणी आहे. जांभळे व वाघ शासकीय सेवेतील असून जगताप महापालिका सेवेतील आहेत. त्यांच्यात २६ सप्टेंबर रोजी विभागांचे वाटप केले होते. आता त्यात बदल केला आहे. लेखा, अमृत, स्मार्ट सिटी, जेएनएनयूआरएमचे विशेष प्रकल्प, नगररचना आणि दक्षता व गुणनियंत्रण या सर्व विभागांचे कामकाज आयुक्त स्वतः पाहणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्याकडील विभाग : उद्यान व वृक्षसंवर्धन, अग्निशमन, शिक्षण, माध्यमिक शिक्षण, स्थापत्य (उद्यान), अतिक्रमण, विद्युत मुख्य कार्यालय, करसंकलन, पाणीपुरवठा व जलनि:सारण, जलशुद्धीकरण केंद्र, मध्यवर्ती भांडार, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, स्थापत्य मुख्य कार्यालय, समाज विकास, सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृहांसह) आणि आपत्ती व्यवस्थापन.
अतिरिक्त आयुक्त वाघ यांच्याकडील विभाग : प्रशासन, माहिती व तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय (बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय), क्रीडा, स्थापत्य (प्रकल्प), वैद्यकीय मुख्य कार्यालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, आरोग्य, आकाशचिन्ह व परवाना विभाग, निवडणूक व जनगणना, भूमी आणि जिंदगी, पर्यावरण अभियांत्रिकी, कायदा आणि बीआरटीएस प्रकल्प.
अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्याकडील विभाग : सुरक्षा, कार्यशाळा, नगरसचिव, माहिती व जनसंपर्क, झोपडपट्टी निर्मूलन व पूनर्वसन, आयटीआय मोरवाडी व कासारवाडी, नागरी सुविधा केंद्र, अभिलेख कक्ष, बीएसयुपी, ई्डब्ल्यूस प्रकल्प, स्थानिक संस्था कर आणि कामगार कल्याण.
..