प्राधिकरणाने पुनर्विकासाला परवानगी द्यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राधिकरणाने पुनर्विकासाला परवानगी द्यावी
प्राधिकरणाने पुनर्विकासाला परवानगी द्यावी

प्राधिकरणाने पुनर्विकासाला परवानगी द्यावी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने शहराच्या विविध भागात बांधलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींची परिस्थिती अतिशय खराब झाली आहे. इमारतींना तडे गेले आहेत. टेरेसमधून पाणी गळती होते. काही अनुचित प्रकार घडल्यास मोठी जीवित हानी होवू शकते. त्यामुळे पीएमआरडीने या घरांची दुरुस्ती करुन द्यावी किंवा पुनर्विकास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. तसेच हस्तांतरण शुल्काबाबत नियमावली तयार करण्याची सूचना त्यांनी केली.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकणाने बांधलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्यांबाबत खासदार बारणे यांनी सोमवारी (ता. १६) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त राहुल महिवाल यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीस माजी महापौर आर. एस. कुमार, सुलभा उबाळे, सरिता साने, अनुप मोरे, राजेंद्र बाबर, शैला निकम आणि सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खासदार बारणे म्हणाले, ‘‘तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकणाने १९९० पूर्वी बी. जी. शिर्के यांच्या मार्फत अनेक इमारती बांधल्या आहेत. या सहकारी गृहसंस्थांमध्ये अनेक नागरिक रहात आहेत. या इमारती ‘रेडीमोड स्लॅब व सिपोरेक्स’ या पद्धतीने बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींची कामे दर्जेदार झालेली नाहीत. या गृहसंस्थाची परिस्तिथी अतिशय खराब झाली आहे. सांडपाणी, रस्ते, नळजोड याची अवस्था वाईट आहे. लोकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. काही अनुचित प्रकार घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. प्राधिकरणाच्या घरांच्या हस्तांतरणाचे कामकाज पीएमआरडीएकडेच आहे. हस्तांतरण शुल्काबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल. पण पीएमआरडीएने त्यासंदर्भात नियमावली तयार करावी.’

‘‘यासंदर्भात बैठक घेतली जाईल. शासनाकडून मार्गदर्शन घेतले जाईल. त्यानुसार संस्थांच्या दुरुस्ती किंवा पुनर्विकासाला परवानगी देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. हस्तांतरण शुल्काबाबत नियमावली केली जाईल.
- राहुल महिवाल, आयुक्त

‘‘प्राधिकरण बरखास्त झाले आहे. त्याचे महापालिका आणि पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण झाले आहे. परंतु, संस्थांचे नुतनीकरण व देखभालीचा प्रश्न तेथील नागरिकांना भेडसावत आहेत. या संस्थांचे पुनर्वसन करण्याबाबत गार्भियाने लक्ष घालावे. ‘पीएमआरडीए’ने या इमारतींची दुरुस्ती करुन द्यावी किंवा पुनर्विकास करण्याची परवानगी द्यावी. सिडकोनेही पनवेलमध्ये सोसायट्यांच्या बाबतीत गांभीर्याने घेतले आहे.’’
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ