
ज्येष्ठ नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
पिंपरी, ता. १६ : चालत्या बसचा चालक बेशुद्ध पडल्याने संभाव्य मोठा अपघात केवळ एका ज्येष्ठ नागरिकांमुळे टळला. वेडीवाकडी वळण घेणाऱ्या बसचे स्टेअरिंग हातात धरून ती दुभाजकाला घासून सुरक्षितरित्या थांबवली. प्रसंगावधान राखून धाडस दाखविणाऱ्या या ६० वर्षीय व्यक्तीचे नाव गौतम सखाराम साळुंके आहे.
साळुंके यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिलेली माहिती अशी ः ते पत्नीसह सोमवारी (ता. १६) दुपारी नातेवाईकाला भेटण्यासाठी निगडी, भक्ती शक्ती ते पुणे स्टेशन (औंध मार्गे) बसने (क्र.. ३४८) औंध येथे जात होते. यामध्ये सुमारे तीस प्रवासी होते. आकुर्डी खंडोबा माळ चौकातून चिंचवड चापेकर चौकाच्या दिशेने जात असताना प्रेमलोक पार्क येथे चालक बेशुद्ध पडला. स्टेअरिंगवर नियंत्रण न राहिल्याने बस कुठेही धडकून मोठा अपघात होण्याची भीती होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. दरम्यान, साळुंके यांनी तत्काळ स्टेअरिंग हाती घेतले. वेग कमी करण्यासह दुभाजकाला घासून बस थांबवण्याचा प्रयत्न केला. काही अंतरानंतर अखेर दुभाजकावर चढून ती थांबली. सर्व प्रवासी सुखरूप बसमधून बाहेर पडले. यामध्ये साळुंके यांच्या छातीला किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला घेतली.
----
बेशुद्ध झालेला चालक खाली कोसळल्यानंतर विनाचालक बस धावत पाहून धक्काच बसला. बस कुठेही धडकण्याची भिती होती. त्यामुळे स्टेअरिंग हातात घेतले. मात्र, ब्रेक व ॲक्सलेटरच्या ठिकाणी चालक पडलेला असल्याने वेग कमी करणे कठीण होते. तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करून बस थांबवली. सर्व प्रवासी सुखरूपपणे बसमधून बाहेर पडल्याचा आनंद आहे.
- गौतम साळुंके, निगडी
-----------------------------------