
गरिबीचे दिवस
‘‘तुम्हाला बसल्याजागी सगळं आयतं मिळतंय. त्यामुळे वडिलांच्या कष्टाची आणि त्यागाची तुम्हाला किंमत नाही.
आम्ही लहान असताना फार गरीब होतो. दिवसांतून फक्त एकदा नाश्ता आणि दोनवेळा जेवायला मिळायचे. रात्र झाली की मुकाट्याने झोपावे लागायचे आणि दिवसभर जागे राहावे लागायचे. एक ते चार चुकूनही आम्ही विश्रांती घ्यायचो नाही. करणार काय? आमच्या नशिबात गरिबीची तशी होती. गरिबीमुळे हसणंही आम्हाला कधी परडवलंच नाही. चुकून कधी घरी आनंद झाला तर आम्ही आलटून- पालटून हसायचो पण एकाचवेळी सगळ्यांनी हसणं आम्हाला परवडत नव्हतं.’’ सुशांतने अमेय आणि शांभवीला लहानपणीची गरिबी ऐकवली.
‘‘लहानपणी आमच्या घरी लाइट नव्हती. त्यामुळे मी रात्रभर उदबत्तीच्या उजेडावर अभ्यास करत बसायचो. त्यामुळे फक्त दोन वर्षांमध्ये मी दहावी पास झालो. त्याकाळात अनेकजणांना दहावी पास होण्यासाठी तीन- चार वर्षे लागायची. त्या काळातील दहावीचे बोर्ड फार कठीण पेपर काढायचे पण मी कधी घाबरलो नाही. अभ्यास दणकून करायचो. त्यामुळे मला हे यश मिळाले. आमची गरिबी शिक्षकांच्या डोळ्यांवर यायची. त्यामुळे ते मला मुद्दाम त्रास द्यायचे. परीक्षेत अनेकदा त्यांनी माझी कॉपी पकडली पण मी कधी डगमगलो नाही. संकटांना कधी घाबरायचे नसते, हे माझ्याकडून शिका.’’ सुशांत जुन्या आठवणीत रमला.
‘‘लहानपणी अनेकदा उदबत्ती घ्यायलाही पैसे नसायचे. अशावेळी काय करावे, हा मला प्रश्न पडायचा. मग मी घराबाहेर पडून काजवे पकडायचो आणि त्यांच्या सानिध्यात अभ्यास करायचो. फार खडतर परिस्थितीत मी अभ्यास केला. आता सगळी सुखे तुमच्यासमोर हात जोडून उभी आहेत पण तुम्हाला अभ्यास नको असतो. मोबाईलवर टाइमपास करायचा असतो.’’ सुशांतने दोन्ही मुलांचे कान टोचले.
‘‘अनेकदा आम्हाला ‘झुक झुक आगीनगाडी’ हे गाणं म्हणत कोट्यावधी रुपयांच्या रेल्वेने मामाच्या गावाला जायचे असायचे पण गरिबीमुळे आमच्या नशिबी रेल्वेचा प्रवास आलाच नाही. बाबा आम्हाला त्यांच्या जुनाट फियाट गाडीने मामाच्या गावी सोडायचे. रेल्वे केवढी आणि फियाट गाडी केवढुशी असा विचार माझ्या मनात अनेकदा यायचा पण गरिबीपुढे कोणाचे काय चालते.?’’ सुशांतने डोळे पुसले.
‘‘पालक तुम्हाला पाकीटमनी देतात म्हणून तुम्ही मुलं पार्ट्या करता. आमच्यावेळी पाकीटमनीच नसायचा. मग पार्ट्या कशी करणार? पण आम्ही कधी दुः खी झालो नाही. आम्ही गावातल्या लोकांच्या कोंबड्या पकडून, कशाबशा पार्ट्या करायचो. मुलांनो, गरीबी फार वाईट असते. पण सगळी सुखे तुमच्या पायाशी लोळण घेत असतानाही तुम्हाला मात्र त्याची जाण नाही, याचं मला फार वाईट वाटतं.’’ सुशांतने रागावत म्हटले. त्यांचे बोलणं ऐकून अमेय म्हणाला,
‘‘बाबा, तुम्ही गरिबीत दिवस काढलेले असताना आम्ही तर कसं छानछौकीत दिवस काढणार? तुमच्यासारखेच आम्हीही गरिबीतच दिवस काढतोय.’’
‘‘काहीही काही बोलतोस? तुम्ही कसं काय गरिबीत दिवस काढता?’’ सुशांतने म्हटले. मग शांभवी बेडरूममध्ये गेली व दोघांच्या जिन्स पॅंट तिने बाहेर आणल्या.
‘‘बाबा, तुम्ही लहान असताना चांगले शिवलेले कपडे तरी घालायचात. आम्ही दोघं तर फाटलेल्या जिन्स वापरतो. बघा बरं या जिन्स किती ठिकाणी फाटल्या आहेत. या फाटलेल्या पॅंटमधून आमचे गुडघे आणि पोटऱ्या पण दिसतात. तुमच्या लहानपणीच्या गरीबीची आम्हाला जाणीव असल्यानेच आम्ही असले फाटके कपडे घालत असतो.’’ अमेयने म्हटले. त्याचं हे बोलणं ऐकून सुशांत त्या विरलेल्या आणि फाटक्या जिन्सकडे टक लावून पाहत बसला.