पिंपरीत झोपडपट्टी अतिक्रमण कारवाई विरोधी धडक मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत झोपडपट्टी अतिक्रमण 
कारवाई विरोधी धडक मोर्चा
पिंपरीत झोपडपट्टी अतिक्रमण कारवाई विरोधी धडक मोर्चा

पिंपरीत झोपडपट्टी अतिक्रमण कारवाई विरोधी धडक मोर्चा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : ‘शर्म करो शर्म करो पीएमआरडीए शर्म करो’, आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका अशा घोषणा देत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयावर विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सोमवारी (ता.१६) धडक मोर्चा काढला. पीएमआरडीएच्या वतीने थेरगाव येथील अण्णाभाऊ साठेनगर या झोपडपट्टीवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे, जवळच्या शाळेत जाणारी मुले शिक्षणापासून वंचित होणार असल्याने हा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी पीएमआरडीचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांना निवेदन देण्यात आले. या धडक मोर्चाला नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी पाठिंबा दिला. यावेळी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख, महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर, शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा, संघटक प्रकाश पठारे, गणेश जगताप व शाळकरी मुले उपस्थित होते.

सिद्दीक शेख म्हणाले, ‘‘थेरगावमध्ये झोपडपट्टीवर अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी ११ जानेवारीला पीएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारी आले होते. झोपडपट्टीवर बुलडोझर फिरवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही कारवाई केल्याने तेथील ८० कुटुंबे बेघर होणार आहेत. तर, तेथील ३८ लहान मुले जवळच्या शाळेत जातात, त्यांची शाळा सुटणार आहे. तसेच, हवामान विभागाने थंडीचा रेड अलर्ट जारी केला आहे. एवढ्या थंडीमध्ये नागरिकांना बेघर करणे माणुसकीला धरून नाही.’’ या झोपडपट्टीवरील कारवाई स्थगित करावी. तसेच, पीएमआरडीए प्रशासनाला याबाबत जागृत करण्यासाठी मोर्चा काढला होता.