नाट्य अभिनय प्रमाणपत्र वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाट्य अभिनय प्रमाणपत्र वर्ग
नाट्य अभिनय प्रमाणपत्र वर्ग

नाट्य अभिनय प्रमाणपत्र वर्ग

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ ः `‘कला क्षेत्र हे निसरडे आणि अनिश्चिततेचे आहे. त्याबाबतची आवड असेल तर परिश्रमानंतर नक्कीच उत्तम कलाकार म्हणून प्रवास सुरु होतो, असा विश्वास ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी चिंचवड येथे व्यक्त केला.

ललित कला केंद्र (गुरुकुल) सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा थिएटर वर्कशॉप कंपनी संचलित नाट्य अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम थिएटर वर्कशॉप कंपनीच्या पैस रंगमंच येथे सुरु आहे. अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी ललित कला केंद्र (गुरुकुल) चे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे यावेळी उपस्थित होते. यावेळी पहिल्या नाट्यवर्गातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

आळेकर म्हणाले, ‘‘नाटकाची चळवळ पिंपरी-चिंचवड शहरात सुरु आहे ही कौतुकाची बाब आहे. शहर वेगाने विकसित झाले असून त्याच्या सांस्कृतिक जाणीवा देखील बदलताना पाहिल्या आहेत. शहरीकरण झाल्यानंतर घड्याळाच्या काट्यासह सांस्कृतिक जाणीवा अबाधित असल्याने येथे कलेला पूरक वातावरण आहे. कला क्षेत्र नाट्यकलेची ऊर्मी आपल्याला आपल्या घरातूनच मिळते. मोठेपणी ती कला आपल्याला विकसित करता येते. मात्र त्यासाठी उत्तम मार्गदर्शनाची जोड असल्यास ती कला बहरते.’’

भोळे म्हणाले, ‘‘ललित कला केंद्रात शिकण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असतात. मर्यादित प्रवेश असल्याने सर्वांना प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना ललित कलांचे शास्त्रोक्त याच विचाराने आम्ही नाट्यसंस्थांसह अंशकालीन अभ्यासक्रम सुरु केले आहेत. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त शिक्षण घेणे शक्य होते.’’

प्रभाकर पवार यांनी सूत्रसंचालन केले.