
अतिक्रमणाबाबत तक्रार केल्याच्या रागातून बेदम मारहाण
पिंपरी : अतिक्रमणाबाबत तक्रार केल्याचा राग मनात धरून दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार दापोडी येथे घडला. याप्रकरणी किशोर वसंत काटे (रा. गणेश कॉर्नर, दापोडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश इंद्रभान साखरे (रा. महादेव आळी, दापोडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने त्याच्या गुरांचा गोठा वाढवून अतिक्रमण केले होते, म्हणून त्याच्याविरुद्ध फिर्यादी यांनी नगरपालिकेत तक्रार अर्ज केला होता. याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला रॉडने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला, डोळ्याला व कानाला दुखापत झाली. तसेच फिर्यादीचे मित्र विजय सुतार यांनाही शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली.
विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा
झाडे बुलडोजरच्या साहाय्याने हटविण्यास महिलेने विरोध केल्याने दोघांनी महिलेला शिवीगाळ करून धमकी दिली. गैरवर्तन करीत विनयभंग केल्याचा प्रकार सुसगाव येथे घडला. पीडित ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार सनी दत्तात्रय चांदेरे (वय ३०) व बुलडोझर ऑपरेटर दीपक कुमार (दोघेही रा. सुसगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सुस गावातील सर्व्हे क्रमांक २१२, प्लॉट क्रमांक ३४ येथे फिर्यादी यांच्या वडीलांच्या पत्र्याच्या खोल्या आहेत. या खोल्यांच्या पाठीमागे मोकळ्या जागेवर अशोकाची झाडे लावलेली आहेत. दरम्यान, आरोपी चांदेरे हा बुलडोजरच्या साहाय्याने झाडे हटवू लागला असता फिर्यादी यांनी तुम्ही झाडे काढू नका, असे म्हणत त्यास विरोध केला. त्या बुलडोजरसमोर थांबल्या असता चांदेरे याने त्यांना शिवीगाळ केली. धमकी देत गैरवर्तन केले. दरम्यान, फिर्यादी यांचे वडील तेथे आले असता आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेले.
तलवारीचे फोटो व्हायरल प्रकरणी एकाला अटक
तलवारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली. तर अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल आहे. चेतन महिंद्र मनोहर (वय १९, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी, भोसरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपींनी त्यांच्याजवळ तलवार बाळगली व तलवारीचे फोटो व्हायरल केले.
शिवी दिल्याच्या कारणावरून मारहाण
शिवी दिल्याच्या कारणावरून एकमेकांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरीतील साई चौक येथे घडला. विशाल ऊर्फ डॉनी भगवानदास बहादूर (वय ३५), अनिकेत ऊर्फ निकेत भगवानदास बहादूर (वय ३२, दोघेही रा. विशाखा सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी), दीपक महिपाल तुसाम (वय २७, रा. गणेशखिंड रोड, मॉडेल कॉलनी, पुणे), रवी लोट (वय ३०, रा. पाण्याच्या टाकीजवळ, देहूरोड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सापडलेल्या डेबिट कार्डचा केला गैरवापर
सापडलेल्या डेबिट कार्डचा गैरवापर करून स्वाईप करण्यासह परस्पर पैसे काढल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे घडला. याप्रकरणी प्रेमकुमार गुलाब वाघमारे (रा. अल्डिया पुराणिक सोसायटी, म्हाळुंगे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश रघुनाथ बोडके (रा. मु. पो. रिहे, मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे एटीएम वायफाय डेबिट कार्ड आरोपीला सापडले असता त्याचा गैरवापर करून विविध ठिकाणी स्वाईप केले. फिर्यादीचे पैसे त्यांच्या परस्पर काढून घेतले. फिर्यादी यांनी त्याला थांबवले असता अरेरावीची भाषा करीत दुचाकीवरून पसार झाला.
घरात शिरून दोन मोबाईल चोरले
घरात शिरून दोन मोबाईल चोरल्याची घटना मामुर्डी येथे घडली. रणजितकुमार शिवचंद्र सिंह (रा. साईनगर, मामुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र अमर पासवान हे लेबर कॅम्पमध्ये पत्र्याच्या खोलीत राहतात. दरम्यान, या खोलीच्या दरवाजा तोडून चोरटा आत शिरला. तेवीस हजारांचे दोन मोबाईल लंपास केले.
चाकूच्या धाकाने दुचाकी पळवली
चाकूचा धाक दाखवून मोबाईलसह दुचाकी पळविल्याची घटना मामुर्डी येथे घडली. धीरज मोती शाही (रा. साईनगर, मामुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. ते लोटस स्पीनगेल सोसायटीजवळ लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून फिर्यादीची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी व अडीच हजारांचा मोबाईल पळवून नेला.