
सहायक आयुक्त देशमुखांची महापालिकेत अखेर पदानवती !
सकाळ बातमीचा परिणाम
पिंपरी, ता. २० : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकत कर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या गैरकारभार, मिळकत कर आकारणीतील अनियमितता, आयुक्तांचे आदेश डावलून कुलमुखत्यार पत्रावर केलेली मिळकत नोंदणी, अशा निष्काळजीपणाचा फटका सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांना बसला आहे. त्यांच्याकडून मिळकत कर विभागाचे प्रमुखपद काढून, त्यांच्याकडे फक्त आता वसुलीविषयक कामकाज सोपवून पदनावती केली आहे. तर; मिळकत कर विभाग प्रमुख म्हणून उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.
‘सकाळ’मध्ये ‘मिळकतकरातील ‘मिळकत’ ही चार भागांची वृत्तमालिका १८ ते २१ डिसेंबर २०२२ दरम्यान प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये मिळकत कर विभागातील गैरकारभारांचे सविस्तर वृत्तांकन केले होते. त्याचा परिणाम होऊन हे फेरबदल झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती.
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी आज (ता. २०) काढलेल्या कामकाज वाटपाच्या आदेशामध्ये उपायुक्त ढोले यांच्याकडे चिंचवड विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी पदाच्या कामकाजासह मिळकत करसंकलन मुख्य कार्यालयाचे विभागप्रमुख पद सोपविण्यात आले आहे. या पदाकरीता प्रदान केलेले प्रशासकीय, वित्तीय अधिकार ढोले यांना देण्यात आले आहेत. तर; या बदलामुळे देशमुख यांच्याकडे करसंकलन मुख्य कार्यालय वसुली विषयक कामकाज सोपविण्यात आले आहे. प्रभारी आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्यावतीने हा आदेश उपायुक्त जोशी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे.
संबंधित