उदे गं अंबे उदे दोन

उदे गं अंबे उदे दोन

नवरात्र पुरवणी : उदे गं अंबे उदे ः २

शक्तिपीठे

- पीतांबर लोहार
श्री म्हणजे शक्ती. प्रत्येक ठिकाणी ‘श्री’चा उल्लेख केला जातो. त्यालाच देवीचे, दैवतांचे प्रतीकही मानले जाते. अगदी अनादी काळापासून ‘श्री’ची, शक्तीची उपासना केली जात असल्याचे हिंदू धर्मग्रंथांमधून आपल्याला दिसते. इतकेच नव्हे तर, मानवी जीवनात या ‘श्री’ शक्तीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसते. किंबहुना शक्तीची उपासना हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग बनलेले आहे. कुठलेही कार्य असो, त्याचा आरंभ करताना ‘श्री’ शक्तीची उपासना ही केलीच जाते. त्यामुळेच दैवत म्हणूनच ‘श्री’ची उपासना करताना अनेक जण दिसतात. ही ‘श्री’ शक्ती म्हणजे देवीचे रूप. दुःखितांचे दुःख दूर करणारी शक्ती. सृष्टीला नवजीवन देणारी शक्ती. प्रेम आणि वात्सल्याचा सदैव वर्षाव करणारी शक्ती. दुष्टांचा संहार करणारी शक्ती. हे शक्तीचे रूप म्हणजेच देवी. ही देवी कधी प्रेमळ असते. तर कधी उग्र रूप धारण करणारी असते. कधी वात्सल्यसिंधू असते, तर कधी रणरागिणी असते. म्हणूनच तिला आदिशक्ती, आदिमाया म्हटले जात असावे. अशा या ‘श्री’ शक्तीची उपासना करण्याचा काळ, वर्षभरातला महत्त्वाचा काळ म्हणजे नवरात्रोत्सव होय. आश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते आश्‍विन शुद्ध नवमीपर्यंतचा काळ म्हणजे नवरात्रोत्सव. शरद ऋतूच्या प्रारंभीचा काळ असल्यामुळे त्याला शारदीय नवरात्रोत्सव असेही म्हणतात. अनादी अनंत काळापासून देवीचा नवरात्र उत्सव. ‘श्री’ शक्तीचा उत्सव साजरा केला जात आहे. या होऊन गेलेल्या वेगवेगळ्या युगांत ‘श्री’ शक्तीने वेगवेगळी रूपे धारण केलेली आहेत. ही युगे म्हणजे सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग होय.
सत्ययुग, द्वापारयुग आणि त्रेतायुग होऊन गेलेली आहेत. सध्या सुरू असलेले हे कलियुग आहे, असे म्हणतात. होऊन गेलेल्या वेगवेगळ्या युगांमध्ये देवीने, ‘श्री’ शक्तीने वेगवेगळी रूपे धारण केलेली आहेत. त्यामुळेच वेगवेगळ्या युगात वेगवेगळ्या नावांनी देवीला संबोधले जाते. ‘श्री’ शक्ती कधी काली माता असते, तर कधी दुर्गा माता असते. कधी तुळजाभवानी असते, तर कधी रेणुका माता, कधी महालक्ष्मी असते; तर कधी सप्तशृंगी देवी. देवीची नावे अन्‌ रूपे वेगवेगळी असली, तरी तिच्या उपासनेचा काळ मात्र एकच असतो आणि तो म्हणजे नवरात्रोत्सव. अशा या ‘श्री’ शक्तीची, देवीची अनेक पीठे, अनेक स्थाने देशभरात आहेत. त्यातील साडेतीन पीठे महत्त्वाची मानली जातात. ही साडेतीन पीठे आपल्या महाराष्ट्रात आहेत, हेच आपल्या मराठी माणसांचे भाग्य मानले पाहिजे. ही तीन शक्तिपीठे म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी देवी होय. यातील तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता, कोल्हापूरची महालक्ष्मी या स्थानांना पूर्णपीठ मानले गेलेले आहे. वणीची सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ मानले गेलेले आहे. मात्र, तेच सर्वश्रेष्ठ असल्याचेही सांगितले जाते. या सर्व शक्तिपीठांचा उल्लेख देवी भागवतात आढळतो. याशिवाय देवी भागवत या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांसह भारतात १०८ शक्तिपीठे सांगितलेली आहेत. यातील तीन प्रमुख असलेल्यांमध्ये काश्‍मीर, कांची व कामाख्य या पीठांचा समावेश होतो. कामाख्य येथील कामाक्षी देवीचा उल्लेख महाभारतातही आढळतो. महाराज पांडू आणि धृतराष्ट्र यांचे बंधू विदुर हे कामाख्य देवीचे उपासक होते.
महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी वणी या शक्तिपीठांबाबत श्रेष्ठत्व सांगितले जाते. वणीची सप्तशृंगी देवी हीच महालक्ष्मी आहे. तीच महाकाली आहे. तीच महासरस्वती आहे. उन्मत्त झालेल्या महिषासुराचा वध केल्यानंतर देवी विश्रांतीसाठी ज्या डोंगरावर थांबली, ते ठिकाण म्हणजे सप्तशृंग गड आहे. सात शिखरे असलेल्या या डोंगराचे स्थान पवित्र मानले गेलेले आहे. ही सात शिखरे म्हणजे सात देवतांचे वास्तव्य स्थान असल्याचे सांगितले जाते. या सात देवता म्हणजे इंद्रायणी, कार्तिकी, वाराही, वैष्णवी, शिवा, चामुंडा आणि नारसिंही या होत. तसेच या ठिकाणी नवदुर्गाही वास्तव्य करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणांबाबत असे सांगितले जाते की, सप्तशृंग गडाच्या परिसरात अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. रामायण काळात राम-रावण युद्ध झाले, त्या वेळी लक्ष्मणाला मूर्च्छा आली होती. लक्ष्मणाला पुन्हा पूर्वस्थितीत आणण्यासाठी संजीवनी वनस्पती आवश्‍यक होती. ही संजीवनी वनस्पती आणण्यासाठी मारुतीराया गेले होते. मात्र, त्यांना संजीवनी वनस्पती ओळखू आली नाही. त्यामुळे मारुतीरायांनी संजीवनी वनस्पती घेऊन जाण्यासाठी अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून नेला
होता, ही आख्यायिका सर्वांना माहितीच आहे. मात्र, हा द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्याचा एक भाग मारुतीरायांच्या हातातून खाली पडला. तोच भाग म्हणजे सप्तशृंगी गड आहे, असा उल्लेख महानुभाव पंथाच्या लीळाचरित्र या ग्रंथात आढळतो. त्यामुळेही सप्तशृंग गडाचे महत्त्व अधोरेखित होते. या स्थानासह महत्त्वाचे असणारे तुळजापूर, माहूर व कोल्हापूर या शक्तिपीठांचा उल्लेखही अनेक ग्रंथांमध्ये आढळतो. देवीचे तुळजापूर हे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. माहूरगड नांदेड जिल्ह्यात आहे. कोल्हापूर हे जिल्ह्याचे ठिकाण असून, अतिशय रमणीय आहे. सप्तशृंगगड नाशिक जिल्ह्यात आहे.
तुळजापूर, माहूर, कोल्हापूर आणि वणी या चारही स्थानांबाबत देवीच्या एका स्तोत्रात म्हटले आहे, की,
एक पीठ ते तुळजापूर।
द्वितीय पीठ ते माहूर।
तृतीय पीठ ते कोल्हापूर
अर्धपीठ सप्तशृंगी।।
अर्थात, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी देवीची इतर अनेक स्थानेही आहे. भक्तांची ते श्रद्धास्थाने बनलेली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कार्ला- वेहेरगाव येथील एकवीरा देवी. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यात एकवीरा देवीचे मंदिर आहे. एकवीरा माता हे माहूरच्या रेणुका मातेचे एक रूप असल्याचे सांगितले जाते. रेणुका मातेचा पुत्र परशुराम हा एक वीर आहे. त्यावरून कार्ला- वेहेरगाव येथील देवीला एकवीरा नावाने संबोधले जाते, अशी एकवीरा देवीच्या नावाविषयीची आख्यायिका सांगितली जाते. एकवीरा देवी ही असंख्य कोळी बांधवांची कुलदेवता आहे.
देवीचे आणखी एक शक्तिस्थान म्हणजे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई. त्यालाच जोगाईचे आंबे असेही म्हटले जाते. तसेच आम्रपूर व अंबापूर असेही त्याला म्हणतात. पूर्वी हे अंबे नावाचे एक छोटेसे खेडे होते. ते आता एक तीर्थक्षेत्र झाले आहे. त्याची आख्यायिका अशी की, कोकणातील कन्या योगेश्‍वरी हिचा विवाह परळीचे वैद्यनाथ यांच्याशी ठरला होता. त्या लग्नाचे वऱ्हाड रात्र झाल्यामुळे आंबे नावाच्या गावात मुक्कामी राहिले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी ते लग्नाचा मुहूर्त साधू शकले नाहीत. त्यामुळे कोकणातून आलेले सर्व वऱ्हाड जागच्या जागी स्तंभित झाले. त्यातील प्रत्येक जण हा दगड होऊन पडला. ते सर्व दगड स्थानिक लोकांनी एकत्र केले. त्या दगडांचा वापर करून स्थानिक लोकांनी एक मंदिर बांधले. तेच जोगाईचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. जोगाई मातेचे मंदिर हे आंबे नावाच्या खेडेगावात उभारले गेले. त्यामुळे त्याला आंबाजोगाई असे म्हटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com