उदे गं अंबे उदे तीन

उदे गं अंबे उदे तीन

नवरात्रोत्सव पुरवणी : उदे गं अंबे उदे ः ३
--
नवरात्रोत्सव
- पीतांबर लोहार
ग णेशोत्सव संपला की सर्वांना वेध लागतात नवरात्रीचे. नवरात्रोत्सव धुमधडाक्‍यात साजरा करायचे. असेच वेध श्याम आणि त्याच्या मित्रांनी लागले. त्यांनी नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा करायचे ठरवले. गावात कोणत्याही मंडळाने केली नसेल, अशा पद्धतीने देवीची प्रतिष्ठापना करायची ठरवले. मंडळातील प्रत्येकाने आपापल्या आयडिया श्यामला सांगितल्या. सर्वानुमते ठिकाण ठरले चावडीसमोरचे मैदान. चावडी म्हणजे तलाठी कार्यालयासमोरचे मैदान. उत्सव जरा हटके करावा म्हणून रामने सुचविले, ‘चावडीसमोर देवी बसवण्यापेक्षा चावडीवरच बसवली तर...?’ या ‘तर’नेच सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि ही ‘आयडिया’ सर्वांना आवडली. देवी ही गडावर निवास करते, हे सर्वांना ऐकून माहिती होते, त्यामुळे चावडीचा उपयोग गडासारखा करायचे ठरले. चावडी म्हणजे तलाठी कार्यालय. त्याची बैठी इमारत. ही इमारत गावच्या पाटलांच्या मालकीचीच होती. पाटलांच्या गण्या श्यामचा मित्र होता. त्यामुळे परवानगीला अडचण नव्हती. गण्याच्या माध्यमातून पाटलांकडून परवानगीही मिळाली. चावडीच्या छताला गडाचे स्वरूप देऊन देवीची प्रतिष्ठापना करायचे निश्‍चित झाले. त्यासाठी साहित्य गोळा करायला सर्वजण निघाले. पाटलाच्याच एका जुन्या वाड्यात जुनी लाकडं होती. त्यात उभे वासेसुद्धा होते. मंडळात सुताराचा छोट्या होता. त्याच्या मदतीला दोघे-तिघे आले. वाड्यातली लाकडे चावडीसमोर आणली. सऱ्यांचा आणि लाकडी फळ्यांचा उपयोग जिना तयार करण्यासाठी केला. साधारणतः १८-२० फूट उंचीच्या चावडीच्या इमारतीवर जाण्यासाठी एक व त्यावरून उतरण्यासाठी एक असे दोन जिने दोन दिवसांत तयार झाले. त्यांना बांबू ठोकून संरक्षक कठडे तयार केले. मंडप डेकोरेटरवाल्या गुरवचा सम्या मंडळात होता. त्यामुळे पडदे, कापड, कनाती फुकट मिळाल्या. देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी चावडीच्या छतावर केलेला चौथरा व दोन्ही जिने कापड लावून सुशोभित करून झाले. देवीचा गड तयार झाला होता. विद्युत रोषणाई केली. गडावर देवीची प्रतिष्ठापना केली. दररोज सकाळ- संध्याकाळ ‘दुर्गे दुर्घट भारी...’चा गजर होऊ लागला. सकाळ-संध्याकाळी आरतीला गर्दी होऊ लागली. सायंकाळच्या आरतीनंतर चावडीच्या मैदानावरच गरबा रंगू लागला. नवरात्रीच्या नऊ दिवसांत गावातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. श्याम्या व त्याच्या मित्रांनी त्यांच्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला. दसरा झाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गण्या नेहमीप्रमाणे चावडीच्या ओट्यावर आला. ना देवीचे गाणे होते, ना दर्शनाला येणारे भाविक. आठवणी मात्र कायम होत्या. त्याला वाटले, नऊ दिवस कसे निघून गेले, लक्षातही आले नाही. पण, देवीच्या सप्तशृंगी गडावर, माहूरच्या गडावर, तुळजापूर आणि कोल्हापूरचा नवरात्र उत्सव कसा असेल? त्याची माहिती घेण्यासाठी त्याने ब्राह्मणाच्या अण्याचे घर गाठले. त्याचे वडील मधुबुवा जोशी गावातील प्रख्यात ब्राह्मण होते. ते दरवर्षी नवरात्रीत कोणत्या कोणत्या देवीच्या दर्शनासाठी जातात, हे त्याला माहिती होते. त्याने जोशी बुवांकडून माहिती घेतली आणि देवीचा नवरात्रोत्सव जाणून घेतला.

तुळजापूर
तुळजापूर म्हणजे तुळजाभवानीचे अधिष्ठान आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एक तालुक्‍याचे ठिकाण आहे. तुळजापूरची भवानीमाता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. अनेक घराण्यांची ती कुलदेवता आहे. तुळजापूरला बाराही महिने भाविकांची गर्दी असते, बाराही महिने उत्सव असतो. पण, नवरात्र म्हणजे आंतरिक भावनेचा आविष्कार असतो. शारदीय नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र येथे साजरे केले जाते. आश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते आश्‍विन शुद्ध नवमी या काळात शारदीय नवरात्र असतो. तर, पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा या काळात शाकंभरी नवरात्र उत्सव असतो. तुळजापूरचा नवरात्रोत्सव मात्र आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चालतो. याबाबत असे सांगितले जाते, की भाद्रपद वद्य अष्टमीच्या सायंकाळी देवी सिंहासनावरून उठून पलंगावर शयन करते आणि आश्‍विन शुद्ध प्रतिपदेच्या पहाटे पाच वाजता उठून पुन्हा सिंहासनावर येते, अशी भाविकांची धारणा आहे. या दिवशी घटस्थापना केली जाते आणि देवीच्या नवरात्रोत्सवाला सुरवात होते. प्रतिपदेच्या दिवशी गावातील कुंभार तीन घागरी घेऊन येतो, त्यालाच घट असे म्हणतात. मंदिराचे पदाधिकारी, सेवक व ग्रामस्थ मंडळी ते घट वाजत-गाजत मंदिरात घेऊन जातात. घटस्थापना केली जाते. पत्रावळीवर काळी माती घेऊन त्यावर पाणी शिंपडले जाते. धान्य
पेरले जाते. प्रत्येक दिवशी एक अशाप्रकारे नऊ दिवस नऊ माळा टांगल्या जातात. नऊ दिवस नऊ कुमारिकांना भोजन दिले जाते. या काळात काही जण सत्य अंबेचे व्रत करतात. काहीजण सप्तशतीचे पाठ करतात. प्रत्येक रात्री वाहन बदलून देवीचा छबिना निघतो. या वाहनांमध्ये सिंह, हंस, मोर, नंदी व गरुड यांचा समावेश असतो. नवचंडी हवन होते. दसऱ्याला खेळले जाते. पेटत्या दिवट्या व मशालींनी सारा आसमंत उजळून निघतो.

माहूर
पुराणे आणि आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये उल्लेख असलेले जमदग्नी ऋषींची पत्नी आणि भगवान विष्णूंचा एक अवतार असलेले परशुराम यांची मातोश्री रेणुकामातेचे निवासस्थान म्हणजे माहूर. मराठवाडा, विदर्भ आणि तेलंगणच्या सीमेवर असलेले नांदेड जिल्ह्यातील देवीचे ठिकाण म्हणजे माहूर. माहूरलाच मातापूर असेही म्हणतात. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या माहूर येथेही शारदीय नवरात्र उत्साहात साजरे केले जाते. ‘वंदिली म्या अहो, वंदिली निजसत्ता भवानी। मातापुरवासिनी भवानी वंदिली।।...’ अशा शब्दांत स्वामी रामानंदतीर्थ यांनी रेणुकामातेचे वर्णन केलेले आहे.

कोल्हापूर
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले शक्तिपीठ म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूरची महालक्ष्मी. कोल्हापूर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. देवी भागवत या ग्रंथात ‘कोल्हापूरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता।...’ असा कोल्हापूरचा उल्लेख आहे. महालक्ष्मीचे हे निवासस्थान आहे. श्री महालक्ष्मीच्या नवरात्रोत्सवाची सुरवात आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेने होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीची विविध रूपांत पूजा बांधली जाते. रात्री पालखी मिरवणूक निघते. पंचमीच्या दिवशी महालक्ष्मी आपली धाकटी बहीण त्र्यंबुलीच्या भेटीसाठी जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्र्यंबुलीचे मंदिर कोल्हापूर शहराच्या पूर्वेला आहे. त्यामुळे देवीची पालखी कोल्हापूरच्या पूर्वेला असलेल्या त्र्यंबुलीस घेऊन जातात. याशिवाय प्रतिपदेपासून दशमीपर्यंत दररोज रात्री देवीचा पालखी सोहळा असतो. अष्टमीला जागर होतो. शतचंडी यज्ञ केला जातो. नवमीला नैवेद्य दाखवून अन्य धार्मिक विधी केले जातात. दशमीला पालखी सीमोल्लंघनास निघते. दसरा चौकात शमीपूजन होते. त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. पालखी परत मंदिरात आल्यावर उत्सवाची सांगता होते.

सप्तशृंग
सप्तशृंग गड हा नाशिक जिल्ह्यात वणी या गावाजवळ आहे. त्यामुळे त्याला वणीचा गड किंवा वणीची सप्तशृंगी देवी असेही म्हणतात. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी सप्तशृंग हे अर्धे पीठ मानले जाते. शारदीय नवरात्रात सप्तशृंगी गडावर भाविकांची खूप गर्दी असते. तो एक आनंदोत्सवच असतो. झेंडूच्या फुलांच्या माळांनी मंदिराचा गाभारा सजवला जातो. विविध फुलांच्या वासांनी वातावरण आल्हाददायी होते. देवीजवळ घट बसवून नवरात्राला प्रारंभ होतो. नऊ दिवस देवीची आराधना केली जाते. नवमीला होमहवन केले जाते. दशमीला पूर्णाहुती होते. देवीस नैवेद्य दाखवला जातो. भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवाची सांगता होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com