नेत्यांचे दौरे; निवडणुकीचे वारे
शहरात तापतंय राजकीय वातावरण; आरोप-प्रत्यारोपांच्‍या फैरी

नेत्यांचे दौरे; निवडणुकीचे वारे शहरात तापतंय राजकीय वातावरण; आरोप-प्रत्यारोपांच्‍या फैरी

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १३ ः दीड वर्षांपासून लांबलेल्या महापालिका निवडणुकीबाबत सध्या कोणीही काहीही बोलायला तयार नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर मात्र सर्वच पक्षांचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेते बोलू लागले आहेत. त्यांचे शहरातील दौरे वाढले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यांच्यासमवेत स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्तेही ‘एकच वादा, ..... ’, ‘आमदार म्हणून येणार कोण?... शिवाय आहेच कोण?’, अशा घोषणा देत आहेत. ‘आगामी खासदार, ....च होणार’च्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महापालिका निवडणुकीत नगरसेवकपदाची उमेदवारी आपल्यालाच मिळावी, या अपेक्षेमुळे कार्यकर्ते नेत्यांच्या दौऱ्यात सक्रिय दिसत असून, त्यांच्यात ‘राजकीय चैतन्य’ दिसत आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शहरातील राजकीय घडामोडीही वाढल्या आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक स्पष्ट झाले आहेत. तसेच, राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थकही निश्चित झाले आहेत. दोन्ही पक्षातील चारही गटांच्या नेत्यांनी आपापल्या गटांचे पदाधिकारी जाहीर केले आहेत. काही जण भारतीय जनता पक्षात केले आहेत. काही भाजपमधून अन्य पक्षांत गेले आहेत. एकमेकांना शह देण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून एक प्रकारे शक्तीप्रदर्शन घडविले जात आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरणच जणू शहरात निर्माण झाले आहे.

भारतीय जनता पक्ष
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवस शहराच्या दौऱ्यावर होते. घर चलो अभियानांतर्गत त्यांनी मतदारांशी संपर्क साधला. त्यांची मते जाणून घेतली. त्यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलही होते. लोकसभा २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान व्हावेत, असे साकडे त्यांनी घातले. पिंपरी, चिंचवड, भोसरी व मावळ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्यासमवेत आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप होते. जनसंवादाबरोबरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बावनकुळे यांनी आगामी लोकसभेत अधिकाधिक मतदान होण्याबाबतचा कानमंत्रही दिला. राम मंदिर, ३७० कलम, हिंदू कार्ड अशा भावनिक मुद्द्यांना त्यांनी हात घातला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आठ दिवसांपूर्वी दोन दिवस शहर दौऱ्यावर होते. त्यांनी चऱ्होलीत वारकऱ्यांशी संवाद साधला. पक्षातील अजित पवार गटासोबत असलेले माजी आमदार विलास लांडे त्यांच्यासोबत व्यासपीठावर होते. खासदार श्रीनिवास पाटील आणि डॉ. अमोल कोल्हेही होते. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आझम पानसरे यांची त्यांनी भेट घेतली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दोन वेळा शहरात येऊन कामांचा आढावा घेतला. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही शहरात येऊन गेलेत. आमदार रोहित पवार यांनी पक्ष (शरद पवार गट) बांधणीसाठी दोन वेळा शहर दौरा केला. खासदार सुप्रिया सुळे यांनीही वाकड, ताथवडेत नागरिकांशी संवाद साधला.

शिवसेना
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी दोन वेळा पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा केला. ‘होऊ द्या चर्चा’ या माध्यमातूनही त्यांनी मतदारांसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत पुण्यातील आदित्य शिरोडकर होते. पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघासह मावळ लोकसभा मतदारसंघाचाही अहिर यांनी आढावा घेतला. मात्र, शिवसेना शिंदे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) गटाचा एकही नेता अद्याप शहरात आलेला नाही. त्यांचे खासदार श्रीरंग बारणे मावळ, पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात कार्यरत दिसतात. त्यांनी
कॉंग्रेसमधून शिवसेनेत आणलेले माजी आमदार गौतम चाबुकस्वार ठाकरे गटात सक्रिय आहेत. ‘होऊ द्या चर्चा’च्या माध्यमातून ते थोडेफार चर्चेत दिसतात.

कॉंग्रेस ः भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस (दोन्ही गट), शिवसेनेचे (दोन्ही गट) राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते शहरात येत असताना कॉंग्रेसचा मात्र एकही नेता शहरात आलेला नाही.
आप ः आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह पुण्यात येऊन गेले. त्यावेळी शहरातील कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली. पक्षाचे संघटक विजय कुंभार हेही त्यावेळी उपस्थित होते.
मनसे ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एक महिन्यापूर्वी शहरात आले होते. आठ दिवसांपूर्वी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली.
वंचित ः वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर गेल्या महिन्यात शहरात आले होते. कार्यकर्त्‍याच्या गाठीभेटी घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले.
---

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com