पिंपरी मेट्रो निगडीपर्यंत

पिंपरी मेट्रो निगडीपर्यंत

निगडीपर्यंतचा मेट्रो प्रवास ‘बोनस’च

प्रवाशांची भावना ः तीन महिन्यांत कामाच्या कार्यवाहीचे नियोजन

पिंपरी, ता. ४ ः पीसीएमसी स्थानक (पिंपरी-चिंचवड महापालिका) ते निगडीपर्यंत मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणास केंद्र सरकारने २३ ऑक्टोबर रोजी मान्यता दिली. त्यामुळे चिंचवड, आकुर्डी, निगडी, प्राधिकरण परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, त्यांना आता प्रत्यक्ष मेट्रोची प्रतीक्षा लागली आहे. निगडीपर्यंत मेट्रो आल्यास पुण्यात जाणे-येणे सोईचे होऊन आर्थिक व वेळेची बचत होण्याच्या दृष्टिने ती फायद्याचीच ठरणार आहे, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, पुढील तीन महिन्यात विस्तारित मार्गाचे काम सुरू करण्याचे नियोजन महामेट्रोने केले आहे.
पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी (पीसीएमसी) मार्गाचे निगडीपर्यंत विस्तारीकरण केले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. त्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, या प्रकल्पाच्या खर्चाचे नियोजनही केले आहे. केंद्र व राज्य सरकारसह महापालिकेचा वाटा निश्चित केला आहे. कर्ज अथवा निधी उभारण्याबाबत सुचविले आहे. मुळा नदीवरील दापोडीतील हॅरिस ब्रिजपासून मेट्रोचा शहरात समावेश होतो. ती आता निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढविण्यात येणार आहे. पिंपरी ते निगडीपर्यंतचे अंतर ४.४१३ किलोमीटर आहे. सध्या दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नाशिक फाटा (भोसरी), वल्लभनगर (संत तुकारामनगर), पीसीएमसी भवन (पिंपरी) असे सहा स्थानके आहेत. पिंपरीपासून सिव्हिल कोर्ट स्थानक पुणे मार्गावर मेट्रोतून प्रवासी वाहतूक सुरू आहे. तेथून वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गावरील रूबी हॉल क्लिनिक आणि वनाजपर्यंत जाता येत आहे. त्यासाठी सिव्हिल कोर्ट स्थानकातून गाडी बदलावी लागत आहे. जास्तीत जास्त ३५ रुपये तिकीट दर आहे. विस्तारित मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी (खंडोबा माळ) आणि निगडी असे तीन स्थानके प्रस्तावित आहेत. मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर या तीन स्थानकांच्या परिसरासह चिंचवडगाव, मोहननगर, विद्यानगर, रामनगर, चिखली, पूर्णानगर, शाहूनगर, काळभोरनगर, आकुर्डीगाव, प्राधिकरणातील २१ ते २७ पेठा, निगडीगाव, यमुनानगर, त्रिवेणीनगर, रुपीनगर, तळवडे, मावळातील देहूरोड, सोमाटणे, तळेगाव, वडगाव, कामशेत आदी भागातून पीएमपीने येऊन पुण्यात जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

निगडी, आकुर्डी परिसरातून नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक जणांचे पुण्यात येणे-जाणे असते. शाळा, महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. त्यांच्यासह सामान्य प्रवाशांनाही निगडीतून मेट्रोने प्रवास करणे सोईची होईल. त्यामुळे वेळेची बचत होईल. सध्या दुचाकी, रिक्षा, स्वतःची कार वा पीएमपीने जाणाऱ्या प्रवाशांवरील ताण कमी होईल.
- प्रा. दिनेश भोसले, त्रिवेणीनगर, निगडी

निगडी-प्राधिकरणातील विद्यालयात मी शिक्षिका आहे. राहायला वारजे माळवाडी येथे आहे. सध्या देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाने प्रवास करते. स्वतःच्या गाडीने प्रवास केल्यास एक ते सव्वातास लागतो. पीएमपीने आल्यास दोन तासांपर्यंत वेळ जातो. निगडीपर्यंत मेट्रो आल्यास कोथरूडपर्यंत जाणे सोईचे होईल. पण, तेथून वारजेपर्यंत मेट्रो मार्ग नेल्यास अनेकांची सोय होईल.
- आयशा शेख, शिक्षिका, वारजे

मी कर्वे रस्त्यावरील कॉलेजची विद्यार्थिनी आहे. सध्या पीएमपी बसने प्रवास करते. वेळ अधिक लागतो. अनेकदा शिवाजीनगर, डेक्कन परिसरात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवास नकोसा होऊन जातो. एक-दोनदा पिंपरीतून सिव्हिल कोर्ट व तेथून कॉलेजपर्यंत गेले. पण, चढउतारामुळे नकोसे वाटते. थेट निगडीतून मेट्रो सुरू झाल्यास सर्वांचीच सोय होईल.
- अनिशा, विद्यार्थिनी, निगडी-प्राधिकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com