शहरात वाढले ३९ हजार मतदार

शहरात वाढले ३९ हजार मतदार

पिंपरी, ता. ३ : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा झाला असून दुसरा टप्पा २७ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. नऊ डिसेंबरपर्यंत पुनर्निरीक्षण केले जाणार आहे. आतापर्यंत मयत मतदार, पत्ता बदललेले मतदार, दुबार नावे वगळून नवमतदारांची नोंदणी केली आहे. त्यानंतरची प्रारूप मतदार यादी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली. त्यानुसार गेल्या वर्षी एक जानेवारीच्या तुलनेत शहरातील मतदारसंख्या ३९ हजाराने वाढली आहे. यात चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघातील संख्या वाढलेली दिसत असून पिंपरीतील संख्या कमी झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, एक जानेवारी २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांची मतदार नोंदणी व मतदार यादी पुनर्निरीक्षण केली जात आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या पुनर्निरीक्षण कार्यक्रमानंतर जिल्हा प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार शहरातील सर्वांत जास्त मतदार असलेला मतदारसंघ चिंचवड ठरला आहे. यापूर्वीही चिंचवड मतदारसंघ मोठाच होता. सर्वात कमी मतदार संख्या पिंपरीत होती. आताही पिंपरी मतदारसंघातील मतदार संख्या कमीच आहे.

आगामी निवडणुकीची तयारी
पुढील वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी व मतदार पुनर्निरीक्षण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत प्रामुख्याने नवीन मतदारांची नाव नोंदणी, दुबार नावे कमी करणे, मयत मतदारांची नावे कमी करणे, मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र समाविष्ट करणे, पत्त्यामध्ये बदल आदी कामे केली जाणार आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार
मतदारसंघ / मतदार (एक जानेवारी २२) / मतदार (ऑक्टोबर २०२३) / फरक (घट/वाढ)
चिंचवड / ५,६६,५७७ / ५,८५,७३१ / १९,१५४ वाढ
पिंपरी / ३,६९,८०२ / ३,६३,८२९ / ५,९७३ घट
भोसरी / ५,००,५४७ / ५,२६,८५८ / २६,३११ वाढ
एकूण / १४,७६,४१८ / १४,३६,९२६ / ३९,४९२ वाढ

दृष्टिक्षेपात
- नवमतदार नोंदणी व मयत, घर सोडून गेलेले वगळल्याने पिंपरीतील संख्या कमी
- चिंचवड व भोसरी मतदारसंघात नव्याने समाविष्ट गावांचा समावेश असून अनेकजण नव्याने राहायला आली आहेत
- दापोडीपासून निगडीपर्यंतचा भाग पिंपरी मतदारसंघात येतो, या भागातील बहुतांश नागरिकांनी उपनगरांत घरे घेतली आहेत
- भोसरीतील चिखली, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव भागात मतदार संख्येत अधिक वाढ
- चिंचवडमधील ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे भागात मतदार संख्येत अधिक वाढ

भोसरीत आजपासून पुनर्निरीक्षण
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, एक जानेवारी २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांची मतदार नोंदणी व मतदार यादी पुनर्निरीक्षण केली जात आहे. त्याअंतर्गत भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी शनिवार (ता. ४) आणि रविवारी (ता. ५) प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी मोहीम आयोजित केली आहे. त्याअंतर्गत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलाची दुरुस्ती, मयत मतदार वगळणीचे अर्ज मागविले आहेत. त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा. जास्तीत जास्त नवमतदार, महिला, दिव्यांग, भटके विमुक्त, तृतीय पंथी मतदार या सर्वांची देखील नाव नोंदणी केली जाईल, असे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रेवणनाथ लबडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com