तुटण्याच्या मार्गावर असणारी पाचशे नाती जोडली

तुटण्याच्या मार्गावर असणारी पाचशे नाती जोडली

नात्यात समझोता ः पोलिसांच्या महिला सहायक कक्षाकडून समुपदेशन

पाचशे दांपत्यांचे वाचविले संसार

मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १० : घरगुती कारणांवरून वाद झाला, पतीसह कुटुंबातील इतर सदस्यांनीही त्रास दिला, एकमेकांना सोडून देत घटस्फोट घेण्यापर्यंत प्रकरण गेले. दरम्यान, या त्रासाबद्दल विवाहितेने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील महिला सहायक कक्षात अर्ज केला. येथून तिला सर्वतोपरी मदत मिळाली. तिची अडचण जाणून घेत तिला धीर दिला. विवाहितेसह तिच्या सासरच्यांना बोलावून घेत त्यांचे समुपदेशन केले. पुढे कसलाही त्रास होणार नाही, याची विवाहितेला खात्री दिली, विवाहिता सासरी नांदायला तयार झाली. अखेर दोघांमध्ये समेट घडविण्यात यश आले अन् तुटण्याच्या मार्गावर असणारा संसार पुन्हा फुलला. अशाप्रकारे महिला सहायक कक्षाच्या माध्यमातून सुमारे पाचशेपेक्षा अधिक तुटणारी नाती पुन्हा जोडली आहेत.
कौटुंबिक हिंसाचार, पती व नातेवाईकांकडून होणाऱ्या छळाचे प्रकार घडत असतात. यामध्ये महिलांचा छळ केला जातो. अशावेळी पीडित महिलेला न्याय मिळण्यासह आधाराची गरज असते. दरम्यान, पीडित महिलेला मदत करून तिचा संसारही वाचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासह पोलिस ठाणे स्तरावरही महिला सहायक कक्ष कार्यरत आहे. आयुक्तालयातील कक्षात एक अधिकारी, सात कर्मचारी, समुपदेशक, वकील यांचा समावेश आहे.

काय कार्य करतो हा कक्ष
- तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर पीडित महिलेसह तिचा पती व इतर नातेवाइकांना बोलावून घेतले जाते
- सर्व कायदेशीर बाबी समजावून सांगण्यासह होणाऱ्या परिणामांची माहिती दिली जाते
- महिलेच्या सुरक्षिततेचाही विचार केला जातो
- समुपदेशन करून त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो
- समेट घडून येत नसल्यास पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधितांना पोलिस ठाण्यात पाठवले जाते
- आयुक्तालयातील महिला सहायक कक्षेत नोव्हेंबर २०१८ पासून अद्याप एक हजार ४६५ अर्ज प्राप्त
- त्यातील तब्बल ५०७ प्रकरणात समेट घडविण्यात पोलिसांना यश

निःसंकोचपणे करता येते तक्रार
महिलांना सुरक्षित वाटेल, असे वातावरण निर्माण करण्याबरोबरच त्‍यांच्या समस्या समजून घेणे, त्यावर कायदेशीर कारवाई करून न्याय देणे, या उद्देशाने हा कक्ष सुरू केला आहे. अनेकदा पीडित महिला या पुरुष पोलिस अधिकाऱ्यांसमोर लैंगिक छळ, अत्याचार यासारख्या घटनांची माहिती देताना संकोच करतात. मात्र, या कक्षात तक्रारदार पीडित महिलांना निःसंकोचपणे तक्रार देता येते. या कक्षातील महिला पोलिस अधिकारी, अंमलदारांकडून त्यांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाते.

अन् ‘ते’ दांपत्य दीड वर्षांनी पुन्हा आले
पती-पत्नी व त्यांना चार वर्षांची मुलगी असताना घरगुती कारणांवरून पती-पत्नीत वाद वाढला. आम्ही सोबत राहणारच नाही, इथपर्यंत त्यांचा निर्णय झाला. अखेर प्रकरण महिला सहायक कक्षाकडे आले. येथे दोघांना सर्व बाबी समजावून सांगून त्यांच्या समेट घडवला. सुखाचा संसार पुन्हा सुरू झाला. त्यांना एक मुलगाही झाला. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपूर्वी हे दांपत्य पुन्हा महिला कक्षात आले. यावेळी ते कोणतीही तक्रार घेऊन नाही, तर पोलिसांचे आभार मानण्यासाठी येथे आले होते. तुमच्यामुळे आमच्या संसाराची घडी बसली, असे म्हणत त्यांनी कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

‘‘महिलांच्या मदतीसाठी हा कक्ष सदैव तत्पर आहे. पीडित महिलेला मदत करून तिचा संसार कसा वाचेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो. पीडित महिलेला व तिला त्रास देणाऱ्यांना कायदेशीर सर्व बाबी समजावून सांगतो. समुपदेशन करतो, या माध्यमातून अनेक प्रकरणात समेट घडवला आहे.’’
- माधुरी पोकळे, पोलिस उपनिरीक्षक तथा महिला सहाय्यक कक्ष प्रमुख

वर्ष ः प्राप्त अर्ज ः समझोता ः न्यायालयात दाद ः पोलिस ठाण्याकडे चौकशीसाठी
२०१८ ः २७ ः १० ः ०६ ः ११
२०१९ ः ३५१ ः १२९ ः १०१ ः १२१
२०२० ः २०३ ः ६६ ः ३६ ः १०१
२०२१ ः ४३१ ः १५५ ः १२० ः १५६
२०२२ ः ३६६ ः १३५ ः ८९ ः ८२
२०२३ ः ८७ ः १२ ः ०४ ः १३
एकूण ः १४६५ ः ५०७ ः ३५६ ः ४८४
--------
शटर स्टॉक नंबर
१२४८०१९६०६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com