गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

‘बीआरटीएस’मधील ग्रीलला
धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी, ता. १० : दुचाकीवरून बीआरटीएस मार्गातून जाताना दुचाकी ग्रीलला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. विशाल संजय चव्हाण (वय २४, रा. गणेशनगर, दुर्गा कॉलनी, वाकड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विशाल हा दुचाकीवरून बीआरटीएस मार्गातून कोकणे चौकाकडून नाशिक फाट्याकडे जात होता. दरम्यान, काटे पाटील बसथांब्याजवळ रस्त्यावर अचानक समोर आलेल्या महिलेला वाचवत असताना त्याची दुचाकी बीआरटीएसच्या ग्रीलला धडकली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विशालचा मृत्यू झाला.

पूर्वीच्या वादातून दोघांना बेदम मारहाण
पूर्वी झालेल्या वादातून चौघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना चिखली येथे घडली. प्रतीक हनुमंत मोरे (रा. गणेश कॉलनी, मोरे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंद परदेशी, अतिश तरगे, विकी, संकेत (सर्व रा. मोरे वस्ती, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र नेहमी बसत असलेल्या साने चौकातील सिद्धेश्वर महादेव मंदिरासमोर गेले होते. दरम्यान, पूर्वी झालेल्या वादावरून आरोपी विकी याने फिर्यादीला दगड मारला. तर आनंद याने सिमेंटचा पत्रा फिर्यादीचा मित्र अक्षय लोखंडे यांच्या पाठीवर मारून जखमी केले. फिर्यादी व अक्षय यांना आरोपींनी हाताने मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केली.

आयपीएल बेटिंगप्रकरणी दोघांना अटक
आयपीएल सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई पिंपरी येथे करण्यात आली. नरेश जगन्नाथ अग्रवाल (वय ४०) व विशाल राजू अग्रवाल (वय २४, दोघेही रा. रिव्हर रोड पिंपरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपी हे पिंपरीतील रिव्हर रोड येथील एका दुकानाच्या मागे बेकायदेशीररीत्या इंडियन प्रिमिअर लीग, टी-२० यामधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई‌ सुपर किंग या क्रिकेट सामन्यावर मोबाईल कॉलद्वारे बेटिंग घेत होते. पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक करीत पाच मोबाईल, वही डायरी व पेन असा ५२ हजार १५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जुनी सांगवीत साडे बारा लाखांची घरफोडी
दरवाजा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने साडे बारा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना जुनी सांगवी येथे आहे. याप्रकरणी वंदना सुरेश शिनकर (रा. शिक्षक सोसायटी, आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या घरातील स्टोअर रुमचा कडी कोयंडा तोडून चोर घरात शिरले. घरातील लोखंडी कपाटातून नऊ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे व २५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने तसेच दोन लाख २५ हजार रुपये रोख असा एकूण बारा लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

ग्राहकांना हुक्का पुरविणाऱ्या हॉटेलवर छापा
हॉटेलमधील ग्राहकांना अवैधरीत्या हुक्का पुरवणाऱ्या हॉटेलवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकला. ही कारवाई कासारवाडीतील हॉटेल निसर्ग येथे करण्यात आली. या प्रकरणी मॅनेजर अजय प्रेमानंद भालेराव (वय २२, रा. पिंपळे गुरव, मूळ-बीड) व विकास नरेंद्र साहू (वय २१, रा.कासारवाडी, मूळ- मध्यप्रदेश) यांच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हॉटेलात ग्राहक जेवत असताना त्यांना आरोपी हे धुम्रपानासाठी तंबाखूजन्य हुक्का पदार्थ पुरवत होते. यावेळी पोलिसांनी छापा मारून घटनास्थळावरून चाळीस हजार रुपयांचे हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट व इतर साहित्य जप्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com