संत तुकाराम नगरमध्ये टोळक्यांच्या उच्छाद

संत तुकाराम नगरमध्ये टोळक्यांच्या उच्छाद

पिंपरी, ता. २२ : रस्त्यावर टोळीने एकत्र जमायचे, नशा करून शिवीगाळ आरडाओरडा करीत धिंगाणा घालायचा, यासह टोळ्यांमधील जोरदार हाणामारी, राडा, अशा प्रकारच्या टोळक्याचा उच्छादामुळे पिंपरीतील संत तुकारामनगर येथील रहिवासी अक्षरशः दहशतीखाली वावरत आहेत. या टोळक्यावर पोलिसांकडून ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

संत तुकारामनगर येथील स्व. राजेश बहल उद्यानाच्या भिंतीजवळील रस्त्यावर, स्वरगंगा बी विंग हाउसिंग सोसायटीजवळ असे टोळके दररोज जमा होतात. यामध्ये परिसरातील महाविद्यालयातील तरुणांचा समावेश असतो. दिवसभर येथेच असतात. रस्त्यावर कुठेही दुचाकी उभ्या करायच्या, सायलेन्सरचा मोठा, शिवीगाळ, आरडाओरडा करून धिंगाणा घालत अश्लील चाळे करायचे, असे प्रकार रोजच सुरू आहेत. यामुळे येथील रहिवासी हैराण झाले आहेत. इतरही टोळ्याही येथे येत असतात. अनेकदा त्यांच्यात जोरदार हाणामाऱ्याही झाल्या आहेत. एकमेकांच्या जिवाचाही विचार न करता हे तरुण एकमेकांच्या पुढे उभे ठाकतात. दरम्यान, परिसरातील इमारतीवर काही वस्तू फेकण्याचे प्रकारही घडले आहेत. अशा रोजच्या प्रकारामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत. या बाबत परिसरातील रहिवाशांनी वेळोवेळी पोलिसात तक्रार दिली आहे. मात्र, ठोस कारवाई केली जात नाही.

टोळक्यांमध्ये हाणामारी
टोळक्यामध्ये जोरदार हाणामारी होते. या हल्ल्यात एखाद्याच्या जिवालाही धोका पोहोचू शकतो. याचाही विचार केला जात नाही. या हाणामाऱ्या पाहताना नागरिकांच्या अंगावरही अक्षरशः काटा येतो.

ज्वालाग्राही पदार्थाची पिशवी सोसायटीत
काही दिवसांपूर्वी स्वरगंगा बी विंग सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये ज्वालाग्राही पदार्थाची पिशवी फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत रहिवाशांनी पोलिसात तक्रार दिली होती.

टोळक्याने धिंगाणा घालण्याचे प्रकार नित्याचे झाले आहे. घरातून बाहेर पडतानाही विचार करावा लागतो. परिसरातील नागरिकही भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. या टोळक्यावर योग्य कारवाई व्हावी.
- मिलिन मस्करनीस, स्थानिक रहिवासी

कॉलेजमधील तरुण याठिकाणी टोळक्याने जमतात. दिवसभर आरडाओरडा व गैरवर्तन सुरू असते. आमच्या छोट्या मुलांवरही चुकीचे संस्कार होण्याची भीती वाटते. या टवाळखोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा.
- डॉ. काजळ श्रीवास्तव

सोसायटीतील लोकांना खूप त्रास होत आहे. टवाळखोरांचा अक्षरशः धिंगाणा सुरू असतो. हाणामारी, शिवीगाळ, आरडाओरडा, बर्थडे पार्ट्या हे नित्याचे झाले आहे. हा उद्योग दिवसभर सुरू असतो. हा एक दिवसाचा प्रश्न नसून रोजच असे प्रकार घडत आहेत.
- देवेंद्र कुलकर्णी, स्थानिक रहिवासी

तरुणांकडून उच्छाद मांडले जात आहे. माझी मुले छोटी आहेत. बाहेरील वातावरण पाहून फ्लॅटच्या गॅलरीत यायलाही भीती वाटते. वाहनांचे हॉर्न मोठ्याने वाजवितात. खूप त्रास सहन करावा लागत आहेत. आम्हाला मदतीची गरज आहे.
- निधी अगरवाल, स्थानिक रहिवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com