‘एम्पायर इस्टेट’ पुलाच्या लिंकरस्ता रॅम्पला मुहूर्त
पिंपरी, ता. २९ ः पवना नदी, पुणे-मुंबई लोहमार्ग आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग ओलांडत शहराचा पूर्व व पश्चिम भाग जोडणारा सुमारे दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल चिंचवड येथील एम्पायर इस्टेट सोसायटीच्या मधून उभारला आहे. गेल्या सात वर्षांपासून पुलावरून वाहतूक सुरू आहे. मात्र, त्यावरून चिंचवड व पिंपरी कॅम्पात उतरणे व चढण्यासाठी रॅम्प नसल्याने वाहनचालकांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. आता या पुलाला लिंक रस्त्यावर उतरणे व चढण्यासाठी दोन रॅम्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अडथळा ठरणाऱ्या उच्चदाब वीज वाहिन्या स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पुणे-मुंबई महामार्ग आणि लोहमार्ग यामध्ये एम्पायर इस्टेट सोसायटी आहे. शहरातील सर्वात मोठी गृहनिर्माण सोसायटी अशी तिची ओळख आहे. त्यामधून सात वर्षांपूर्वी उड्डाणपूल उभारला आहे. शहरातील तो सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल ठरला आहे. त्यामुळे काळेवाडी, थेरगाव, रहाटणी, वाकड आणि मोरवाडी, चिंचवड, चिखली भाग जोडला आहे. या मार्गावरील रस्ता ‘काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटी रस्ता’ या नावाने ओळखला जात आहे. महापालिकेने उड्डाणपुलाचे ‘संत मदर तेरेसा उड्डाणपूल’ असे नामकरण केले आहे. पुलावरून पुणे-मुंबई महामार्गावर उतरणे व चढण्यासाठी एम्पायर इस्टेट सोसायटी परिसरातूनच रॅम्प तयार केला आहे. मात्र, पिंपरी व चिंचवड यांना जोडणाऱ्या लिंक रस्त्यावर उतरता वा चढता येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना महामार्गावरील पिंपरी चौक किंवा चिंचवड स्टेशन चौकातून वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे साधारण पाच किलोमीटरचा वळसा पडत आहे. तो टाळण्यासाठी लिंक रस्ता जोडणाऱ्या रॅम्पची आवश्यकता होती. त्यास आता मुहूर्त मिळाला असून महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे.
लिंक रस्ता रॅम्पचे फायदे
- पिंपरी कॅम्प व चिंचवड गाव परिसरातून काळेवाडी, वाकड, थेरगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, हिंजवडी तसेच पुणे-मुंबई महामार्ग व एमआयडीसी भागात जाता येईल.
- सध्याचा चिंचवड वा पिंपरी कॅम्प मार्गे पडणारा वळसा वाचणार असून साधारण पाच किलोमीटरने अंतर कमी होणार आहे
- पिंपरी चौक, पिंपरी कॅम्प, इंदिरा गांधी उड्डाणपूल, चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात होणारी वाहतूककोंडी टळेल
- पुलावर उभारलेल्या बीआरटीएस थांब्यामुळे पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही सोय होणार आहे
रॅम्पला वीज वाहिन्यांचा अडथळा
एम्पायर इस्टेट सोसायटीतील उड्डाणपुलास चिंचवड बाजूकडे उतरणे व चढण्यासाठी लूप अर्थात रॅम्प बांधण्यात येणार आहे. त्यासाठी अडथळा ठरणाऱ्या उच्चदाब वीज वाहिन्या स्थलांतरित कराव्या लागणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू असून सुमारे ५९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सहा जुलैपर्यंत निविदा स्वीकारण्यात येणार असून सात जुलैला निविदा उघडण्यात येणार आहे. या वीज वाहिन्या स्थलांतरित केल्यानंतर पुलाच्या रॅम्पचे काम सुरू करण्यात येईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘‘एम्पायर इस्टेट सोसायटीतून झालेल्या उड्डाणपुलावरून लिंक रस्त्यावर उतरणे व चढण्यासाठी स्वतंत्र रॅम्पची खूपच गरज आहे. अवघ्या काही मीटर अंतरासाठी चार-पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. लिंक रस्त्यावरून पुणे-मुंबई महामार्ग व काळेवाडी भागात जाण्यासाठी रॅम्प सोईचा ठरणार आहे. तो लवकर व्हायला हवा’’.
- डॉ. स्वाती ठकार, साहित्यिक व संशोधक, लिंक रस्ता, चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.